Latest News on Maharashtra Politics Today : पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलं, तर मोदी हात लावतात तिथे सोनं होतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानांचं तोंडभरून कौतुक केलं. ‘नवी मुंबईत तिसरी आणि वाढवण बंदर येथे चौथी मुंबई होईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठ्यांविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली. महाराष्ट्रातील या पाच महत्वाच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या विकासकामांचा पाढाच वाचून दाखवला. “हवाई चप्पल घालणारा सामान्य माणूसही हवाई प्रवास करू शकेल असे माझे स्वप्न आहे. त्यासाठी १० वर्षांत केंद्र सरकारने अनेक विमानतळांना परवानग्या दिल्या आहेत. २०१४ साली देशात ७४ विमानतळ होते आणि आता त्याची संख्या १६० झाली आहे”, असे मोदी म्हणाले.

“मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन मीच केले होते, पण त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ते काम थांबवले. त्यामुळेच मुंबईकरांना असुविधा झाली. मात्र, आता मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. एका एका मिनिटाचे महत्त्व असलेल्या मुंबईकरांना या प्रकल्पासाठी पाच वर्ष वाट पाहावी लागली. हे कोणत्याही पापापेक्षा कमी नाही”, अशी टीकाही मोदींनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केली.

आणखी वाचा : Azam Khan Interview : “ईदच्या दिवशी माझी पत्नी एकटी रडत होती, तेव्हा…” तुरुंगातून सुटल्यानंतर आझम खान काय म्हणाले?

मोदी हात लावतात तिथं सोनं होतं, शिंदेंकडून कौतुक

नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी त्यांनी मोदींचे वर्णन लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तव्यदक्ष पंतप्रधान असे केले. “मोदीजी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात, तेव्हा त्यांच्या शुभहस्ते मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण किंवा भूमिपूजन केले जाते. मोदीजी जिथे हात लावतात तिथे सोने होते”, असे शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी ‘स्थगिती सरकार’ असा उल्लेख करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदींसमोरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. नवी मुंबई येथील विमानतळ हे नव्या भारताच्या संकल्पाचा आणि पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रावरील विश्वासाचा एक प्रतीक असल्याचेही शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून चौथ्या मुंबईची घोषणा

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करताना चौथ्या मुंबईची घोषणा केली. “नवी मुंबईत विमानतळ करण्यासाठी डोंगर तोडावा लागला आणि नदीचा प्रवाहदेखील बदलावा लागला. हे विमानतळ देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावेल. त्यातून महाराष्ट्राचा एक टक्का जीडीपी वाढेल. या विमानतळावरून वॉटर टॅक्सीने गेट वे ऑफ इंडियाला जाता येईल. नवी मुंबईत तिसरी आणि वाढवण बंदर येथे चौथी मुंबई होईल”, अशी घोषणा फडणवीसांनी यावेळी केली. पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने आम्ही चाळीस किमीची भूमिगत मेट्रोही तयार केली. या मेट्रोमुळे आपण दक्षिण आणि उत्तर मुंबईला जोडू शकलो. हरित लवाद, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांच्या अडचणी येऊनही आम्ही हे काम पूर्ण केलं, असंही फडणवीस म्हणाले.

मनोज जरांगे यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठ्यांविरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. अजित पवार यांनी आपल्या पक्षात साप पाळले असून, ते मराठा समाजाविरोधात उघडपणे भूमिका घेत असल्याची टीकाही जरांगे यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांचा रोख छगन भुजबळ व बीडमधील ओबीसी मोर्चाकडे होता. “छगन भुजबळ हे मराठ्यांना शत्रू मानत आहेत. अनेक समुदायातील लोकांना ते मराठ्यांविरोधात फितवण्याचे काम करीत आहेत. बीडमध्ये मराठा समाजाविरोधात जो मोर्चा काढला जाणार आहे, तोदेखील अजित पवार पुरस्कृत असेल. एक दिवस आमचे शब्द खरे ठरतील आणि तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल”, असा इशाराही जरांगे यांनी अजित पवारांना दिला.

हेही वाचा : Asaduddin Owaisi : ‘भाजपाला पराभूत करायचे असेल तर…’ ओवैसींचा महाआघाडीला सल्ला; नेमकं काय म्हणाले?

शिवसेनेच्या खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. २०२२ मध्ये एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. आज (८ ऑक्टोबर) या प्रकरणाचा निकाल लागण्याची आस ठाकरे गटाचे नेते धरून बसले होते. मात्र, या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीपूर्वी शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत सुनावणी केली जावी, अशी हस्तक्षेप याचिका ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेची (ठाकरे) बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडत आहेत. आता १२ नोव्हेंबरच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.