Chhagan Bhujbal News : जवळपास सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. ७७ वर्षांचे भुजबळ पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मंत्री झाले. काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप झाल्यानंतर अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर भुजबळ यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू होती. अखेर आज (तारीख २० मे) भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यातील ओबीसींचा मजबूत चेहरा म्हणून महायुतीने भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याची चर्चा आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीमधील आपल्या मंत्र्यांचा कोटा कायम ठेवला आहे. राज्यात सलग दुसऱ्यांदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं होतं. तरीही त्यांनी स्वतःचं राजकीय अस्तित्व कायम ठेवलं. या काळात भुजबळांनी जातीय जनगणनेसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतली होती. जेव्हा केंद्र सरकारने पुढील जनगणनेसोबत जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भुजबळ हे त्या निर्णयाचं स्वागत करणाऱ्यांपैकी एक होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे भुजबळ यांनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वावर (अजित पवार) कठोर टीकाही केली होती.
भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान का मिळालं?
केंद्रातील भाजपा सरकारने जातीय जनगणनेबाबत निर्णय घेतल्यानंतर भुजबळ यांना दुर्लक्षित करणं महायुतीसाठी अवघड झालं होतं. कारण, या जनगणनेचा सर्वाधिक फायदा ओबीसींना होणार, अशा चर्चांनी जोर धरला होता. छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा राजकीय चढ-उतारांमधून आपले राजकीय कौशल्य दाखवलं. २०१४ मध्ये राज्यात एकसंध शिवसेना-भाजपा युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भुजबळ यांना तुरुंगातही जावं लागलं होतं. दरम्यान, छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने अजित पवार गटाचे एकट्या नाशिक जिल्ह्यात तीन मंत्री झाले आहेत.
आणखी वाचा : Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचे निम्मे नगरसेवक शिंदे गटात; मुंबई महापालिकाही ताब्यातून जाणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार मराठा समाजाचे नेते मानले जातात. त्यांच्या पक्षालाही मराठा मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचं दिसून येतं. मराठा समाजाबरोबरच इतर मागासवर्गीय समाजाचाही (ओबीसी) राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा पाठिंबा आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात ओबीसी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. त्यामुळेच छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्यात आल्याची चर्चा आहे. भुजबळ यांचं मंत्रीपद हे एक समतोल साधणारा निर्णय असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांमध्ये तणाव आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करीत आहेत. त्यांच्या मागणीला भुजबळ तीव्र विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांपैकी एक आहेत.
छगन भुजबळ महायुतीसाठी का महत्वाचे?
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेणं हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी आणखी एका अर्थानं महत्त्वाचं ठरतंय. कारण, सध्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या पक्षात असले तरी त्यांचे अजूनही शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. सुमारे आठवडाभरापूर्वी भुजबळ यांनी पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य केलं होतं. “ज्या कुटुंबांमध्ये तणाव असतो, ते एकत्र आले तर आनंदाची गोष्ट असते. दोन्ही नेते (अजित पवार आणि शरद पवार) पुन्हा एकत्र आले, तर आपण सामूहिकरित्या अधिक बळकट होऊ,” असं भुजबळ म्हणाले होते.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ काय म्हणाले?
दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एएनआयला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ म्हणाले, “खात्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. मी सर्व विभाग सांभाळले आहेत. त्यामुळे कोणताही विभाग मिळाला तरी चालेल. जो विभाग मिळेल तो सांभाळेन. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून ते रडत आहेत यासंदर्भात मी सरकारशी बोलणार आहे”, असंही ते म्हणाले. २०२४ मध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर एका वरिष्ठ राष्ट्रवादी नेत्याने त्यावेळी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलं होतं, “भुजबळ यांनी सरकारमध्ये आणि संघटनेमध्येही अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. आता त्यांना मागे राहून नव्या पिढीसाठी जागा द्यावी लागेल.”
हेही वाचा : भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशामुळे धनंजय मुंडेची दारे बंद
भुजबळ यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली?
एकेकाळी फळविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या भुजबळ यांचा राजकारणातील प्रवास थक्क करणारा आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एकसंध शिवसेनेत सामील झाले. नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.१९९१ मध्ये त्यांनी शिवसेना सोडून १६ आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा निर्णय शिवसेनेसाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता. या निर्णायक हालचालीमागे तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांचा मोठा हात असल्याचं मानलं जातं. १९९९ मध्ये शरद पवार यांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसपासून वेगळं होऊन राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली, तेव्हा भुजबळ त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर त्यांनी सरकारांमध्ये महत्त्वाची मंत्रिपदं सांभाळली.
भुजबळांमुळे महायुतीचा होणार फायदा?
२ जुलै २०२३ रोजी भुजबळ यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अनेकांना आश्चर्यचकित केले. राजकीय विश्लेषकांच्या मते भुजबळ हे भाजपाशी सलोखा साधण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यांनी २०१६-२०१८ या काळात दोन वर्षं तुरुंगवासही भोगलेला आहे, त्यामुळे त्यांचा काळजीपोटी निर्णय असल्याचं मानलं जातं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केल्यानंतर भुजबळ हे मंत्रिपदासाठी आघाडीच्या नावांमध्ये होते. आता ते पुन्हा मंत्रिमंडळात परतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते कसे काम करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.