महायुतीत नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद मिटलेला नाही. परंतु, यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात कुठल्याही अडचणी येणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे म्हणणे आहे. कुंभमेळ्यासाठी विविध विभागांचे मिळून सुमारे २० हजार कोटींहून अधिकचे आराखडे सरकारकडे सादर झालेले आहेत. सिंहस्थास कमी कालावधी राहिल्याने ही कामे पूर्णत्वास नेण्याचे आव्हान आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अजून एकाही कामाला सुरुवात झालेली नाही. यावर उपमुख्यमंत्री अजितदादांनी काळजी नसावी, असा पवित्रा घेतला.
‘खर्ची ’ गेल्याचे दु:ख
सांगलीती एका तालुक्यातील गावात हाणामारी झाली. यात एका बाजूच्या व्यक्तीला जबर मारहाण झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल करून अधिकाऱ्यांनी तक्रारदाराची समजूत काढली. मध्यस्थामार्फत संशयितांकडून भलीमोठी बिदागीही उचलली. मध्यस्थाच्या हातावर चार रूपड्या पंचायतीच्या निवडणूक खर्चासाठी पडल्या. पण नशिबच खोटं निघाल. बिदागी पचवून अधिकाऱ्यांनी दिलेला ढेकर गावभर ऐकायला आला असतानाच तक्रारदाराचा मृत्यू झाला. बिदागी तर परत द्यावीच लागली आणि अपचनाची करपट ढेकरही सोसावा लागला. त्यामुळे निवडणुकीसाठी मिळालेली खर्चीही वाया गेली त्याचे दु:ख अधिक.
फोनची ‘रिंग’ चर्चेत
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) पक्षांतर्गत बदलाचे वारे वाहू लागल्याने काही पदाधिकारी हे सध्या फारच सक्रिय झाले आहेत. शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर शहराचे नेतृत्त्व हाती घेण्यासाठी अनेक पदाधिकारी उतावीळ झाले आहेत. एक आठवडा पक्षाचा कारभार अध्यक्षाविना सुरू असल्याने कोणत्याही क्षणी अजित पवार हे एखाद्या पदाधिकाऱ्याला फोन करून भेटण्यासाठी निरोप धाडणार, असे बोलले जाते. त्यामुळे सध्या ‘राष्ट्रवादी’मध्ये घड्याळापेक्षा ‘फोनची रिंग’ जास्त चर्चेत आहे.
(संकलन : अनिकेत साठे, दिगंबर शिंदे, सुजित तांबडे)