मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आपली कोणतीही स्पर्धा नाही. ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करीत आहेत तर आम्ही महायुतीच्या विजयासाठी प्रयत्न करीत आहोत, असे स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांबरोबर पुन्हा हातमिळवणी करणार का, या प्रश्नावर मौन बाळगत थेट उत्तर देण्याचे टाळले.

अजित पवार किंवा पक्ष सोडून गेलेल्या अन्य नेत्यांना पक्षात परत प्रवेश देण्याचा निर्णय हा माझ्या आव्हानत्मक काळात साथ दिली त्यांच्याशी सल्लामसलत करून घेतला जाईल, असे शरद पवार यांनी मध्यंतरी विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर ‘ए.एन.आय.’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी शरद पवारांबरोबर पुन्हा जाण्याच्या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळले.

हेही वाचा >>>Ajit Pawar: लोकसभेला चूक झाली, हे अजित पवार आताच का बोलत आहेत? बारामती विधानसभेच्या निकालाची भीती?

ते म्हणाले, मी महायुतीचा घटक पक्ष म्हणून निवडणूक लढत आहे. शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. गेली ६२ वर्षे ते राजकारणात सक्रिय आहेत. भविष्यातही आम्ही त्यांचा आदर राखू. दोन पिढ्यांनी पवारांचे राजकारण बघितले आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकारणाची कार्यपद्धती वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष म्हणून लढत असून, महायुती पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री कोण होईल या प्रश्नावर निवडून आल्यावर सर्व आमदार एकत्र बसून नेता निवडतील, असे उत्तर अजित पवार यांनी दिले. मुख्यमंत्री महायुतीचाच होईल, असा दावा त्यांनी केला.

शरद पवार हे त्यांच्या पक्षाच्या प्रचाराची बाजू सांभाळत आहेत. १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत होतो. यामुळे मला पक्षाची कार्यपद्धती चांगलीच अवगत आहे. आमचे मार्ग आता वेगळे आहेत. महायुतीच्या माध्यमातून आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या खोट्या कथानकावर विश्वास ठेवून लोकांनी मते दिली होती. पण विधानसभा निवडणुकीत लोक ती चूक करणार नाहीत. महायुती सरकारने अर्थसंकल्पात लोकहिताच्या अनेक योजना मांडल्या आहेत. काम करणारे कोण हे लोकांना चांगले समजते. यामुळे कोणी कितीही दावे केले तरीही महायुतीच पुन्हा सत्तेत येईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>BJP : भाजपा ‘वृद्धांचा’ पक्ष ? विरोधक तरुण नेत्यांना संधी देत असताना पार्टीसमोरचं वयोवृद्धांचं आव्हान?

बारामती मतदारसंघातून पत्नी सुनेत्राला उभे करण्यात माझी चूक झाली याची कबुलीही अजित पवार यांनी पुन्हा दिली. सुनेत्रा यांच्या उमेदवारीवरून केलेल्या विधानाने महायुतीत नाराजी पसरली हा सारा भ्रम आहे. मला कोणीही या बद्दल विचारलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बसून सारे निर्णय घेतो. महायुतीला जनतेचा चांगला पाठिंबा मिळत आहे हे मला सध्या सुरू असलेल्या जनसन्मान यात्रेत अनुभवास येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जातनिहाय जनगणना आवश्यक

इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती व जमाती तसेच भटके विमुक्त यांची प्रत्यक्ष लोकसंख्या किती याची माहिती जमा करण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक, अशी भूमिकाही अजित पवार यांनी मांडली. केंद्र व राज्यांच्या योजनांचा समाजातील सर्व वर्गांना लाभ देण्यासाठी या जनगणनेचा उपयोग होऊ शकेल. तसेच प्रत्येक समाजाची लोकसंख्या किती हे एकदा निश्चित होईल, असे मतही त्यांनी मांडले. आगामी जनणगनेबरोबरच जातनिहाय जनगणना व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.