नाशिक – गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही वादग्रस्त सुधाकर बडगुजर यांना पक्षात थाटामाटात प्रवेश दिल्याने राजकारणात साधनशुचितेचा आव आणणाऱ्या भाजपच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबई बाॅम्बस्फोटातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ताबरोबर पार्टी करणाऱ्या बडगुजर यांच्याविरुध्द असलेल्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची यादी बरीच मोठी आहे. बडगुजर यांची ही पार्श्वभूमीच त्यांना दोन्ही वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत होण्यास कारक ठरल्याचे मानले जाते.
२००७ मध्ये अपक्ष म्हणून महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर २००८ मध्ये बडगुजर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हांपासून महापालिकेत ते सतत निवडून येत आहेत. विरोधी पक्षनेता, सभागृहनेता, महानगरप्रमुख, जिल्हाप्रमुख अशी सर्व प्रमुख पदे त्यांनी भूषवली. महापालिका आणि पक्षात प्रगतीची अशी चढती कमान असताना बडगुजर हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त राहिले. त्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार असलेल्या सलीम कुत्ताबरोबर पार्टी केल्याचे छायाचित्र भाजपकडून विधानसभेत झळकविण्यात आल्यापासून बडगुजर हे अधिकच चर्चेत आले.
भाजपकडून त्यांच्यावर देशद्रोही असल्याचे आरोप करण्यात आले. सलीमकडून बडगुजर यांनी काही भेटवस्तू स्वीकारल्याच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी २०२३ मध्ये त्यांना एक वर्षाची सक्तमजुरी न्यायालयाने ठोठावली. याविरुध्द त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ती अद्याप प्रलंबित आहे.
बडगुजर यांनी मागील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याविरुध्द चार खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. शहरातील मुंबई नाका, भद्रकाली, आडगाव, सरकारवाडा, अंबड या पोलीस ठाण्यांसह ग्रामीण भागातील घोटी पोलीस ठाण्यातही बडगुजर यांच्याविरुध्द गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचे स्वरुप दंगल घडवून आणणे, शासकीय नियमांचे आणि आदेशांचे उल्लंघन, सुरक्षितता धोक्यात आणणे, बेकायदेशीरिरत्या सभेचे आयोजन करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करण्याची कृती करणे, फसवणूक करणे, सरकारी कामात अडथळा आणणे असे आहे. याशिवाय त्यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यास मारहाण करण्याचा गुन्हा दाखल आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावर बडगुजर यांच्याविरुध्द २२ वर्षात २९ गुन्हे दाखल असल्याची माहिती ॲड. अतुल सानप यांनी दिली आहे.
वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये बडगुजर अडकत गेले. या गुन्ह्यांमधून सुटण्यासाठीच त्यांनी भाजप प्रवेशाचा पर्याय निवडल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत यांचे एकनिष्ठ अशी ओळख निर्माण झालेले बडगुजर यांनी त्यामुळेच स्वत:हून जाहीरपणे पक्षविरोधी वक्तव्य करुन हकालपट्टी ओढवून घेतल्याचेही म्हटले जाते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊ येथील कॅसिनोमधील छायाचित्र माध्यमांमध्ये आणण्यातही बडगुजर यांचाच हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.
नाशिक पश्चिम मतदार संघात बडगुजर यांचा दोनवेळा पराभव केलेल्या भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशास तीव्र विरोध केला होता. आपला विरोध कायम राहील, असे त्यांनी नमूद केले असताना सर्वसामान्य नागरिकांनाही बडगुजर यांची गुन्हेगारांना जवळ करण्याची वृत्ती खटकत आहे. बडगुजर यांनी त्यांच्या प्रभागात काही लोकोपयोगी कामे केलेली असली तरी त्यांचा स्थानिकांवर प्रचंड दबावही आहे. त्यामुळेच इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी वगळता त्यांच्याविरुध्द उघडपणे बोलण्याचे धाडस कोणी करीत नाही. सिडको, अंबड या भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असताना त्याविरोधात बडगुजर यांनी कधीच आवाज उठविला नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.