Latest News on Maharashtra Politics Today : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये भाजपाला मोठा धक्का दिला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळणार नाही, असा दावा कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केला. आत्महत्या करण्याऐवजी एखाद्या आमदाराला कापून टाका, असे वादग्रस्त विधान बच्चू कडू यांनी केले. शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. जोपर्यंत मतदार याद्यांमध्ये दुरुस्त्या होत नाहीत, तोवर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होऊ देणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्रात आज दिवसभरात घडलेल्या या पाच महत्वाच्या राजकीय घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

नाशिकमध्ये ठाकरेंचा भाजपाला धक्का

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्याआधीच शिवसेना ठाकरे गटाने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. नाशिकमधील भाजपाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. यावेळी छोटेखानी भाषण करताना ठाकरेंनी भाजपासह शिंदे गटाला लक्ष्य केले. “आज नरक चतुर्दशी असून कृष्णाने नरकासूराचा वध केला आहे. नरकासूर कोण वेगळे सांगायची गरज नाही. त्याचा वध करण्यासाठी संगीता गायकवाड आणि इतर मंडळी शिवसेनेत आली आहेत. जे मतचोरी करुन तिकडे बसले आहेत त्यांची चोरी आपण चोरांसकट पकडली आहे. या चोरांना हद्दपार करण्यासाठी सर्व मराठी आणि अमराठी माणसे एकत्रित आली आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

एकनाथ शिंदेंच्या हातातून धनुष्यबाण जाणार?

शिवसेनेच्या प्रलंबित खटल्याची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी येत्या १२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमके कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यापार्श्वभूमीवर कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना सूचक विधान केलं आहे. “न्यायालयाला उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निकाल देताच येणार नाही. कारण त्यांची बाजू मजबूत आहे. या प्रकरणातील निकाल लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागणारच नाही. त्यांनी संविधानाची मोडतोड करून अडीज वर्षे मुख्यमंत्रिपद उपभोगलं आहे. कायदेशीर आणि संवैधानिक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच लागू शकतो”, असे असीम सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे. जर निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला, तर एकनाथ शिंदे यांनी धनुष्य बाण विरहित निवडणुका जिंकून दाखवाव्यात असं आव्हानही सरोदे यांनी दिलं आहे.

आणखी वाचा : निवडणूक बिहारची, पण चर्चा मात्र एकनाथ शिंदेंची; कारण काय? कन्हैया कुमार यांनी काय सांगितलं?

माजी आमदार बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त विधान केलं. शेतकरी आत्महत्येच्या विषयावर बोलताना त्यांनी थेट आमदारांना ‘कापून टाकण्याची’ भाषा केली. बच्चू कडू हे सध्या राज्यभर दौरा करीत आहेत. बुलढाणा येथील शेतकरी हक्क परिषदेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांवर सातत्याने होणारा अन्याय आणि जातीपातीच्या विषयावर भाष्य केलं आहे. इतकेच नाही तर आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, असं बच्चू कडू म्हणाले. “तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा, त्याला लाथ तरी मारता येते. आपण जर शेतकऱ्याला विचारले तर तू काय करतो, तर त्याला काहीच येत नाही. शेत मालाला भाव मिळाला तर शेतकरी लोकांना नोकरीला ठेवतील. आरक्षणामुळे एखादी परिवार किंवा समाज सुखी होऊ शकतो, मात्र मालाला भाव मिळाला तर अख्खे गाव सुखी होऊ शकेल”, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला इशारा

मतदार याद्यांमध्ये ९६ लाख बोगस मतदार असल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. या दुरुस्त्यांशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी निवडणूक आयोगाला दिला. मनसेच्या मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुखांचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रयोग करीत केंद्र-राज्य सरकार व अदानी-अंबानींवर तीव्र हल्ला चढवला. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी ९६ लाख बोगस मतदार यादीत घुसविण्यात आल्याचा आरोप राज यांनी केला. विरोधकच नव्हे सत्ताधारी पक्षाचे आमदारही मतदार यांद्यामध्ये घोळ असल्याचे सांगत असून काहींनी तर २०-२० हजार मतदार बाहेरून आणल्याचे मान्य केले आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना २३२ जागा मिळूनही राज्यात कुठेही विजयाचा जल्लोष झाला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा : MNS Maha Vikas Aghadi Alliance : राज ठाकरे यांच्या मनसेपासून काँग्रेस का ठेवतेय दुरावा? कारण काय?

मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान, तर फडणवीस मुख्यमंत्री झाले – काँग्रेसची टीका

मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. “मतदारांची वाढती संख्या आणि त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर करूनही त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. निवडणूक आयोगाची भूमिका कटपुतलीच्या बाहुल्यासारखी आहे. त्यांच्या कारोभाराविरोधात मोर्चा काढण्याची गरज आहे. तसा निर्णय झाला तर काँग्रेस पक्षही त्याचे समर्थन करेन”, असेही सपकाळ म्हणाले. भारतीय जनता पक्षाला अनुकूल नावे समाविष्ट करणे व विरोधांना अनुकुल असलेल्यांची नावे वगळणे, एकाच घरात ८० किंवा १०० मतदार, घर नंबर नसलेल्यांची नावे, वयांमध्ये फेरफार असे अनेक प्रकारचे गोंधळ या यादीत असल्याचा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यावेळी पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडप करण्याचा प्रकार युवक काँग्रेसने उघड केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.