Madhya Pradesh BJP MLA and District Collector Clash : मध्य प्रदेशमधील भिंड जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (२६ ऑगस्ट) रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. या आंदोलनादरम्यान सत्ताधारी भाजपाचे आमदार नरेंद्र सिंह कुशवाह यांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांनाच दमदाटी केली. “सर्वांत मोठा चोर तूच”, अशी एकेरी भाषा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात वापरली. इतक्यावरच न थांबता, आमदार महोदय त्यांच्या अंगावरही धावून गेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. याच मुद्द्याला हाताशी धरून काँग्रेसच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत आमदार कुशवाह हे जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव यांच्यावर हात उगारताना दिसून येत आहेत. तर, संतप्त शेतकरी हे सरकारी अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत आहेत. काही दिवसांपासून मध्य प्रदेशमध्ये खतांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामाच्या तोंडावरही खतं मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत. सहकारी संस्थांकडून आम्हाला फक्त एक किंवा दोनच खतांच्या गोण्या दिल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. खुल्या बाजारात युरियाची चढ्या दरानं विक्री होत असल्याच्या तक्रारीही त्यांनी अनेकदा प्रशासनाकडे केल्या आहेत.

जिल्हाधिकारी काय म्हणाले?

खतांच्या वारंवार निर्माण होणाऱ्या टंचाईवरून संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सत्ताधारी भाजपाचे आमदार नरेंद्र सिंह कुशवाह हेदेखील मोर्चात सहभागी झाले. यावेळी खतांची कुठलीही चोरी होऊ देणार नाही, असं आश्वासन जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी आंदोलनकर्त्यांना दिलं. त्यावर “सर्वांत मोठा चोर तूच आहेस” असं प्रत्युत्तर कुशवाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. इतकंच नाही तर, आमदार महोदय जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावरही धावून गेले. तणाव वाढल्यानं भिंडचे पोलीस अधीक्षक असित यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजीव पाठक आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी एल. के. पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

आणखी वाचा : गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात सदाभाऊ खोत यांचा घरचा अहेर; गोरक्षकांनी का केला हल्ला?

भाजपा आमदाराचा आरोप काय?

आमदार कुशवाह यांनी चंबळचे आयुक्त मनोज खत्री यांच्याशी फोनवर बोलून जिल्हा प्रशासन सध्याच्या संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनही केलं. सरकारी अधिकारी हे जाणूनबुजून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आमदार कुशवाह केला. खतांच्या टंचाईमुळे विदिशा, गुना, अशोकनगर, रायसेन, हरदा, होशंगाबाद व बैतुल यांसारख्या जिल्ह्यांमध्येही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली.

अनेक राज्यांमध्ये खतांची टंचाई

केवळ मध्य प्रदेशच नाही, तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश व हरियाणामध्येही खतटंचाईची समस्या असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील श्योपूर व छिंदवाडा येथे संतप्त शेतकऱ्यांनी ‘रास्ता रोको’ केला आहे. तसेच, भोपाळ, टिकमगढ व सागरमधूनही आंदोलनांची नोंद झाली आहे. भारतीय किसान संघाचे (Bhartiya Kisan Sangh) वरिष्ठ नेते राहुल धूत यांनी गेल्या आठवड्यात ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितलं की, काळाबाजार हे खतांच्या टंचाईचं मोठं कारण आहे. सरकारकडे पुरेसा खतांचा पुरवठा असल्याचं सांगितलं जात आहे; पण चढ्या दराने विक्री करून, स्थानिक विक्रेते त्यातून मोठा नफा कमावत आहेत.

दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मात्र खतांची टंचाई नसल्याचा दावा केला आहे. मध्य प्रदेश राज्य सहकारी विपणन महासंघाचे बी. एस. भेडकर यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितलं की, ऑगस्ट महिन्यासाठी ३.५ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त खतांचं वाटप करण्यात आलं आहे. सध्या काही भागांत खतांचा तुटवडा निर्माण झाला असेल आणि अतिरिक्त मागणी असल्यास ती पूर्ण केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : “गुजरात दंगलींसंदर्भात नरेंद्र मोदींची मुलाखत प्रकाशित न करण्यासाठी होता दबाव”, माजी खासदाराच्या दाव्याने खळबळ; नक्की काय म्हणाले?

विरोधकांकडून सरकारवर टीका

आमदार नरेंद्र सिंह कुशवाह यांनी भिंडच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर केलेल्या गैरवर्तनावर काँग्रेसचे आमदार व विधानसभेतील विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपाच्या आमदारानं जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घुसून त्यांना धमकावण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण, यातून एक सत्य समोर आलं आहे की, राज्यातील शेतकरी खतांच्या टंचाईमुळे त्रस्त आहेत. मुख्यमंत्री मोहन यादव आणि त्यांचे प्रशासकीय अधिकारी सतत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत,” अशी टीका सिंघार यांनी केली आहे.

“आज सत्तेत असूनही भाजपच्या आमदाराला खतटंचाईच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन धमकी देण्याचा मार्ग पत्करावा लागला आहे. हे सरकारचं अपयश आहे. आगामी निवडणुकीत मध्य प्रदेशमधील शेतकरी भाजपाला चांगलाच धडा शिकवतील”, असंही सिंघार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आमदार नरेंद्र सिंह कुशवाह यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना दमदाटी केल्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपा सरकारची चांगलीच कोंडी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे खतांचा तुटवडा भरून काढून मुख्यमंत्री मोहन यादव शेतकऱ्यांना कसं शांत करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.