काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आता लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. छत्तीसगडमध्ये लोकसभेचे ११ मतदारसंघ आहेत. त्यातील राजनांदगाव मतदारसंघातून ते उभे आहेत. हा मतदारसंघ सत्ताधारी भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. आज (२६ एप्रिल) लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या मतदारसंघाचेही मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भूपेश बघेल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक विषयांवर आपली सडेतोड मते व्यक्त केली आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा आणि त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालवलेला प्रचार याबाबतही त्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत.

गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून भाजपाला देणगी

राजनांदगावमधील लोकांचा कल काय दिसून येतो आहे या प्रश्नावर ते म्हणाले की, “या मतदारसंघामध्ये शहरी लोकांच्या तुलनेत ग्रामीण मतदारांचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील मतदार ठामपणे काँग्रेसच्या पाठिशी उभे आहेत.” अलीकडेच पंडरियामधील प्रचारसभेतील भाषणात बघेल यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. त्याबाबत ते म्हणाले की, “भाजपाने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून हजारो कोटी रुपये घेतले आहेत. हे एका बाजूला हिंदुत्वाबद्दल बोलतात आणि दुसऱ्या बाजूला अशा पैशांमधून आपल्या पक्षाचे झेंडे आणि बॅनर्स खरेदी करतात. हा दुटप्पीपणा आहे. त्यांनी अनेक उद्योगपतींकडून अशाचप्रकारे खंडणी गोळा केली आहे.” पुढे ते म्हणाले की, “काँग्रेस पक्ष सत्तेत असताना आम्ही सुरू केलेले चांगले प्रकल्प भाजपाने आता बंद केले आहेत. काँग्रेसने सुरू केलेला शेणखत खरेदी आणि गांडूळ खत निर्मितीसारख्या चांगला प्रकल्प आता भाजपाने बंद करून टाकला आहे. या प्रकल्पांवर अवलंबून असणाऱ्या लाखो कुटुंबांवर त्याचा परिणाम झाला आहे.”

हेही वाचा :राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघात जंगली प्राण्यांचा उच्छाद

नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास डळमळला आहे

छत्तीसगडमध्ये काँग्रेसला लोकसभेच्या अकरापैकी कमीतकमी सहा ते सात जागा सहज मिळतील, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचारसभांमधून काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करत आहेत. काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर तो देशातील माताभगिनींचे सोने-मंगळसूत्र काढून घेऊन ते देशातील घुसखोरांना आणि मुस्लिमांना देईल, असा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेसला मध्यमवर्गीयांची संपत्ती काढून घ्यायची असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. छत्तीसगडमध्ये नुकत्याच घेतलेल्या सभेमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. याबद्दल भूपेश बघेल म्हणाले की, “नरेंद्र मोदीजींचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे, म्हणूनच ते आमच्या जाहीरनाम्याबद्दल अद्वातद्वा बोलत आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासाठी कोणतेही ठोस मुद्दे नाहीत हे त्यांनी अलीकडेच केलेल्या भाषणांवरून लक्षात येते. ते निव्वळ काँग्रेस आणि गांधी-नेहरु घराण्याला शिव्या देतात. त्यांच्याकडे देशाला देण्यासाठी कोणतीही नवी दृष्टी नाही.”

खोट्या चकमकीचा आरोप

नक्षलवाद ही छत्तीसगडची मोठी समस्या आहे. अलीकडेच कांकेरमध्ये झालेल्या चकमकीमध्ये २९ नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. मात्र, ही चकमक खोटी असल्याचा आरोप गावकऱ्यांनी तसेच इतरही विरोधकांनी केला आहे. यावरून सध्या राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कांकेरमध्ये चकमक खोटी ठरवून भूपेश बघेल यांनी सुरक्षा दलाचा अपमान केल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी केला होता. यावर बोलताना भूपेश बघेल म्हणाले की, “भाजपा सत्तेत आल्यापासून खोट्या चकमकींविरोधातील तक्रारी वाढल्या असल्याचे मी म्हणालो. मी हे वक्तव्य केल्यानंतर कांकेरची घटना घडली आहे. मात्र, त्यांनी माझे वक्तव्य या घटनेशी जोडून माझ्यावर टीका केली आहे. आपल्या सुरक्षा दलांनी दाखवलेल्या शौर्याचे हे यश आहे. सुरक्षा दलाची कोणतीही जीवितहानी झाली नाही, याबाबत मी आनंदी आहे. उपमुख्यमंत्रिपदावर असूनही त्यांनी अशा प्रकारची विधाने करू नयेत, ही फारच खालच्या दर्जाची गोष्ट आहे.”

हेही वाचा : हेमा मालिनी, अरुण गोविल राजपूत समाजाच्या रोषाला कसं सामोरं जाणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होईल का?


गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल असे वातावरण होते. मात्र, ९० जागांपैकी फक्त ३५ जागांवर विजय मिळाल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. ५४ जागांसह भाजपाने इथे सत्ता स्थापन केली आहे. कथित महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणामध्ये भूपेश बघेल यांचेही नाव आले होते. या प्रकरणावरून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तसेच भाजपाच्या सर्व प्रचारकांनी आणि कार्यकर्त्यांनी महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणावरून काँग्रेसला लक्ष्य केले होते. यामुळे निवडणुकीत काँग्रेस विरोधात मतदान झाल्याची चर्चा होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये छत्तीसगडच्या ११ लोकसभा मतदारसंघांपैकी ९ मतदारसंघांमध्ये भाजपाला यश मिळाले होते. या जागा कमी होतील की वाढतील, यावर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.