नागपूर: राज्य भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, विद्यमान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कायम चर्चेत राहणारे व्यकिमत्व. कधी ते त्यांच्या वक्तव्याने, कधी मंत्री म्हणून घेतलेल्या क्रांतीकारी ( तुकडा बंदी कायदा) निर्णयामुळे तर कधी त्यांच्यासोबत वावरणाऱ्या, छायाचित्र काढणा-या कार्यकर्त्यांमुळे चर्चैत असतात. आत्ता सध्या ते चर्चेत आले ते अशाच एका कार्यकर्त्या मुळे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे याचे फोटो अन् व्हीडीओ समाज माध्यमांवर झळकले. आणि ऐन विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बावनकुळे चर्चेत आले. त्यामुळे त्यांना काटेंचा भाजपशी काही संबंध नाही, असा खुलासा करावा लागला.

मुळात ही दुर्दैवी घटना पश्चिम महाराष्ट्रात ( अक्कलकोट) घडली. त्याचा तसा नागपूरशी थेट संबध नाही. पण घटनेनंतर चर्चेत नागपूरच केंद्र स्थानी आले आहे. घटनेतील प्रमुख आरोपींचे बावनकुळे ंसोबत छायाचित्रे असल्याने, व्हीडिओ, रिल्समध्ये ते दिसत असल्याने बावनकुळे यांनी सर्व प्रथम खुलासा केला तो नागपुरातच. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही, असा दावा त्यांनी केला.

अपेक्षेप्रमाणे विधिमंडळात या घटनेचे पडसाद उमटले. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार ( यांचे निवासस्थान नागपुरात आहे) यांनीच हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून सरकारला जाब विचारला. त्याला उत्तरही नागपूरकर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सभागृहा बाहेर ही हा मुद्दा दिवसभर चर्चेत होता. खुद्द गायकवाड यांनी त्यांच्या हल्ल्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केला. त्या संघाचे मुख्यालय नागपूरलाच आहे. संभाजी ब्रिगेडच्या नागपूर शाखेने घटनेचा निषेध करताना भाजपला लक्ष्य केले. संभाजी ब्रिगेड या नावावर आत्ताच आक्षेप का? असा सवाल करताना महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा उल्लेख झाला. हा कोरटकर सुध्दा नागपूरचाच.एकूणच गायकवाड यांच्यावरील चर्चेत नागपूरच आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपक काटे यांचे कृत्य समर्थनीय नाही -बावनकुळे

प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही,अशा खालच्या पातळीवर जाऊन कृत्य करणे भाजपच्या रक्तात नाही. दीपक काटे यांचे कृत्य समर्थनीय नाही . त्यामुळे पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. हल्ला करणारा दीपक काटे याच्याशी आमचा काही संबंध नाही. आरोपी कोणत्याही पक्षाचा असो तो आरोपी आहे. त्यामुळे त्याला शिक्षा झाली पाहिजे. कार्यकर्ते हे मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढतात. कुठ्ल्या नेत्यासोबत फोटो आहे म्हणजे त्याच्यासोबत संबंध आहे असे बावनकुळे म्हणाले.