सांगली : स्थानिक स्वराज्य विशेषता महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा जिल्ह्यात दहीहंडीच्या निमित्ताने राजकीय ताकद दाखवण्याचा आणि प्रशासकीय पातळीवर वर्चस्व प्रदर्शित करण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांची लगबग दिसत आहे. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मैदानावर आवाजाच्या भिंती उभ्या करून सिनेतारकांच्या नृत्याचे आयोजन करत राजकीय मोर्चेबांधणी केली जात आहे. यामध्ये महायुतीतीलच एकमेकांचे मित्र आमनेसामने येत असल्याचे दिसत असून कोणाच्या दहीहंडीला किती गर्दी खेचली यावर मतांचे गणित मांडण्यात कार्यकर्ते गुंतले आहेत. मात्र, या राजकीय गदारोळात नागरिकांचे मूलभूत प्रश्न मात्र कोपर्यात अडगळीला पडले आहेत.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची जमवाजमव राजकीय पक्षांकडून केली जाते. मंडळांना निधी देण्यापासून ते ध्वनिप्रदूषणाचा कायदा धाब्यावर बसविणार्यांची पाठराखण केली जाते. दरवर्षी गणेश चतुर्थींला असणार्या गणेश मूर्तीच्या स्वागत मिरवणुका यंदा श्रावणातच काढण्यात आल्या. यामुळे वाहतुकीचे नियोजन तर कोलमडलेच, पण गर्दीच्या ठिकाणी ध्वनिप्रदूषण कायद्याची ऐशीतैशी दिसली. तरीही प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई शून्यच आहे. जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचे केवळ इशारेच देण्यात येत आहेत, मात्र, प्रत्यक्षात दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा सार्वत्रिक अनुभव येत आहे. यंदा महापालिका, नगरपालिका निवडणुका तोंडावर असल्याने उत्सवातील जोष शिगेला पोहचणार हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. त्यात राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता दिली आहे.
गेल्या काही वर्षापासून मुंबई, ठाण्यातील दहीहंडीच्या उत्सवाची प्रथा सांगली मिरजेत सुरू झाली आहे. वलयांकित चेहरे आणून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्ताने राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून ताकद दाखविण्याबरोबरच तरुणाई खेचण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. या वर्षी सांगली, मिरज, इस्लामपूरसह आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आदी ठिकाणीही दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहण्यास मिळतो आहे. उत्सवाच्या निमित्ताने मंत्रिपदावरील नेतेमंडळी आवर्जुन उपस्थित राहत आहेत.
मिरजेत आमदार सुरेश खाडे यांनी गेल्या तीन वर्षापासून दहीहंडी उत्सवाचे आयोजन सुरू केले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनीही दहीहंडी उत्सव सुरू केला. जनसुराज्य शक्तीच्यावतीने कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यासाठी पालकमंत्री आवर्जुन आले, याचबरोबर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही पायधूळ झाडली. याशिवाय खासदार विशाल पाटील, आमदार विनय कोरे, आमदार अशोक माने, माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली. तर खाडे यांच्या दहीहंडीला आमदार सुधीर गाडगीळ यांनी हजेरी लावली. आमदार सत्यजित देशमुख यांनी दोन्हीकडे उपस्थिती दर्शवून सहमतीचे राजकारण महत्वाचे असल्याचे दाखवून दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकसंघपणे लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी महायुतीतील घटक पक्षांचे सूर अद्याप जुळल्याचे दिसत तर नाहीच, पण स्वतंत्र ताकद निर्माण करण्याचा आणि निवडून आल्यानंतर सत्तास्थान काबीज करण्याइतपत ताकद दाखवण्याचा प्रयत्न आतापासूनच दिसत आहे. यामुळे यावेळी महायुतीतच एकमेकांची ताकद खेचण्याचा प्रयत्न होणार हे स्पष्ट आहे.
महायुतीत भाजप मोठा भाऊ म्हणून वावरत असला तरी निवडणुकीत मोठेपणा कुणाला मिळतो हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आठवड्यातून दोन-दोन दौरे सांगलीसाठी होत आहेत. यातूनच समित कदम यांच्या पडद्याआडची बोलणी होऊन काँग्रेसच्या नेत्या, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, संचालक पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री अण्णा डांगे, चिमण डांगे आदी मोहरे भाजपच्या हाती लागले आहेत. याचा निश्चित परिणाम काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीच्या मोर्चेबांधणीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.