Maharashtra Agriculture Minister Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांनी गेल्या वर्षभरात एकापाठोपाठ एक वादग्रस्त प्रसंगाचा सामना केला. काही महिन्यांपूर्वी एका गुन्हेगारी प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली होती. आता ते विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान ऑनलाईन रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट केला. त्यानंतर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कोकाटे यांची दमछाक झाल्याचं दिसून आलं. फेब्रुवारीमध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने ३० वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

तत्कालीन आमदार, खासदार यांच्या कोट्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणार्‍या सदनिका मिळवताना कागदपत्रांमध्ये फेरफार व फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. १९९७ मध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कोकाटे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. फेब्रुवारीमध्ये जवळपास ३० वर्षांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल दिला आणि कोकाटे यांना दोषी ठरवलं. सध्याच्या कायद्यानुसार, कोणत्याही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीस दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. मात्र, कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयातून शिक्षेवर स्थगिती मिळवून मंत्रीपद आणि आमदारकी दोन्ही पदे वाचवली.

सतत वादात सापडणारे माणिकराव कोकाटे कोण आहेत?

  • माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलेले आहेत.
  • १९९९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक जिंकली.
  • २००४ मध्ये ते दुसऱ्यांदा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले.
  • २००९ मध्ये कोकाटे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्यांदा आमदार झाले.
  • २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
  • २०१९ मध्ये कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि चौथ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली.
  • एकसंध राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर कोकाटे यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
  • २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजय मिळवल्यानंतर त्यांना महायुती सरकारमध्ये कृषीमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली.

हेही वाचा : राज ठाकरे यांनी भाषणात उल्लेख केलेलं गुजरातमध्ये बिहारींना मारहाण प्रकरण नेमकं काय आहे?

माणिकराव कोकाटे आतापर्यंत कोणकोणत्या वादात?

फेब्रुवारीमध्ये नाशिक जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवण्याच्या काही दिवस आधी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. “एखादा भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण इथे आम्ही फक्त एका रुपयात पीक विमा देतो, तरीही काही लोक त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात,” असे कोकाटे म्हणाले होते. त्यांनी असा आरोपही केला की, इतर राज्यांतील अर्जदार या योजनेचा गैरवापर करीत आहेत. एप्रिल महिन्यात कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करीत शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक पीककर्जाची परतफेड न करण्याचा आरोप केला. “तुम्ही कर्ज घेता आणि मग ते पाच-दहा वर्षं भरत नाही, कारण तुम्हाला वाटतं सरकार ते माफ करेल. शेतकरी आता शेतीमध्ये गुंतवणूक करत नाहीत. सरकार ड्रिप सिंचनापासून ते तलाव आणि पाईपलाईनपर्यंत सर्व गोष्टींसाठी मदत देते,” असे ते म्हणाले होते.

संजय राऊतांनी माणिकराव कोकाटेंना सुनावलं

रविवारी, माणिकराव कोकाटे पुन्हा एका नव्या वादात अडकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये कोकाटे हे विधानसभा अधिवेशनादरम्यान त्यांच्या मोबाईलवर ‘रम्मी’ हा ऑनलाईन पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचे दिसत होते. या संपूर्ण प्रकारानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्यावर टीकेचा भडिमार केला. “महाराष्ट्रात अमानुष पद्धतीने राज्यकारभार सुरू आहे. तीन महिन्यात महाराष्ट्रात ६५० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दोन शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लातूरहून मुंबईला चालत आले. त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला आमच्या कृषीमंत्र्यांकडे वेळ नाही. त्यांची विधाने पाहिली तर सरकारने कृषी क्षेत्राला काय योगदान दिले आहे हे कळून येईल, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

minister accused of playing Rummy in Assembly Who is Manikrao Kokate
राज्याचे कृषीमंत्री विधानसभा अधिवेशनादरम्यान मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : विधानसभा निवडणुकीआधी ६०० जणांचे फोन टॅपिंग? पोलिसांचा नेमका दावा काय?

बच्चू कडूंची कृषीमंत्री कोकाटेंवर टीका

माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली. कृषीमंत्री कोकाटे रमी खेळताना बैठक घेताहेत. हे शेतकऱ्यांचे दुर्देव आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती गठित केलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. कृषीमंत्र्यांची ही आठवी, नववी चूक आहे, त्यांच्याकडून आता काय अपेक्षा करणार, असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी केला आहे. विवाह समारंभावर होणारा खर्च आणि मद्यपान केल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत, असे एकीकडे सरकारमधील लोक म्हणतात; पण आमचे कृषीमंत्रीच जर रमीत गुंग होत असतील, तर शेतकऱ्यांचे काय भले होणार आहे, असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषीमंत्री म्हणतात- मी सभागृहात गेम खेळत नव्हतो

दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना म्हणाले, “मी विधानपरिषदेत कामकाजासाठी बसलो होतो. तेव्हा सभागृह काही वेळासाठी तहकूब झाले असावे. म्हणून मी खालच्या सभागृहात (विधानसभेत) काय कामकाज सुरू आहे, हे पाहण्यासाठी मी युट्यूबवर गेलो होतो. युट्यूबवर व्हिडीओ सुरू केल्यानंतर जाहिराती येत असतात. त्याप्रमाणेच त्यावेळी सदर जाहिरात आली. मी जाहिरात स्किप करून पुढे गेलो. पण व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनी फक्त १८ सेकंदाचाच व्हिडीओ दाखवला. माझ्यावर विरोधी पक्ष वैयक्तिक टीका करतो. कधी माझ्या कपड्यांवर कधी एखाद्या विधानावर टीका केली जाते; पण माझ्या धोरणांवर, कामावर किंवा मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांवर विरोधी पक्ष कधीही बोलत नाही, असंही ते म्हणाले.