नागपूर : शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्या सत्तासंघर्षात एकमेकांवरील अवलंबित्वामुळे नेत्यांची भूमिका बदलताना दिसत आहे. शिंदे गट सत्तेत असला तरी या गटातील नेत्यांची स्वतंत्र राजकीय ओळख आणि निर्णयक्षमतेची चाचणी दररोज घेतली जात आहे. नागपूर जिल्ह्यातील राजकारणात याचे मूर्त रूप म्हणजे या पक्षातील दोन नेते – राज्यमंत्री आशीष जयस्वाल आणि विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांच्यातील स्पष्ट भूमिका-विभागणी. जयस्वाल यांच्या राजकारणावर भाजपची छाया आहे तर तुमाने हे सत्तेत असूनही रोखठोक भूमिका घेत असल्याचे त्यांच्या मासविक्री बंदीच्या निर्णयाला विरोध केल्याने दिसून येते.

जयस्वाल: भाजपधर्जिणे राजकारणाचे प्रतिनिधित्व करतात. रामटेक विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आणि सध्या फडणवीस मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले आशीष जयस्वाल हे शिंदे गटाचे चेहरे असले तरी त्यांची भूमिका भाजपशी अधिक बांधिलकीची दिसून येते. जयस्वाल हे सुरुवातीपासून फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्तीही फडणवीस यांच्या प्रभावामुळे झाली असे म्हटले जाते. त्यांच्या प्रत्येक भाषणात फडणवीस यांचा गुणगौरव दिसून येतो, जे त्यांचं भाजपधर्जिणं राजकारण अधोरेखित करते. मात्र, सरकारच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे किंवा वेगळं मत मांडण्याचे धाडस त्यांच्या भूमिकेत दिसून येत नाही.

दूसरीकडे शिंदे सेनेचे विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने तुमाने सत्तेत असूनही स्पष्ट भूमिका घेताना दिसतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असूनही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, होती.यामागे भाजपचा विरोध कारणीभूत ठरला होता. त्याची पक्षाने विधान परिषदेवर वर्णी लावून भरपाई केली, पण तुमानेंचा भाजपवरील राग कमी झाला नाही. तो वेगवेगळ्या मुद्यावरून प्रगट होतो. स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीसारख्या संवेदनशील निर्णयाला त्यांनी जाहीरपणे विरोध केला, जो महायुती सरकारच्या धोरणाविरुद्ध होता. ही त्यांची भूमिका खाटिक समाजाचा प्रतिनिधी या नात्याने मांडली, असे त्यांनी जाहीर केले. पण ती मांडताना त्यांनी त्याच्या परिणामांचा विचार केला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका धाडसीपणाची ठरते.

दरम्यान दोन्ही नेत्यांच्या भूमिकांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास, शिंदेसेनेच्या आतल्या गटबाजीचे आणि भाजपछायेतील राजकारणाचे स्पष्ट चित्र समोर येते. जयस्वाल यांचे धोरण हे सत्तेच्या जवळ राहून राजकीय सुरक्षिततेचा मार्ग शोधण्याचे आहे. तर तुमाने यांचे धोरण जनआकांक्षांशी बांधिलकी ठेवून स्वतःचे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचे आहे.

शिंदेसेना ही सध्या केवळ सत्तेतील भागीदार राहिलेली नसून भाजपच्या राजकीय अजेंड्याचा भाग बनल्याचे अनेकदा जाणवते. अशा वेळी पक्षातील काही नेते सरकारच्या प्रत्येक निर्णयावर मान हलवतात, तर काही अजूनही विचारस्वातंत्र्य जपत लोकप्रतिनिधी म्हणून आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावतात. जयस्वाल आणि तुमाने यांच्या भूमिकांमधून हेच स्पष्ट होते – की सत्ता जवळ असणे आणि सत्ता टिकवून ठेवण्यासाठी मौन पाळणे यामध्ये आणि सत्ता असतानाही जाहीर मत मांडण्याचे धाडस ठेवणे यामध्ये मूलभूत फरक आहे.