नांदेड : आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या जाहीर झालेल्या नवीन कार्यकारिणीत नांदेडचे महत्त्व घटले आहे. कारण पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असलेल्या राजकीय व्यवहार समितीत नांदेडला प्रथमच संधी मिळालेली नाही.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राज्यातल्या काँग्रेस पक्षाची सूत्रे आल्यानंतर मागील काही महिन्यांत त्यांनी सर्व विभागांचा दौरा करून पक्षाच्या एकंदर स्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर सर्वच जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना प्रदेश कार्यकारिणीवरील वेगवेगळ्या नियुक्त्यांची प्रतीक्षा होती. अखेर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रदेश कार्यकारिणीत जिल्ह्यातून पाच जणांचा समावेश झाला आहे. पण पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या राजकीय व्यवहार समितीत नांदेडला स्थान मिळालेले नाही.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या प्रमुख समर्थकांनी गेल्या दीड वर्षांत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांची वाट धरल्यानंतर नांदेड जिल्ह्यात दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा डोलारा सांभाळताना गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत तसेच खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाला यश मिळवून दिले. पण प्रदेश कार्यकारिणी जाहीर करताना या जिल्ह्यातून राजकीय व्यवहार समितीत कोणालाही स्थान मिळाले नाही. तसेच प्रदेशच्या कार्यकारी समितीतही खासदार रवींद्र चव्हाण वगळता जिल्ह्यातून कोणाच्याही नावाचा विचार झालेला नाही, असे दिसते.

वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते ईश्वरराव भोसीकर, माधवराव शेळगावकर, माजी आमदार माधवराव जवळगावकर यांच्यासह पक्षामध्ये नव्याने आलेले आंबेडकरी चळवळीतील नेते इत्यादींपैकी कोणालाही स्थान मिळाले नाही. अन्य ३८ उपाध्यक्षांमध्ये जिल्ह्यातून केवळ प्रा.डॉ.यशपाल भिंगे तसेच सरचिटणीसपदी डॉ.श्रावण रॅपनवाड, अ‍ॅड.सुरेंद्र घोडजकर, डॉ.दिनेश निखाते आणि डॉ.रेखा दत्तात्रय चव्हाण यांची वर्णी लागली आहे.

भाजपावासी झालेल्या अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात काही मोजक्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची ज्योत तेवत ठेविली आहे. पण भोकर मतदारसंघासह किनवट या आदिवासी मतदारसंघातूनही प्रदेश कार्यकारिणीत कोणालाही स्थान मिळालेले नाही. खा.रवींद्र चव्हाण यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या नायगाव मतदारसंघातून कोणालाही प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यांच्या निकटच्या वर्तुळातील काही संभाव्य नावे वरील यादीत नसल्याचे दिसून आले. त्यावर अद्याप प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही; पण ज्यांना स्थान मिळाले त्यांच्या समर्थकांनी समाजमाध्यमांतून संबंधितांच्या निवडीचे स्वागत केल्याचे दिसून आले.

समतोलपणा दिसत नाही

वयाची नव्वदी पार केलेले माजी आमदार ईश्वरराव भोसीकर आणि त्यांचा परिवार पडझडीच्या काळातही काँग्रेसनिष्ठ राहिला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न ईश्वररावांनी केला होता. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत त्यांना कोठेही स्थान देण्यात आले नसले, तरी त्याबद्दल त्यांनी खळखळ केली नाही; पण नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने समतोलपणा दिसत नसल्याचे त्यांनी बुधवारी येथे नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजेश पावडे अखेर जिल्हाध्यक्ष

काँग्रेसचे नांदेड उत्तर जिल्ह्याचे अध्यक्ष बी.आर.कदम यांनी दोन महिन्यांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी देत खासदार अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर नाना पटोले यांचे समर्थक राजेश पावडे यांची वर्णी लावण्यात आली आहे. पटोले यांच्या कार्यकाळात पावडे यांची अचानकपणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण तेव्हा खा.रवींद्र चव्हाण यांनी पक्षनेतृत्वाकडे दाद मागितल्यामुळे पुढील काही तासातच पावडे यांची नियुक्ती रद्द झाली. आता गमावलेले पद त्यांनी प्राप्त केलेे आहे.