मुंबई: विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर आता विधान परिषद सभापतीपदाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महायुतीतील शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजप या तिन्ही पक्षांतील इच्छुकांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मागील अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या या पदाची जबाबदारी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांभाळली असून पुन्हा त्यांनाच संधी मिळते की भाजप आणि राष्ट्रवादीतील इच्छुकांना संधी मिळते यासाठी तिन्ही पक्षांत चर्चा सुरू आहे.

रामराजे नाईक निंबाळकर हे सभापतीपदावरून पायउतार झाल्यानंतर हे पद अद्याप रिक्त आहे. शिवसेनेकडून (शिंदे) या पदासाठी दावा करण्यात येत असून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सभपतीपदासाठी इच्छुक आहेत. त्यांना संधी मिळाल्यास त्या पहिल्या महिला सभापती ठरणार आहेत. त्यादृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे भाजपकडून विधान परिषद सदस्य राम शिंदे यांचे नाव आघाडीवर असून विधानसभा आणि विधान परिषदेतही सर्वात मोठा पक्ष म्हणून या पदावर अधिक दावा केला जात आहे. राम शिंदे यांचा विधानसभेला रोहित पवार यांच्याकडून निसटत्या मतांनी पराभव झाला असला तरी सभापतीपदासाठी ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. राष्ट्रवादीकडूनही (अजित पवार) याआधी सत्तेत सहभागी होण्यासाठी मंत्रीपदाबरोबरच विधान परिषदेच्या सभापतीपदाबाबतही बोलणी झाली होती. त्यामुळे त्यांच्याकडूनही या पदावर दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?

सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी काही हालचाली होण्याची शक्यता आहे. विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख ही राज्यपालांकडून निश्चित केली जाते. त्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती करणारे पत्र राज्यपालांना पाठवावे लागते. त्यानुसार पुढील निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित हाेतो. त्यामुळे मंत्रीमंडळाबरोबरच सभापतीपदासाठी नाव निश्चित करण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर राहणार आहे.

हेही वाचा – Mosque Row in UP: मशिदीच्या जागेवर हिंदूंचे दावे; २०२७ त्या उत्तर प्रदेश विधासनभा निवडणुकांची तयारी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधान परिषदेच्या काही जागा सध्या रिक्त आहेत. राज्यपाल नियुक्त १२ पैकी सात जागा भरण्यात आल्या. त्यातील पाच जागा अद्यापही रिक्त आहेत. याशिवाय विधान परिषदेचे सहा सदस्य विधानसभेवर निवडून आल्याने त्या जागाही रिक्त झाल्या आहेत. महायुतीचे बहुमत असल्याने कदाचित हिवाळी अधिवेशनात सभापतीपदाची निवडणूक घेतली जाऊ शकते.