नागालँडच्या निवडणुका या वर्षी होणार आहेत. २७ फेब्रुवारीला या राज्यात निवडणुका होत आहेत. बिहारचे दोन मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत. ६० सदस्यीय नागालँड विधानसभा निवडणुकीत सत्तेत असलेले दोन मित्र पक्ष हे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. म्हणजेच नितीश कुमार विरूद्ध तेजस्वी यादव यांच्यात ही लढत पाहण्यास मिळणार आहे. बिहारचे तीन महत्त्वाचे पक्ष या निवडणुकीत आपलं नशीब आजमवणार आहेत. जनता दल युनायटेड, राजद आणि लोजपा हे तीन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतील.

जदयू २००३ पासून नागलँडमधून निवडणूक लढवणारा पक्ष आहे. त्यांच्या काही जागाही तिथे निवडून येतात. दुसरीकडे चिराग पासवान यांच्या नेतृत्वात पुढे जाणारा पक्ष लोजपा आता १९ उमेदवारांसह नागालँडच्या निवडणुकीत उतरला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे प्रमुख नितीश कुमार यांनी जय प्रकाश नारायण यांच्या १२० व्या जयंतीचं औचित्य साधत नागालँडचा दौरा केला होता. या दौऱ्याचा अर्थ समाजावादी आयकॉनवर आपला दावा कायम ठेवणं हाच होता.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार १९५० च्या दशकात राज्यात बरीच उलथापालथ झाली. त्यानंतर भारतीय सेनेने कारवाईही केली होती. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी नागालँडमध्ये दौरा काढला होता. १९६४ मध्ये नागालँड बॅपटिस्ट चर्च काऊन्सिलने शांती मिशन ची स्थापना केली होती. हाच वारसा कायम ठेवण्यासाठी नितीश कुमार यांनी दौरा केला होता अशी चर्चा आहे.

जदयू चे प्रभारी अफाक अहमद खान यांनी २० वर्षांपासून नागालँडमध्ये जदयू चांगलं काम करत असल्याचं म्हटलं आहे. २००३ मध्ये नागालँडमध्ये जदयूने तीन जागा जिंकल्या होत्या. २००८ मध्ये निवडणूक लढवली नाही. २०१३ मध्ये पुन्हा एकदा एक आमदार नागालँडमध्ये निवडून आला. या वेळी आम्ही ९ जागांवर निवडणूक लढवत आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणूक झाल्यानंतर निकाल जेव्हा येतील तेव्हा आमच्यापुढे सगळे पर्याय खुले आहेत असं जदयूने म्हटलं आहे. राजदनेही या ठिकाणी पाच जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसंच त्यांनी हेदेखील म्हटलं आहे की जर आम्ही काही जागा जिंकलो तर भाजपा असलेल्या एकाही आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये आम्ही जाणार नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारमध्ये सत्ताधारी असलेले दोन पक्ष आमनेसामने येणार आहेत. या निमित्ताने नितीश कुमार यांचे प्रतिस्पर्धी म्हणून तेजस्वी यादव यांना पाहिलं जातं आहे.