सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती दिनाच्या ध्वजारोहणास यापूर्वी गैरहजर राहणारे खासदार अशी प्रतिगामी प्रतिमा निर्माण झाल्यानंतर इतिहासातील ‘रझाकारा’चे भूत मानगुटी बसू शकते, असे लक्षात आल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वत:ची प्रतिमा पुसण्यासाठी प्रयत्न केले. ते ध्वजारोहणास उपस्थित राहू लागले. निजामाच्या विरोधात लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाच्या स्तंभासमोर नतमस्तक होऊ लागले. एक प्रतिमा पुसून एक पाऊल पुढे पडते आहे, असे म्हणण्यापूर्वी महिला आरक्षणासाठीच्या मतदानाच्या वेळी विरोधात मतदान केल्यानंतर ‘एमआयएम’ हा पक्ष आता महिला विरोधी असल्याची नवी प्रतिगामी प्रतिमा खासदार जलील यांना चिकटली जाऊ लागली आहे.

एकगठ्ठा मुस्लिम मताला दलित मतांची जोड देत खासदार जलील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४ हजार २३४ मतांनी निवडून आले. त्यानंतर त्यांनी अनेक विषयांवर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणारे प्रश्न विचारले. मात्र, महिला आरक्षणाच्या विरोधात मतदार करून त्यांनी महिलांच्या राजकीय प्रगतीस विरोध करणारे आहेत, असा संदेश दिला. हे राजकीय मत मतदारांपर्यंत अधोरेखित व्हावे म्हणून भाजपनेही खासदार जलील यांच्या विरोधात आंदोलन केले.

आणखी वाचा-जदयू पक्ष पुन्हा एनडीएत सहभागी होणार? खुद्द नितीश कुमार यांनी दिलं उत्तर; म्हणाले…

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ‘ जय भवानी जय शिवाजी’ या घोषणेच्या विरोधात ‘ नारा- ए- तकबीर- अल्लाह हू अकबर’ अशी घोषणा दिली जाते. एमआयएमच्या विजयानंतर गुलाला ऐवजी ‘हिरवा’ रंग उधळून आनंदोत्सव साजरा केला जातो. मग निवडणूक महापालिकेची असो की विधानसभेची. २०१९ मध्ये तर लोकसभेच्या निवडणुकीनंतरही हिरवा रंग उधळला गेला. त्यामुळे खासदार जलील यांची प्रतिमा मुस्लिमांचा नेता, अशीच हाेती. त्या प्रतिमेवर मात करण्यासाठी मग त्यांनी खूप सारे प्रयत्न केले. अगदी शिवजयंतीच्या उत्सवात भगवा फेटा घालून ते सहभागी झाले. किराडपुरा राम मंदिराच्या दंगलीच्या वेळी त्यांनी मंदिरात जाऊन पुजाऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे राजकीय पटलावर ध्रुवीकरणाचे खेळ करणारे खासदार जलील यांची ‘कट्टर’ प्रतिमा त्यांनी बऱ्याच प्रमाणात पुसण्याचा प्रयत्न केला. पण ‘तीन तलाक’ आणि ‘महिला आरक्षण’ या प्रश्नी खासदार जलील यांची कृती आणि ते मांडत असलेले मत यात कमालीचा विरोधाभास दिसून आला. महिला आरक्षण विरोधी नाही असे तोंडी सांगणाऱ्या जलील यांनी मतदान करताना मात्र नेमकी उलटी भूमिका घेतली. त्यामुळे खासदार जलील आणि ॲड्. असदोद्दीन ओवेसी हे दोन खासदार महिलांच्या राजकीय प्रगतीस बाधा आणणारे आहेत, असा संदेश मिळाला. तो अधोरेखित करण्यासाठी भाजपने छत्रपती संभाजीनगर शहरात आंदोलन केले.

आणखी वाचा-कोल्हापूर भाजपमधील वाद शिगेला, जिल्ह्यातील नेत्यांसमोर कटुता मिटविण्याचे आव्हान

निवडणुकीचे इंजिन हिंदू- मुस्लिम व्हावे ही भाजपची रणीनीती

२०१९ च्या निवडणुकीमध्ये १८ लाख ८६ हजार २८४ मतदारांपैकी चार लाख १५ हजार मुस्लिम मतदार असल्याचा भाजपचा अभ्यास आहे. हे मतदान एकगठ्ठा झाले तर आपोआप हिंदू मतदानही एकत्रित होऊ शकते. त्यामुळे निवडणुकीचे इंजिन ‘हिंदू- मुस्लिम’ असावे अशी भाजपची इच्छा दिसून येत आहे. अशा काळात खासदार असदोद्दीन आवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी महिला आरक्षण विधेयकावर विरोधात मतदान केले. देशात विरोधात असणारे या दोन खासदारांमुळे ते दोघे महिला विरोधी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिवसेनेचा रोष मावळला ?

मशिदीवरील भोंगे हटवा, या मनसेच्या आंदोलनानंतर आणि किराडपुरा येथील दंगल घडण्यापूर्वी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नतमस्तक होणाऱ्या खासदार जलील यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचा रोष मात्र अलिकडच्या काळात मावळला असल्याचे चित्र राजकीय पटलावर दिसू लागले आहे. एरवी ‘एमआयएम’ असे कोणी म्हटले तरी ‘हिरवा साप’ अशी उपमा देऊन कडवटपणे बोलणारे शिवसैनिक आता काहीसे सौम्य झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे प्रतिगामी भूमिका पुसण्याचे प्रयत्न करणाऱ्या जलील यांचे पाऊल महिला आरक्षणावरुन पुन्हा एक पाऊल खोलात गेलेले असताना शिवसेना मात्र शांत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim is anti women bjps trick to put mp imtiyaz jaleel in trouble print politics news mrj
First published on: 26-09-2023 at 09:41 IST