सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांनी उमेदवारी दाखल करून राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला आहे. आ. पाटील यांनीही आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात १९८५ मध्ये कारखान्याच्या संचालक पदाची जबाबदारी हाती घेऊनच केली होती.

वाळवा तालुक्यातील कासेगावचे पाटील घराणे स्वातंत्र्यचळवळीतील महत्वाचे घराणे. राजारामबापूंचे वडील अनंत पाटील व चुलते ज्ञानू बुवा यांनी प्रत्यक्ष स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेतलेला. हाच आदर्श समोर ठेवत बापूंनीही स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेतला होता. कासेगावचे पहिले वकील होण्याचे त्यांनी स्वप्न पूर्ण करीत असतानाच शिक्षणाची गंगा दारोदारी पोहचविण्यासाठी कासेगाव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावपातळीवर शाळा सुरू केल्या. यातूनच त्यांना जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हा घराण्याचा वारसा समर्थपणे पार पाडण्याची जबाबदारी अवघ्या 21 व्या वर्षी जयंत पाटील यांच्यावर आली. त्यांनीही ती समर्थपणे पार पाडत राजारामबापू उद्योग समुहाचा विस्तार केला. आता या घराण्यातील चौथी पिढी प्रतिक पाटील यांच्या रुपाने सार्वजनिक जीवनात येत आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादीचे बहुमत तरीही अडचणीतील ‘महानंद’ची सूत्रे विखेंच्या हाती

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीमध्ये आ. जयंत पाटील यांच्यासह पुत्र प्रतिक पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संचालक मंडळामध्ये संधी कोणाला द्यायची याचा अंतिम निर्णय आ. पाटील हेच घेणार असले, तरी गटाअंतर्गत संचालक मंडळासाठी मोठी चुरस आहे.

संचालक पदी संधी देऊ न शकलेल्या कार्यकर्त्यांना पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर संधी देण्याचा शब्द देऊन शांत केले जाऊ शकते. तरीही अंतिम उमेदवार निश्‍चित करीत असताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण नाराजी तीव्र स्वरुपात उमटणार नाही याची दक्षता घेत असतानाच नाराजी संघटित होऊन पर्याय शोधण्यासाठी बाजूला जाण्याचा विचार करणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा – कॉंग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांमुळे नाना पटोलेंची कोंडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारखान्यावर युवा नेतृत्व म्हणून प्रतिक पाटील यांना संधी द्यावी अशी आग्रही मागणी काही कार्यकर्त्यांनी केली आहे. आ. पाटील हे राज्यपातळीवरील मातब्बर नेतृत्व असल्याने घरच्या मैदानात गट शाबूत ठेवण्याबरोबरच सार्वजनिक कार्यात कार्यरत राहण्यासाठी राजकीय वारसदाराची गरज आहे. ही गरज ओळखून गेली तीन वर्षे प्रतिक पाटील यांना सार्वजनिक जीवनात सक्रिय करण्यात आले आहे. त्यांना राजकीय व्यासपीठावर संधी देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत होता. आता खर्‍या अर्थाने राजारामबापूंच्या घराण्यातील तिसरी पिढी सार्वजनिक व राजकीय जीवनात पदार्पण करीत आहे.