नागपूर : सुरूवातीला महायुती एकत्र लढणार असल्याचा घोष, नंतर जेथे शक्य असेल तेथेच युती करण्याची भाषा, नंतर मैत्रीपूर्ण लढतीचे सुतोवाच. नगर पंचायत, पालिका निवडणुकांच्या घोषणेनंतर भाजपने वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी भूमिका घेत युतीसाठी इच्छुक असलेल्या मित्र पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत झुलवत ठेवले. स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी भाजपने खेळलेल्या या धूर्त चालीमुळे नागपूर जिल्ह्यात मित्र पक्षाची कोंडी झाली.

भाजप हा केंद्र आणि राज्यात सत्तेतील प्रमुख पक्ष आहे, कार्यकर्ते आणि सत्तेचे पाठबळ आहे, त्यामुळे त्यांच्याशी युती केल्याने आपलाही काही राजकीय फायदा होईल, अशी आस बाळगून असलेल्या महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिदें सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना भाजप आपल्याला सोबत घेऊनच पालिका व नगर पंचायतीच्या निवडणुका लढेल, असा विश्वास होता, त्यामुळे या पक्षाचे नेते भाजपच्या प्रत्येक टप्प्यावरील भूमिकेवर विश्वास ठेवत आले. पण मित्र पक्षांची जिल्ह्यातील जेमतेम राजकीय ताकद लक्षात घेऊन भाजपने त्यांना सुरूवाती पासूनच महत्व दिले नाही. कारण जिल्ह्यात स्वबळावर निवडणुका जिंकू शकतो ,असा आत्मविश्वास जिल्ह्यातील भाजप नेत्यांना होता.

दुसरीकडे युतीसाठी आज बैठक होईल, उद्या होईल अशी वाट बघणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अखेर भाजपला सोडून बैठक घेतली. हा दबाव आणण्याचा प्रयत्न होता. पण भाजपला मुळात हेच हवे होते. त्यामुळे त्यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात स्वबळाची भूमिका घेतली. त्यांच्या उमेदवारांची नावे, यादीबाबत गुप्तता बाळगली. त्यामुळे नाईलाजाने का होईना शेवटच्या टप्प्यात मित्रपक्षांना हालचाली कराव्या लागल्या तोपर्यंत उशिर झाला, हे असेच व्हावे यासाठीच भाजपची खेळी होती हे आता स्पष्ट झाले आहे.

नागपूर जिल्ह्याची स्थिती

नागपूर जिल्ह्यात १५ नगरपालिका आणि १२ नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. जिल्ह्यातील महाविकास आघाडी व महायुती यांच्या राजकीय ताकदीचे मोजपाम करायचे ठरवल्यास जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघावरून करता येईल. जिल्ह्यातील विधानसभेचे सहा मतदारसंघ यापैकी चार ठिकाणी भाजप व प्रत्येकी एक ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेचा आमदार आहे.

भाजपकडे असलेल्या चार विधानसभा मतदारसंघापैकी हिंगणा वगळता काटोल, सावनेर आणि कामठी मतदारसंघात भाजपसोबत विरोधी पक्षही मजूबत आहे. विशेषत: काटोलमध्ये राष्ट्रवादी, सावनेर,उमरेड, कामठीमध्ये काँग्रेसची ताकद आहे. रामटेकमध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे भाजप जरी स्वबळाची भाषा करीत असला तरी त्यांना काँग्रेससोबत लढताना शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची मदत लागणार आहे, ही वस्तूस्थिती असतानाही भाजपने केवळ आपलाच पक्ष मोठा व्हावा ही भावना ठेऊन मित्रपक्षांना दूर केल्याची चर्चा आहे. शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष काही ठिकाणी युती करून भाजपविरोधातच लढत असून भाजपला धडा शिकवण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.