मुंबई : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले काँग्रेस नेते नसीम खान यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे लक्ष लागले आहे. खान कदाचित शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तविली जाते. तर एमआयएम व वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारीचा प्रस्ताव दिला आहे. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आल्याने नसीम खान नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने राज्यात एकही अल्पसंख्याक समाजाच्या नेत्याला उमेदवारी दिलेली नाही याबद्दल त्यांनी पक्षाकडे नाराजी व्यक्त केली. पक्षाचे स्टार प्रचारकपद त्यांनी सोडले आहे. तसेच प्रचारात सक्रिय राहणार नाही, असे पक्षाला कळविले आहे.

हेही वाचा : “लोकसभा निवडणूक IPLसारखीच अन् काँग्रेसकडे कर्णधार नाही,” भाजपाचा हल्लाबोल

या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व उमेदवार वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ‘ आपण वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली म्हणून नाराज नाही. पक्षाने राज्यात अल्पसंख्यांक समाजातील एकाही नेत्यास उमेदवारी दिली नसल्याने नाराज आहोत’, असे खान यांनी सांगितले. नसीम खान यांनी एमआयएम व वंचित बहुजन आघाडीने उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी तसा प्रस्ताव दिला आहे. नसीम खान हे शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. फक्त त्यांना आमदारकीचे आश्वासन हवे आहे. नसीम खान यांनी मात्र काँग्रेस सोडण्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. आपण काँग्रेसमध्येच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.