नागपूर : सात दिवसांपूर्वी (२६ ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी राजकारण आणि क्रीडाक्षेत्र यात ‘खेळाडूडू वृत्ती ’ हा समान धागा असल्याचे सांगितले व त्यामुळेच क्रीडा संघटनांमध्ये राजकारणी काम करीत असतात,असेही स्पष्ट केले.
हे सांगण्याचे कारण ज्या स्पर्धेचे उद्घाटन फडणवीस यांनी केले ती महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनव्दारे आयोजित केली होती व या संघटनेचे अध्यक्ष आहेत फडणवीस यांचे विश्वासू आमदार संदीप जोशी. ते उद्या (रविवारी) होत असलेल्या महाराष्ट्र ऑलंम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत देखील उमेदवार आहेत. या निवडणुकांमुळेच कदाचित मुख्यमंत्र्यांनी खेळाडू वृत्तीचे धडे दिले असावेत. पण प्रत्यक्षात या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडत असल्याचे दिसून येत आहे. त्याची सुरूवात संदीप जोशी यांनी थेट अजित पवार यांच्यावर आरोप करून केली आहे.
महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेची निवडणूक राजकीय चर्चेचा विषय ठरली कारण राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील मित्रपक्ष या निवडणुकीत परस्परांविरोधात उभे ठाकले आहेत. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध भाजपचे नेते केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे तर मोहोळ यांच्याच गटाकडून उपाध्यक्षपदासाठी आमदार संदीप जोशी रिंगणात आहेत. एकूणच अजित पवार यांच्या गटाविरोधात मुख्यमंत्री फडणवीस यांचे दोन कट्टर समर्थक रिंगणात आहे.
क्रीडा संघटनेची निवडणूक असली तरी ती राजकारण्यांच्या सहभागामुळे राजकीय वळणावर जाईल याचा अंदाज आल्यानेच फडणवीस यांनी नागपूरच्या कार्यक्रमात खेळाडू वृत्तीचा मुद्दा मांडला. त्यांचे विधान प्रतीकात्मक म्हणजे क्रीडा संघटनांमध्ये काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी मतभेद सौम्य ठेवावेत, सार्वजनिक आरोप-प्रत्यारोप टाळावेत, ही त्यामागची भावना होती. पण त्यांच्या स्वतःच्या समर्थकांनीच अजित पवार यांच्यावर थेट आरोप करून त्याच भावनेला तडा दिला. आता संदीप जशी यांनी थेट अजित पवार यांचे नाव घेऊनच आरोप केल्याने पवार गटालाही त्याचे प्रतिउत्तर देणे आले. ते त्यांनी थेट वृत्त वाहिन्यांकडे न न जाता ‘ अजित पवार न्यूज अपडेट’ या माध्यमांसाठी असलेल्या व्हॅाटस् ॲप ग्रुपवर निवेदन टाकून दिले. त्यात केलेले दावे खळबळजनकच आहे.
जोशी यांनी पवार यांच्यावर ते भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठिशी घालत आहे, अजित पवार गटाचे क्रीडा मंत्री दबाव आणत असल्याचा आरोप केला होता, तो फेटाळताना पवार यांनी प्रतिस्पर्धी गटाने थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर क्रीडा संघटनांना बोलावल्याचा दावा करण्यात आला, निवडणूक अधिकाऱ्याला मध्यरात्री पोलीस ठाण्यात बोलवण्यात आल्याचा आरोप करून थेट आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले.
सांगायचे ऐवडेच राजकारणी कुठेही गेले तरी ते राजकारणच करतात खेळाडूवृत्तीची भावना भाषणापूरती असते हे यावरून स्पष्ट होते.
