सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे मराठवाड्यातील १२ पैकी आठ आमदार फुटले. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची वाट धरल्याने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची पाठराखण करणाऱ्यांमध्ये आता दोन खासदार आणि विधानसभेत निवडून आलेले तीन लोकप्रतिनिधी शिवसेनेत आहेत. परिणाम असा की आता बीड, लातूर, नांदेड, जालना व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सेनेतील निवडून आलेले लोकप्रतिनिधी शिल्लक नाहीत. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार मिळवणे हे शिवसेनेपुढील एक आव्हान ठरण्याची शक्यता आहे.औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यात सेनेत फूट झाली. मात्र, परभणी जिल्ह्यातील शिवसेनेतील आमदार व खासदार उद्धव ठाकरे यांच्या समतवेत असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेत निवडून येणारा लोकप्रतिनिधी शिंदेगटात यायला हवा, असे प्रयत्न केले गेले असल्याचे दिसून येत आहे. त्यात आता खासदारांची भर पडली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणून येणारे खासदार संजय जाधव यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अन्याय होत असल्याची लेखी तक्रार शिवसेना पक्षप्रमुखांकडे केली होती. तत्कालीन पालकमंत्री नवाब मलिक यांनी सेना कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा त्यांचा आरोप होता. परभणी वैद्यकीय महाविद्यालय उभे करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे तसेच बाजार समितीमधील वाद सोडवल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीविरोधातील धार कमी केली. खासदार जाधव यांची भाषा जरी शिंदे गटासारखी असली तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समवेत राहण्याचा निर्णय घेतला. परभणी लोकसभा मतदारसंघात ‘ खान की बाण ’ हा प्रचाराचा प्रमुख केंद्रबिंदू असतो. त्यामुळे अधिक कट्टर शिवसैनिक निवडून येतो हे माहीत असल्याने खासदार जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या समवेत थांबले असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा- अकोला शिवसेनेतील बाजोरिया गट शिंदेंच्या गळाला?

उस्मानाबाद मतदारसंघात तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे भाजपमध्ये असल्याने राजकीयदृष्ट्या टिकाव धरायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याने उस्मानाबादचे खासदार ओम राजेनिंबाळकर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. शिंदे गटाकडून त्यांनाही संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांनी शिवसेनेमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. आता मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांच्या समवेत थांबणाऱ्यांच्या यादीत औरंगाबादमधील विधानसभेत निवडून आलेले उदयसिंह राजपूत, उस्मानाबादचे कैलास पाटील, परभणीचे डॉ. राहुल पाटील असे तीन आमदार व दोन खासदारांचा समावेश आहे.

हेही वाचा- गुलाबराव पाटील यांचा प्रभाव केवळ जळगाव ग्रामीण मतदारसंघातच ?

मराठवाड्यातून विधानपरिषदेतील आमदार व औरंगाबादचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आता शिवसेना पक्षसंघटनेची पदाधिकाऱ्यांच्या पातळीवर अधिक पडझड होणार नाही, यासाठी रोज धडपड करत आहेत. आपल्यासोबत कोण आणि शिंदे गटात कोण याचा तपशील रोज गोळा केला जात आहे. शिवसेनेतील फुटीनंतर निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मराठवाड्याचा वाटा अजूनही मोठा असल्याचे दिसून येत असून एकेकाळी शिवसेनेचा आधारस्तंभ असलेल्या मराठवाड्यात शिवसेनेला अस्तित्वाचा संघर्ष करावा लागत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many mp and mlas from marathwada may join eknath shinde group print politics news pkd
First published on: 19-07-2022 at 14:03 IST