आगामी वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. यावेळी भाजपाने पश्चिम बंगालकडे विशेष लक्ष दिले आहे. भाजपाचे नेते गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालचा सातत्याने दौरा करत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाहदेखील मंगळवारी (२६ डिसेंबर) पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. आपल्या दौऱ्यादरम्यान या नेत्यांनी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचा आदेश दिला. तसेच आगमी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्यातून भाजपाचा कमीत कमी ३५ जागांवर विजय झाला पाहिजे, अशा पद्धतीने तयारी करा, असेही या नेत्यांनी स्थानिक नेत्यांना सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये गेल्यानंतर शाह, नड्डा यांनी तेथील वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्थानिक नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. वेळ वाया घालू नका, असे सांगितले.

“भाजपाचा विजय झाला पाहिजे”

आपल्या या दौऱ्यात शाह आणि नड्डा यांनी खास पश्चिम बंगालसाठी १५ सदस्यीय निवडणूक नियोजन समितीची स्थापना केली. पश्चिम बंगालमध्ये एकूण ४२ जागांपैकी कमीत कमी ३५ जागांवर भाजपाचा विजय झाला पाहिजे. त्या दृष्टीने रणनीती आखा, असेही या द्वयींनी स्थानिक नेत्यांना सांगितले.

“३५ जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करा”

या बैठकीबाबत पश्चिम बंगालमधील भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने अधिक माहिती दिली. “अमित शाह आणि नड्डा यांनी स्पष्ट संदेश दिला आहे. आम्ही तयारीला लागावे. ३५ जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करावा. लोकांपर्यंत पोहोचणे तसेच पक्ष संघटना बळकट करणे, यावर भर द्यावा लागेल. बूथपासून ते जिल्हा स्तरापर्यंत हे काम करावे लागेल, असा संदेश त्यांनी आम्हाला दिला आहे,” असे या नेत्याने सांगितले.

निवडणूक नियोजन समितीची स्थापना

“१५ सदस्यीय निवडणूक नियोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या निवडणूक समितीवर असेल. निवडणुकीची तयारी तसेच निवडणुकीसाठीची रणनीती अशी सर्वच कामे या समितीला करावी लागणार आहेत,” अशी माहिती या नेत्याने दिली.

२०१९ सालच्या निवडणुकीत भाजपाचा १८ जागांवर विजय

दरम्यान, २०१९ सालच्या निवडणुकीत भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीत १८ जागांवर तर तृणमूल काँग्रेसने २२ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर २०२१ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७७ जागा तर तृणमूल काँग्रेसने तब्बल २३१ जागांवर विजय मिळवत निवडणूक जिंकली होती.

तृणमूल काँग्रेसवर मात करण्यात अपयश

भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. या पक्षाने काँग्रेस आणि डाव्यांना मागे टाकले आहे. असे असले तरी भाजपा तृणमूल काँग्रेसवर मात करू शकलेली नाही. २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या एकाही पोटनिवडणुकीत भाजपाला जिंकता आलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाला पराभवाची भीती- कुणाल घोष

शाह, नड्डा यांच्या या भेटीवर तृणमूल काँग्रेसे प्रवक्ते कुणाल घोष यांनी प्रतिक्रिया दिली. “भाजपा घाबरलेली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव होणार आहे, हे त्यांना माहिती आहे. याच कारणामुळे ते सातत्याने पश्चिम बंगालचा दौरा करत आहेत. असे असले तरी ते पश्चिम बंगालचा जेवढा दौरा करतील, त्यांची तेवढीच मते कमी होतील,” असे कुणाल घोष म्हणाले.