मुंबई : महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विरोधक सातत्याने विचारत आहेत. मी मुख्यमंत्रीपद सोडले ते महाराष्ट्रासाठी. मी माझ्यासाठी लढत नसून महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतो आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आताच जाहीर करावा. त्याला माझा पाठिंबा आहे, या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका शुक्रवारी स्पष्ट केली.

‘मविआ’च्या निर्धार मेळाव्याचे षण्मुखानंद सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते. ‘लोकसभेची लढाई संविधान वाचवण्याची होती, विधानसभेची लढाई महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र संस्कृती वाचवण्याची आहे. ‘मविआ’चे दूत म्हणून गावागावात जा आणि आपल्या कामाचा प्रचार करा. वज्रमूठ शब्दात नको, ती प्रत्यक्षात हवी. उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल. पण त्यांना झोपवू याची शपथ घ्या, असे आवाहन उद्धव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. ५० टक्क्यांच्या पुढे आरक्षण नेऊन मराठ्यांना आरक्षण देण्यास आपला पाठिंबा आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> कारण राजकारण : कागलची बदलती समीकरणे कुणाच्या पथ्यावर?

‘भाजपात २५ वर्षे भोगले ते आघाडीत होता कामा नये. ज्यांच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे धोरण नको. आघाडीत पाडापाडीचे राजकारण होता कामा नये. जागा कुणाच्याही वाट्यास येवो एकदिलाने प्रचार करा. लोकसभा निवडणुकीने दाखवलेली दिशा कायम ठेवण्यासाठी विधानसभेची निवडणूक जिंकावीच लागेल. या शब्दात उद्धव यांनी ‘मविआ’ नेत्यांना कानपिचक्या दिल्या. केंद्र सरकार टेकूवर असल्याने मोदी आता धर्मनिरपेक्ष शब्द वापरायला लागेलत, तुम्ही हिंदुत्व सोडले असे आम्ही म्हणू काय’, अशी विचारणा त्यांनी केली.

बौद्ध आणि मुस्लीम मतदारांचा उद्धव यांनी विशेष उल्लेख केला. ‘वक्फ’बरोबरच धार्मिक जमिनी उद्याोगपतींना देण्यास विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अयोध्येतील जमिनी व केदारेश्वराचे सोने कोणाच्या घशात गेले, याप्रश्नी लोकसभेची संसदीय चिकित्सा समिती नेमा, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुती सरकारची बहीण लाडकी नसून कंत्राटदार लाडका आहे. लोकसभेला जर चारशे पार गेले असते तर देशात आतापर्यंत भाजपचे संविधान लागू झाले असते, अशी टीका शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.