नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने ओबीसी एकीकरणासाठी जोरदार प्रचार सुरू केला असून, काँग्रेसला गरीब ओबीसींचे हक्क हिसकावून घेऊन ते मुस्लीमांना द्यायचे आहेत. मुस्लीमांमधील कर्मठ आणि विभाजनवादी संस्था-संघटनांशी मतांसाठी काँग्रेसने संगनमत केले आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी केला.

लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लीमांनी महाविकास आघाडीला मते दिल्यानंतर मतांसाठी ‘जिहाद’ पुकारल्याची टीका भाजपच्या नेत्यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीमध्येही काँग्रेस मुस्लीमांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा दावा प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केला. मराठी मुस्लीम सेवा संघाने उघडपणे महाविकास आघाडीला मते देण्याचे आवाहन मुस्लीमांना केल्याचा दावाही प्रसाद यांनी केला. झारखंडमध्ये काही दिवसांपूर्वी ‘ऑल इंडिया उलेमा बोर्डा’ने विरोधकांच्या आघाडीला पाठिंब्याचे आवाहन केले होते. आता महाराष्ट्रात मराठी मुस्लीम सेवा संघाने पत्रक काढले असून, महाविकास आघाडीचा प्रचार केला जात आहे. जे लोक महाराष्ट्राच्या हिताविरोधात आहेत, शरियतला विरोध करतात, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ आणि वक्फ मंडळांना विरोध करतात, त्यांना विजयी होऊ देणार का, असा सवाल या पत्रकांमधून केला जात आहे.

हेही वाचा >>> पंतप्रधानांना संविधानाची जाणच नाही; गोंदिया येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांची टीका

या संघटना संकुचित विचारांच्या असून त्यांच्या आधारे काँग्रेस महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही प्रसाद यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘…तर भाजपचा कडाडून विरोध’

काँग्रेस ओबीसी व दलित विरोधी आहे. मुस्लीमांनाही अनुसूचित जातींचा दर्जा देऊन आरक्षणाचा लाभ मिळवून देणार आहे का, हे काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याला भाजप तीव्र विरोध करेल. अनुसूचित जातींचे अधिकार कोणीही काढून घेऊ शकत नाही. तसे झाले तर भाजप कडाडून विरोध करेल, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.