ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ठाणे, पालघर यासांरख्या लोकसभा मतदार सघांतील जागावाटपाचे काय होणार याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली असतानाच, गेल्याकाही दिवसांपासून दिल्लीश्वर असलेल्या मित्रपक्षातील एका वेगळ्या हालचालींमुळे शिंदे सेनेतील अस्वस्थता वाढू लागली आहे. निवडणूकाच्या हंगामात राजकीय पक्षांकडून तळागाळात काम करणाऱ्या पक्षीय व्यवस्थेपर्यंत पोहचविली जाणारी ‘रसद’ ही काही नवी बाब नाही. असे असताना महायुतीत तिढा असलेल्या जागांवरील बुथ कार्यकर्ते तसेच पक्षातील ‘वॉरियर्स’ना गेल्या काही दिवसांपासून ठराविक रकमेची रसद मित्र पक्षांकडून पोहचविली जात असल्याने हा प्रकार नेमका काय? असा संभ्रम शिंदे सेनेत वाढू लागला आहे.

नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे येथील रचनेला पाकिटबंद बुस्टर मिळू लागल्याने मित्र पक्षातील इच्छूक उमेदवार तर ही रसद पुरवत नाही ना, या शंकेने शिंदे सेनेतील वेगवेगळ्या शहरातील नेते अस्वस्थ होऊ लागले आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यानंतरही कायम आहे. ठाणे, पालघर, नाशिक, संभाजीनगर अशा काही जागांवरून महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या रत्नागिरी-सिंधुदूर्गची जागा भाजप नेते नारायण राणे यांच्यासाठी सोडावी लागल्याने शिंदे गटात काहीशी नाराजी आहे.

आणखी वाचा-चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार? आसामात काय आहेत राजकीय समीकरणं?

कोकणात ठाकरे गटाला आव्हान द्यायचे असेल तर धनुष्यबाणावर निवडणूक लढवा हा शिंदे सेनेचा आग्रह देखील भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी मान्य केलेला नाही. यामुळे मुंबई आणि ठाण्यातील उर्वरित जागांचे वाटप दोन पक्षांमध्ये कसे होते, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. ठाणे, नाशिक, पालघर, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई या पाचह भागांसाठी होणाऱ्या मतदानाला अजूनही महिना शिल्लक आहे. या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले असून महायुतीत गोंधळाचे वातावरण असल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर मित्र पक्षाकडून तळागाळातील पक्षीय यंत्रणेपर्यंत ‘पाकिटबंद’ उत्साह वर्धक साहित्य पोहचू लागल्याने शिंदे सेनेतील नेत्यांमधील संभ्रम आणखी वाढला आहे.

ठाण्यातील पाकिट कोणाचे?

मागील १० दिवसांपासून ठाणे आणि पालघर भागात बुथ प्रमुखांना ‘पाकिटवाटप’ सुरू झाले. ऐरव्ही एकमेकांचे मित्रअसणाऱ्या या दोन पक्षांतील ठराविक नेत्यांमध्ये अचानक सुरू झालेल्या या रसद वाटपाटपाची देवाण-घेवाण झाली. हे पाकिट कोणाकडून असा सवाल शिंदे सेनेतील काही नेत्यांनी आपल्या मित्र पक्षातील सहकाऱ्यांना विचारण्यास सुरूवात केली. मित्र पक्षातील एक तगडा नेता ठाण्यासाठी इच्छूक आहे. कोणत्याही निवडणूका आल्या की या नेत्याचे दातृत्त्व भरभरून वाहू लागते. ठाण्याची जागा कोणाला मिळणार याविषयी स्पष्टता नसतानाही तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सुरू झालेला हा पाकिटांचा ओघ या दातृत्वशील नेत्यांकडून सुरू नाही अशी चर्चाही मग सुरू झाली. ठाण्यापुरते हे सुरू आहे असे वाटत असताना नवी मुंबईतूनही ही पाकिटे वाटली जाऊ लागली. ही पाकिटे नेमकी कोणाकडून येत आहेत, याविषयी कोणतीच कल्पना नसल्याने बेलापूरच्या ‘ताई’ देखील चमकल्या.

आणखी वाचा-“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिकडे मिरा भाईंदरमध्ये वॉर्डा-वॉर्डातून हे बुस्टर डोस पाझरू लागल्याने ‘दादां’च्या दातृत्त्वाची तरही कमाल नाही ना अशी चर्चा शिंदे आणि मित्र पक्षांच्या गोटातही सुरू झाली. दातृत्त्ववान दादांना ही जागा सुटली की काय या चर्चेने मग शिंदे सेनेतील ठाणेदार अस्वस्थ झाले. नवी मुंबई तर बंडाची भाषा बोलली जाऊ लागली. या पाकिटांचा ओघ कुठून सुरू आहे याचा शोध मग घेतला जाऊ लागला. अखेर ‘महाशक्ती’ बनू पाहणाऱ्या पक्षाच्या यंत्रणेकडून ही व्यवस्था केली जात असल्याचे स्पष्ट होऊ लागल्याने दादांच्या दातृत्त्वाचे किस्से मागे पडले आणि शिंदे सेनेने सुटकेचा निःश्वास घेतल्याचे समजते.