Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्यभरातील असंख्य मराठा बांधवांनी शुक्रवारी मुंबई गाठली. आझाद मैदानावर जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर अनेकांनी दिवसभर तिथेच तळ ठोकला. मुंबईत पावसाच्या सरी कोसळत असल्यानं काही जणांनी रेल्वेस्थानक परिसर, फलाट, भुयारी मार्गातच शुक्रवारची रात्र काढली. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी त्यांनी सोबत आणलेला शिधा खाल्ला आणि विश्रांती घेतली. मराठा आंदोलनासाठी एक दिवसाची मुदत मिळाल्यानं हजारो मराठे रात्री फलाटावरच विसावले होते. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी फिरायचं नाही, असा चंगच जणू त्यांनी बांधला होता.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी पहाटेपासूनच हजारो मराठे मुंबईत दाखल झाले आहेत. जवळपास २५ हजारांहून अधिक आंदोलक आझाद मैदान परिसरात एकत्र जमले आहेत. दिवसभर आंदोलन केल्यानंतर रात्री आंदोलक भुकेनं व्याकूळ झाले होते. मात्र, आंदोलनाला अनेक दिवस लागतील हे गृहीत धरूनच, त्यांनी सोबत कोरडा शिधा आणला होता; तर काहींनी टेम्पोमध्येच स्टोव्हवर स्वयंपाक तयार केला.

मुंबईकरांमध्ये चर्चा… मराठेच ते, तसूभरही…

आझाद मैदानाला लागूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानक आहे. शुक्रवारी आझाद मैदानावरील आंदोलन संपल्यानंतर मराठ्यांनी विश्रांतीसाठी रेल्वेस्थानकाचा ताबा घेतला. यावेळी काही मुंबईकरांनी आंदोलकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाचे डबेही दिले. पाऊस सुरू असल्याने रात्री जागा मिळेल तिथे मराठे झोपले होते. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकातील फलाटावर फक्त मराठ्यांचेच वादळ दिसत होते. त्याशिवाय आजूबाजूचाही परिसर फक्त मराठ्यांच्याच गर्दीने व्यापून गेला होता. त्यांना पाहून मुंबईकरांमध्ये मराठेच ते… तसूभरही मागे हटणार नाहीत, अशीच चर्चा सुरू होती.

आणखी वाचा : मराठा समाजाच्या आंदोलनाला ‘या’ नेत्यांचा पाठिंबा; कोणकोणत्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट?

अपुऱ्या सुविधांमुळे मराठा बांधवांची गैरसोय

आझाद मैदानावरील मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी पोलिसांनी फक्त पाच हजार लोकांना परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव आंदोलनस्थळी दाखल झाले. परिणामी प्रशासनाची तारांबळ उडाली. पोलिसांनी आंदोलकांसाठी आझाद मैदानात पाण्याचे टॅंकर आणि काही प्रमाणात फिरत्या शौचालयांची सोय केली होती. मात्र, संख्या जास्त असल्यानं काहींना नैसर्गिक विधीसाठी रेल्वेस्थानकापासून, रस्त्याच्या आडोशाला आणि मैदानाच्या कडेचा आधार घ्यावा लागला. आझाद मैदान व आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल्स बंद असल्यानं आंदोलकांची मोठी गैरसोय झाली. तरीही त्यांच्यामध्ये आरक्षणासाठी मोठा उत्साह दिसून आला. सरकारनं आमच्यासमोर कितीही अडचणी उभ्या केल्या तरी आम्ही तसूभरही मागे हटणार नाही आणि आरक्षण घेऊनच परतणार, असा निर्धार मराठ्यांनी व्यक्त केला.

Maratha community reservation demand
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकातील फलाटावर शुक्रवारी रात्री फक्त मराठ्यांचेच वादळ दिसत होते. त्याशिवाय आजूबाजूचाही परिसर फक्त मराठ्यांच्याच गर्दीने व्यापून गेला होता. (छायाचित्र लोकसत्ता)

मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

शुक्रवारी दिवसभर व रात्री गैरसोय झाल्यामुळे शनिवारी संतप्त आंदोलकांनी काही वेळ मुंबई महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. मनोज जरांगे पाटील यांनीही माध्यमांबरोबर संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त केला. “हॉटेल बंद करायला लावलं, पाणीही बंद केलं म्हणून आमचे मराठा बांधव संतापले आहेत. भाजपामधील मराठा कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं की, तुमचे मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्यांना मुंबईत आल्यानंतर किती त्रास देत आहेत; पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डोक्यातून हा गैरसमज काढून टाकायला हवा. तुम्हाला योग्य संधी आली असून, मराठ्यांची मनं जिंका आणि समाजाला आरक्षण द्या”, असं जरांगे यांनी म्हटलं.

हेही वाचा : PM मोदींना जितक्या शिव्या द्याल, तितकं कमळ फुलेल; अमित शाह असं का म्हणाले?

महाराष्ट्र अस्थिर करू नका : मनोज जरांगे

यावेळी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशाराही दिला. “तुम्ही चुकूनही आमच्या बांधवांवर लाठीमार करायला लावलात, तर तो दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वांत वाईट दिवस असेल. कारण- तुमच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही अडचण होईल. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. पोलिसांना लाठीचार्ज करायला लावायचा आहे; पण आमच्या आंदोलकांना बोट लागता कामा नये. पुन्हा राज्य अस्थिर करू नका. जर राज्य अस्थिर झालं, तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील. तुम्हाला फक्त मुंबईनं नाही, तर अवघ्या महाराष्ट्रानं मुख्यमंत्री केलं आहे. त्यामुळे तुम्ही अशी दुही निर्माण करू नका”, असंही जरांगे म्हणाले.

आझाद मैदानाकडील रस्त्यावर दोन टन खडी

मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखलच चिखल झाला आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांना येणं-जाणं सोपं व्हावं यासाठी आझाद मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे. आतापर्यंत दोन टन खडी रस्त्यावर टाकण्यात आल्याचं मुंबई पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. त्याच वेळी आंदोलकांच्या सोईसाठी चार वैद्यकीय पथकं, दोन रुग्णवाहिका, पाण्याचे ११ टँकर, २३६ शौचकूपांची व्यवस्था असलेली फिरती शौचालयं अशा सुविधा पुरविण्यात आल्या असून, १०० कर्मचारी स्वच्छतेसाठी तैनात करण्यात आले आहेत, असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.