अमरावती : प्रहार जनशक्‍ती पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांची बैठक घेत आमदार बच्‍चू कडू यांनी वेगळी चूल मांडण्‍याचे संकेत दिल्‍याने महायुतीसमोरील अडचणी वाढल्‍या आहेत. जागावाटपाच्‍या चर्चेच्‍या वेळी आम्‍हाला विश्‍वासात घेतले गेले नाही, असे बच्‍चू कडू यांचे म्‍हणणे आहे. बच्‍चू कडू यांच्‍या खेळीने फटका कुणाला बसणार, याचे औत्‍सुक्‍य आहे.

बच्‍चू कडू यांचा प्रहार जनशक्‍ती पक्ष हा महायुतीचा घटक असला, तरी या पक्षाला गृहीत धरले गेले, लोकसभेच्‍या जागावाटपाच्‍या चर्चेत या पक्षाला स्‍थान नव्‍हते. ही खंत कार्यकर्त्‍यांनी व्‍यक्‍त केल्‍यानंतर बच्‍चू कडू यांनी गुरूवारी रात्री कार्यकर्त्‍यांची बैठक घेतली. प्रहारच्‍या पदाधिकाऱ्यांनी भाजपकडून चांगली वागणूक मिळत नसल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. येत्‍या ११ एप्रिलपर्यंत विदर्भातील कार्यकर्त्‍यांशी चर्चा करून लोकसभा निवडणुकीतील प्रहारच्‍या भूमिकेविषयी अंतिम निर्णय घेणार असल्‍याचे बच्‍चू कडू यांनी जाहीर केले असले, तरी तोवर प्रहार निवडणूक लढण्‍याची तयारी देखील करणार आहे. प्रहारचा एक खासदार दिल्‍लीत पोहोचवू, अशी घोषणा त्‍यांनी केल्‍याने प्रहार निवडणुकीच्‍या रिंगणात उतरेल, हे जवळपास स्‍पष्‍ट झाले आहे. महायुतीसमोर हीच मोठी अडचण ठरणार आहे.

हेही वाचा – मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकारण्याचा ५२ वर्षांतील दुसरा प्रसंग

बच्‍चू कडू हे महायुतीतून बाहेर पडलेले नाहीत. पण, त्‍यांची भूमिका ही गेल्‍या काही दिवसांत बदललेली दिसून येत आहे. त्‍यांचा राग हा भाजपवर आहे. कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीत बोलताना बच्‍चू कडूंनी मनातील भावना व्‍यक्‍त देखील केल्‍या आहेत. आगामी काळात तुमचे सरकार दोन मतांनी पडू शकते, असा इशाराही त्‍यांनी भाजपला दिला आहे. प्रहारचे दोन आमदार आहेत. तरीही त्‍यांना विचारात घेतले जात नाही, ही खंत बच्‍चू कडू व्‍यक्‍त करताना दिसतात.

हेही वाचा – चंद्रपूरमधील नाराज हंसराज अहीर यांच्या भूमिकेकडे लक्ष

प्रहारची शक्‍ती ही केवळ एक तालुका, जिल्‍ह्यापुरती मर्यादित नाही, तर महाराष्‍ट्रभर प्रहारचे काम पोहोचलेले आहे, असे बच्‍चू कडू यांचे म्‍हणणे आहे. प्रहारने महायुतीच्‍या उमेदवारांविरोधात भूमिका घेतली, तर त्‍याचा फटका भाजप आणि शिवसेना शिंदे गटालाही बसू शकतो. इतर पक्ष कोणत्‍या चुका करतात, याकडे आमचे लक्ष राहणार आहे. आम्‍ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. काही पक्षाच्‍या चुका या प्रहारचा खासदार बनवू शकतात, असे सांगून बच्‍चू कडूंनी अजूनही काही पत्‍ते शिल्‍लक ठेवले आहेत. अमरावतीच्‍या बाबतीत परिस्थिती पाहून योग्‍य निर्णय घेऊ, अस सांगताना खासदार नवनीत राणा यांना देखील इशारा देऊन ठेवला आहे.

हेही वाचा – अनंतराव थोपटेंचा ‘हात’ सर्वांनाच का हवाहवासा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्‍तेत राहून सत्‍तचे फायदे घेतानाच आपण लोकांसोबत आहोत, हे दर्शविण्‍याचा बच्‍चू कडू यांचा प्रयत्‍न आहे. बच्‍चू कडू कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीत शेतकरी, शेतमजुरांच्‍या प्रश्‍नांवर बोलले. निवडणुकीच्‍या धावपळीत शेतीचे, बेरोजगारांचे प्रश्‍न मागे पडले आहेत. ग्रामीण भागात घरकुलांच्‍या उभारणीचा विषय बिकट बनला आहे, त्‍यामुळे आम्‍हाला या मुद्यांना समोर घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असे वक्‍तव्‍य बच्‍चू कडू यांनी केले आहे. अचलपूर या स्‍वत:च्‍या मतदारसंघात साखरपेरणी करण्‍याची आणि राजकारणातील पुढील वाटचाल अनुकूल करून घेण्‍याची बच्‍चू कडू यांची धडपड सध्‍या दिसून येत आहे. पारंपरिक मतदार दुरावण्‍याचा धोका ओळखून ते स्‍वतंत्र अस्तित्‍व दाखविण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहेत.