लोकसभा निवडणुकांना केवळ एक वर्ष राहिल्यामुळे देशपातळीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधत आहेत. त्यांना विरोधकांच्या आघाडीत आणण्याचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे काही पक्ष काँग्रेसविरहित तिसऱ्या आघाडीची मोर्चेबांधणी करत आहेत. तेलंगणाचा भारत राष्ट्र समिती पक्ष आणि पक्षाचे नेते व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ऊर्फ केसीआर काँग्रेसला वगळून आघाडी करण्यासाठी उत्सुक होते. यासाठी त्यांनी काही पक्षांना एकत्रही केले. मात्र केसीआर यांचा हा प्रयत्न आता मागे पडला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्यासाठी केसीआर तयार झाले आहेत. मात्र आघाडीत येण्यासाठी त्यांनी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे विरोधकांचा चेहरा असू नयेत, अशी अट घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

बीआरएसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, “ज्या प्रकारे केंद्रीय यंत्रणा विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावरून काही दिवसांतच आपल्या देशाचाही पाकिस्तान होईल, अशी भीती वाटते. तिथे इम्रान खान पंतप्रधान असताना विरोधी पक्षांचे नेते देश सोडून पळाले. जेव्हा विरोधी पक्षांचे लोक सत्तेत आले, तेव्हा इम्रान खान आपला जीव वाचविण्याची धडपड करत आहेत. ही खूपच कठीण परिस्थिती आहे, या वेळी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आता २०१९ चा काळ उरलेला नाही. देशाला वाचविण्यासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येत भाजपाला पराभूत करण्याची निकड निर्माण झाली आहे.”

हे वाचा >> राहुल गांधी पंतप्रधान होणार का? या प्रश्नावर ChatGpt चे तिरकस उत्तर; म्हणाले. “जेव्हा मी इंग्लंडची…”

केसीआर यांच्या कन्या आणि माजी खासदार, विधान परिषदेच्या आमदार के. कविता यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. दिल्लीतील मद्यविक्री धोरणातील घोटाळ्याशी त्यांचा संबंध जोडण्यात आला आहे. केसीआर यांच्या पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) होते. पण त्यानंतर त्यांनी नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) असे ठेवले. गेल्या काही काळापासून केसीआर यांनी शेजारच्या राज्यांतही पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. त्यासोबतच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसशी त्यांचा सुप्त संघर्ष सुरू आहे.

बीआरएसच्या आणखी एका नेत्याने सांगितले की, काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय स्तरावरची ताकद क्षीण झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता प्रादेशिक पक्षांसोबत निवडणूकपूर्व वाटाघाटी कराव्या, अशी बीआरएसची मागणी आहे. “आमचे हेच म्हणणे आहे की, काँग्रेसने त्यांच्या ताकदीप्रमाणे वाटा उचलावा. ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांची ताकद जास्त आहे, त्या ठिकाणी काँग्रेसने नमती भूमिका घ्यावी. याच मार्गाने विरोधकांची आघाडी टिकाव धरू शकते आणि त्याची परिणामकारकताही दिसू शकेल,” अशी प्रतिक्रिया केसीआर यांच्या जवळच्या सहकाऱ्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना दिली.

याच नेत्याने पुढे सांगितले, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी हे समीकरण लोकांसमोर जाणे योग्य नसल्याचे आमच्या पक्षाचे मत आहे. २०१९ साली या समीकरणामुळे विरोधक पराभूत झाले, हे सर्वज्ञात आहे. विरोधकांमध्ये नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्यासारखे मातब्बर नेते आहेत, ज्यांनी आदर्श प्रशासन चालवून दाखवले आहे. राहुल गांधी यांची आतापर्यंतची काय कामगिरी आहे? आतातर राहुल गांधी त्यांच्या पक्षाचे नेतेदेखील नाहीत. खरगे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसेच स्वतःला पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून घोषित करायची राहुल गांधी यांच्यात हिंमतही नाही.”

आणखी एका नेत्याने २०२० सालातील बिहार विधानसभा निवडणुकीचा दाखला देताना सांगितले की, प्रादेशिक स्तरावरील गणिते लक्षात घेऊन विरोधकांची आघाडी निर्माण झाली पाहिजे. बिहार निवडणुकीत काँग्रेसने त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त जागा घेऊन त्या वाया घालवल्या. निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे केवढे मोठे नुकसान झाले, हे सर्वांनीच पाहिले. काँग्रेसने ज्या जागा लढविल्या तिथे त्यांना यश आले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीआरएसला अर्थपूर्ण आघाडीत रस आहे, जिथे सर्वच विरोधक एकदिलाने काम करतील. यासाठी पुढील काही महिन्यांमध्ये आणखी चर्चा करून आघाडीचे अंतिम स्वरूप समोर येऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नितीश कुमार यांनी नुकतीच दिल्ली येथे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. या वेळी बीआरएससह अनेक प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. लोकसभा निवडणुकांच्या आधी तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी कशी होते, त्यानुसार पुढील वाटाघाटीची गणिते अवलंबून असल्याचे केसीआर यांच्या निकटवर्तीयाने सांगितले.

हे वाचा >> मोदींवर टीका केल्याने खासदारकी गमावणाऱ्या राहुल गांधी यांची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीआरएस आणि राहुल गांधींमध्ये शाब्दिक वाद

बीआरएस आणि काँग्रेस पक्ष हे एकमेकांचे विरोधक आहेत. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राहुल गांधी यांनी टीआरएसचे नामकरण बीआरएस केल्यावर टीका केली होती. ते म्हणाले, केसीआर यांची इच्छा असेल तर ते, त्यांच्या पक्षाचे नाव आंतरराष्ट्रीयदेखील ठेवू शकतात. यानंतर केसीआर यांचे सुपुत्र आणि राज्यमंत्री के तारक रामा राव ऊर्फ केटीआर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भावी पंतप्रधानांनी आधी अमेठी जिंकून दाखवावी. (काँग्रेस परिवाराचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमधून २०१९ साली स्मृती इराणींनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता.)