पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमाचे आज (दि. ३० एप्रिल) शंभर भाग पूर्ण झाले आहेत. भाजपाकडून या कार्यक्रमाची जोरदार जाहीरात होत असताना विरोधकांनी मात्र सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. पंतप्रधान मोदी हे भारत-चीन सीमा विवाद, अदाणी समूह, महागाई, जम्मू-काश्मीरमध्ये वाढलेला दहशतवाद अशा महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देत असल्याची टीका विरोधकांनी केली. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक ग्राफिक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये ‘मन की बात’ विरुद्ध ‘जन की बात’ अशी तुलना करण्यात आली आहे. मन की बात करत असताना आवाज मोठा असतो आणि जेव्हा जन की बात म्हणजे लोकांशी निगडीत प्रश्न असतात, तेव्हा आवाज बंद (Mute) होतो, असे दाखविण्यात आले आहे. जन की बात शीर्षकाखाली बेरोजगारी, महागाई, चीन विवाद, अदाणी, महिलांची सुरक्षितता, १५ लाख आणि वर्षाला दोन कोटी रोजगार अशा प्रश्नांची यादी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या संवाद विभागातेच सचिव खासदार जयराम रमेश यांनीदेखील ट्विटरवरून मोदींच्या कार्यक्रमावर निशाणा साधला. ते म्हणाले, “आज फेकुमास्टर दिनविशेष आहे. मन की बातचा शंभरावा भाग मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पण मौन की बात कार्यक्रमात देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. चीन विवाद, अदाणी, वाढती आर्थिक विषमता, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणे, जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी कारवाया, महिला कुस्तीपटू खेळांडूचा अवमान, शेतकरी संघटनांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे, कर्नाटक सारख्या तथाकथित डबल इंजिन सरकारमध्ये भ्रष्टाचार आणि भाजपाशी संबंधित असलेले लुबाडणूक करणारे लोक इत्यादी विषयांवर मौन धारण करण्यात आलेले आहे.

हे वाचा >> “मन की बातदरम्यान अनेकदा भावूक झालो, त्यामुळे रेकॉर्डिंग…”, १०० व्या एपिसोडमध्ये नरेंद्र मोदींनी सांगितले किस्से

तसेच आयआयएम रोहतकने मन की बात कार्यक्रमांचा प्रभाव दर्शविणारा आपल्याच मनाचा अहवाल तयार केला आहे. खरंतर आयआयएमच्या संचालकांच्या शैक्षणिक पात्रतेवरच शिक्षण खात्याने प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत.”

दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरून काही प्रश्न विचारले आहेत. दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि भारताच्या मुलींना भाजपाच्या लुटारूकडून का वाचविण्यात येत नाही? तसेच सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कालमर्यादेत सेबीने अदाणी समूहाची चौकशी का पूर्ण केली नाही? हे दोन प्रश्न मोईत्रा यांनी विचारले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या शंभराव्या मन की बात कार्यक्रमात ३० मिनिटे संवाद साधला. यावेळी त्यांनी काही परिवर्तनवादी व्यक्तिमत्त्वांची मुलाखत घेतली. ज्यांचा उल्लेख गेल्या काही भागांमध्ये करण्यात आला होता. मोदी म्हणाले की, मन की बात हा चांगुलपणा आणि सकारात्मकता यांचे मिश्रण असणारा एक उत्तम कार्यक्रम आहे. सेल्फी विथ डॉटर हे सोशल मीडिया अभियान सुरू करणाऱ्या हरियाणामधील सुनील जगलन यांचाही फोनद्वारे या कार्यक्रमात सहभाग नोंदविण्यात आला. हरियाणामध्ये स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर कमी आहे, त्यामुळे सुनील जगलन यांच्या मोहिमेचे विशेष कौतुक करण्यात आले होते.

आणखी वाचा >> विश्लेषण : ‘मन की बात’चे शतक : जगभरातील नेत्यांच्या जनसंवादाच्या कुळकथा काय आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जम्मू आणि काश्मीरमधील पेन्सिलचे उत्पादन घेणारे मन्झूर अहमद यांचा काही दिवसांपूर्वी मोदींनी मन की बातमध्ये उल्लेख केला होता. तसेच कमळाच्या रेशमापासून कापड तयार करणाऱ्या विजयाशांती देवी यांचाही उल्लेख करण्यात आला होता. आजच्या कार्यक्रमात या दोन्ही व्यक्तींचाही लाईव्ह सहभाग घेण्यात आला होता.