गडचिरोली : बंडखोरांवर कारवाई करताना भाजपने अहेरी विधानसभेतून अपक्ष लढत असलेल्या अम्ब्रीशराव आत्राम यांना अभय दिले. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसनेही या विधानसभेतील बंडखोरांवर कोणतीही कारवाई न केल्याने युती, आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसने केलेल्या कारवाईत आरमोरी आणि गडचिरोलीतील बंडखोर उमेदवारांचा समावेश होता. परंतु अहेरीला यातून वगळण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात अस्वस्थता आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत सर्वाधिक बंडखोरी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आली. यातील काहींचे बंड शमवण्यात पक्षातील नेत्यांना यश आले. मात्र, आरमोरीतील माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. शिलू चिमूरकर गडचिरोलीतून डॉ. सोनल कोवे आणि अहेरीतून हणमंतू मडावी, नीता तलांडी या बंडखोरांनी माघार घेतली नाही. त्यामुळे पक्षाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यात आनंदराव, गेडाम, सोनल कोवे, शिलू चिमूरकर आदींवर कारवाई करण्यात आली. मात्र, अहेरीतील हणमंतू मडावी, नीता तलांडी आणि कुटुंबाला अभय देण्यात आले. यातील नीता तलांडी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून उभ्या आहेत. त्यांच्यासोबत वडील माजी आमदार पेंटारामा आणि आई सगुणा तलांडी देखील बच्चू कडूसोबत एकाच मंचावर दिसून आले. तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. दुसरीकडे काँग्रेस आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या साथीने अपक्ष खिंड लढवीत आहेत. जागावाटपावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये अहेरीवरून खडाजंगी झाली होती. त्यामुळे मडावी यांना काँग्रेसचा छुपा पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून लढत असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्या गोटात अस्वस्थता आहे.

हेही वाचा – रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

हेही वाचा – आरक्षणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या घनसावंगीमध्ये मनोज जरांगे कोणाच्या बाजूने ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडेट्टीवारांचे विशेष लक्ष?

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हणमंतू मडावी आणि अजय कंकडालवार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय समजल्या जातात. मडावीच्या उमेदवारीसाठी वडेट्टीवार यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला गेल्याने त्यांची निराशा झाली. त्यामुळे ते आघाडी धर्म पाळणार याची शक्यता कमीच आहे. जागा वाटपापूर्वी झालेल्या सभेत वडेट्टीवार यांनी शरद पवार गटाच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम आणि त्यांच्या पतीविरोधात वक्त्यव्यही केले होते. त्यामुळे अहेरी विधानसभेत वडेट्टीवार गट महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी हणमंतू मडावी यांचा प्रचार करताना दिसून येत आहे.