Rahul Gandhi Gen-Z post controversy लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सोशल मीडिया पोस्टमधील ‘जेन-झी’ (Gen-Z) च्या उल्लेखामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांचे नेते देशाला गृहयुद्धात ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपा नेत्यांकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या पोस्टचा निषेध केला असून राहुल गांधी ‘अर्बन नक्षल’ भाषा बोलत असल्याचे म्हटले आहे. या पोस्ट मध्ये नक्की काय? राहुल गांधींच्या या पोस्टने काँग्रेस अडचणीत सापडणार का? भाजपा नेत्यांनी नक्की काय म्हटले? त्याविषयी जाणून घेऊयात…

राहुल गांधींच्या पोस्टमध्ये नक्की काय?

  • राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ते देशातील तरुण, विद्यार्थी आणि जेन-झी यांच्याबरोबर उभे राहतील, जे संविधान आणि लोकशाही वाचवतील आणि मतचोरी थांबवतील.
  • त्यांनी आपला एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. त्यात मागे लिहिले आहे की, लोकशाही नष्ट होणार नाही.
  • मात्र, भाजपाने त्यांच्या पोस्टमधील ‘जेन-झी’च्या उल्लेखाचा संबंध नेपाळशी जोडला आहे.
  • नेपाळमध्ये ‘जेन झी’च्या आंदोलनामुळे केपी शर्मा ओली यांचे सरकार कोसळले होते.

भाजपाचे आरोप काय?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी ‘अर्बन नक्षल’ (शहरी नक्षलवादी)ची भाषा बोलतात हे त्यांनी सिद्ध केले आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, लोक त्यांच्या पक्षाला मतदान करत नाहीत, म्हणून राहुल गांधी सत्तेवर येण्यासाठी पर्यायी मार्ग वापरण्याचा विचार करत आहेत. जोशी म्हणाले, “ते काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत हे मला माहीत नाही. आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत. लोक त्यांना मतदान करत नाहीत, ही आपली चूक आहे का? ते निरर्थक विधाने करत आहेत आणि आपली तुलना नेपाळ आणि श्रीलंकेशी करत आहेत.” ते पुढे म्हणाले की, त्यांना वाटते जर ते लोकशाही मार्गाने सत्तेत येऊ शकत नाहीत, तर ते पर्यायी मार्ग वापरतील. ही मानसिकता भारतातील लोकांना कधीही स्वीकारार्ह नाही. भारतात लोकशाहीची मुळे खूप जुनी आहेत. लोकांना त्यांच्या अराजकतेच्या हाकेला प्रतिसाद द्यायचा नाही.”

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केला आहे की, “राहुल गांधी यांना भारतात गृहयुद्ध भडकवायचे आहे आणि ते देशाला विभाजित करण्यासाठी सोरोस फाउंडेशनबरोबर काम करत आहेत.” दुबे म्हणाले की, त्यांचा पक्ष ‘जेन-झी’च्या बाजूने आहे, जो घराणेशाहीच्या विरोधात आहे. “जर भारतात ‘जेन-झी’ (Gen-Z) उभे राहिले, तर काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष देशातून पळून जाताना दिसतील,” असेही ते म्हणाले. भाजपा खासदार कंगना रणौत यांनी आरोप केला की, राहुल गांधी नेपाळप्रमाणेच भारतातही ‘जेन-झी’ला आंदोलनासाठी भडकावत आहेत.

कंगना पुढे म्हणाल्या, “त्यांना माहीत असायला हवे की नेपाळमध्ये ‘जेन-झी’ने घराणेशाहीचे सरकार उलथून टाकले आहे. राहुल गांधींना जगात काय चालले आहे, हे माहीत नाही. ते सकाळी उठतात आणि डोळे चोळत काहीही पोस्ट करतात. राहुल गांधींना माहीत असायला हवे की घराणेशाहीचे सरकार नेपाळमध्ये उलथून टाकण्यात आले आहेत आणि तिथे लोकशाही स्थापन झाली आहे. जर ते असेच करत राहिले, तर त्यांना या देशातून पळून जाण्यास भाग पाडले जाईल.” केरळचे भाजपाप्रमुख राजीव चंद्रशेखर म्हणाले की, भारतातील ‘जेन-झी’नेच राहुल गांधींना सत्तेतून बाहेर काढले. “गेल्या ७५ वर्षांपासून काँग्रेस पक्षाने केलेल्या भ्रष्टाचारातून आणि घराणेशाहीतून ‘जेन-झी’च्या पिढ्यांचा विश्वासघात केला आहे,” असे ते म्हणाले.

राहुल गांधींचे पत्रकार परिषदेत आरोप

तंत्रज्ञानाचा वापर करून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्रातील राजुरा व कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघांतील मतदारयाद्यांतून मतदारांना ऑनलाइन सॉफ्टवेअरचा वापर करून अत्यंत पद्धतशीरपणे वगळले गेल्याचे त्यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी आरोपांचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ लवकरच फोडणार असल्याचा दावा केला होता. मात्र, गुरुवारी केलेले आरोप हा ‘हायड्रोजन बॉम्ब’ नसून तो अद्याप बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन पद्धतीने कर्नाटकमध्ये २०२३च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आळंद मतदारसंघातील ६ हजार १८ मते रद्दबातल केली गेली, तर महाराष्ट्रात २०२५ च्या विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघामध्ये ६ हजार ८५० मते मतदार याद्यांमध्ये नव्याने समाविष्ट केली गेली, असे ते म्हणाले. या घोटाळ्यात केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळत हे आरोप बिनबुडाचे व असत्य असल्याचे म्हटले. या पत्रकार परिषदेनंतरच त्यांनी ही पोस्ट केली, ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला.