महेश सरलष्कर, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय निवडणूक आयोगातील आयुक्तांच्या दोन रिक्त पदांच्या भरतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी निवासस्थानी आज, गुरुवारी निवड समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये नव्या आयुक्तांची नियुक्ती केली जाणे अपेक्षित आहे. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते.

२०१९ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे यावेळी आयोगाकडून तारखा जाहीर करण्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे मानले जात आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीची चाचपणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशव्यापी दौरे, केंद्र सरकारच्या विविध घोषणा, ‘सीएए’ कायद्याची अंमलबजावणी आणि केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी दिलेला राजीनामा अशा एकामागून एक झालेल्या घडामोडींमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने अजूनही तारखांची घोषणा केली नसल्याचे समजते.

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात महायुती दुभंगली; ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदरमध्ये वादावादी

केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याशी पश्चिम बंगालमधील आढावा बैठकीनंतर मतभेद झाले होते. त्यानंतर गोयल यांनी राजीनामा दिला असला तरी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यावरूनही त्यांच्यामध्ये वाद झाल्याची चर्चा होत होती. केंद्र सरकारसाठी ‘सीएए’ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना काढायची असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने तोपर्यंत तारखा जाहीर करू नये अशी अपेक्षा केली जात होती.

केंद्रीय निवडणूक आयुक्त अनुप पांडे फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाल्याने तीनपैकी एक जागा रिक्त झाली होती. त्यातच गोयल यांनी राजीनमा दिल्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर कामाचा अतिरिक्त भार पडला आहे. त्यामुळे तातडीने दोन्ही पदांवर आयुक्तांची नियुक्ती करणे आवश्यक होते. केंद्रीय विधिमंत्री अर्जुन मेघवाल यांच्या शोधसमितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये संभाव्य नावांचा विचार केला गेला आहे. या नावांवर तीन सदस्यांच्या निवड समितीच्या बैठकीमध्ये चर्चा होईल व दोन्ही आयुक्तांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले जाईल. या समितीमध्ये पंतप्रधान मोदी, लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते म्हणून अधीररंजन चौधरी व पंतप्रधान नियुक्त सदस्य म्हणून विधिमंत्री मेघवाल यांचा समावेश आहे.

हेही वाचा : हातकणंगलेत राजू शेट्टी स्वबळावर, तिरंगी लढत अटळ

केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी जम्मू-काश्मीरचा दौरा केला असून केंद्राने ‘सीएए’ कायदाही लागू केला आहे. पंतप्रधानांच्या निवड समितीने गुरुवारी नव्या आयुक्तांची निवड केली तर लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर मात्र शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election dates 2024 announcement after appointment of central election commissioner eci print politics news css
First published on: 14-03-2024 at 13:12 IST