scorecardresearch

Premium

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू एनडीएत जाणार? माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा दावा

जर इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली, तर त्याचा फटका काँग्रेसलाच बसेल. काँग्रेस हे होऊ देईल का? असा दावा करून इंडिया आघाडीतील पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएत दिसतील, असे विधान माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी केले आहे.

HD Deve Gowda Interview Sharad Pawar Nitish Kumar
भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी भाजपाशी युती करण्याचे कारण सांगितले. (Photo – The Indian Express / Anil Sharma)

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा एकेकाळी समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारांचे कट्टर समर्थक आणि भाजपाचे विरोधक समजले जात होते. त्यांनी आता आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाप्रणीत एनडीए सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ९१ वर्षांचे माजी पंतप्रधान देवेगौडा यांची ढासळत चाललेली प्रकृती आणि नुकत्याच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाची झालेली दुर्दशा यातून त्यांनी आपली मनोभूमिका बदलून भाजपासह जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. द इंडियन एक्सप्रेसने देवेगौडा यांची नुकतीच मुलाखत घेतली. ज्यामध्ये त्यांनी भाजपाशी युती, पंतप्रधान असताना मांडलेले महिला आरक्षण विधेयक आणि इंडिया आघाडी… अशा राजकीय विषयांवर आपल्या भूमिका व्यक्त केल्या. त्यांच्या मुलाखतीचा अंश प्रश्नोत्तराच्या स्वरुपात खालीलप्रमाणे…

प्रश्न : २७ वर्षांपूर्वी तुम्ही पंतप्रधान असताना पहिल्यांदा महिला आरक्षणाचे विधेयक मांडले होते. यावेळी राज्यसभेत विधेयकावर मतदान करण्यासाठी तुम्ही उपस्थित होतात. काय भावना होती मनात?

priyanka gandhi
छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना : प्रियंका
vasundhara_raje
विधानसभा निवडणूक : राजस्थानमध्ये नरेंद्र मोदीच प्रमुख चेहरा, वसुंधरा राजे यांचे राजकीय भवितव्य काय?
Samajwadi-Party-in-Chhattisgarh-Assembly-Election
समाजवादी पक्षाचा ‘इंडिया’ आघाडीत खोडा? छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारच्या विरोधात ४० जागा लढविणार
BJP-INDIA
पोटनिवडणुकीने भाजपला धडा शिकवला की ‘इंडिया’ला?

देवेगौडा : नक्कीच, हे विधेयक संमत झाले त्याबद्दल मला मनापासून आनंद वाटतो. अनेक वर्षांपासून यावर खल सुरू होता, अखेर ही कल्पना सत्यात उतरत आहे. मी १९९१ पासून महिला आरक्षण या विषयावर काम करतो आहे. १९९५ साली मी कर्नाटकचा मुख्यमंत्री असताना पंचायत पातळीवर आरक्षण लागू करण्याची संधी मला मिळाली होती. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्याशी माझे संबंध चांगले असल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेतही महिलांना आरक्षण दिले गेले पाहिजे, यासाठी त्यांच्याकडे मागणी लावून धरली. १९९५ साली मी एक महिला शिष्टमंडळही त्यांच्याकडे पाठविले होते. त्यावेळी मला हे माहीत नव्हते की, १९९६ साली मीच पंतप्रधान होईन आणि हे विधेयक सादर करेन.

१९९६ साली जेव्हा मी हे विधेयक सादर केले, तेव्हा आम्ही १३ पक्षांची आघाडी करून सरकार स्थापन केलेले होते. या विषयासाठी मला फारसा पाठिंबा नव्हता. तरीही माझ्या साथीदारांशी भांडून महिला आरक्षणाचे विधेयक लोकसभेत सादर केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधेयक सादर करून ते संमतही करून घेतले, हे पाहून मला आनंद वाटला. एप्रिल २०२३ मध्ये ज्यावेळी नव्या संसद भवनाचे उदघाटन केले होते, तेव्हा मी त्यांना एक दीर्घ पत्र लिहून याबद्दल आठवण करून दिली होती. मला अभिमान वाटतो की, त्यानंतर याचवर्षी त्यांनी विधेयक सादर केले. मी त्यांचे अभिनंदन व्यक्त केले आहे.

हे वाचा >> देवेगौडा यांची घराणेशाही, सात जण पदांवर तरीही वादंग

प्रश्न : स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना राखीव जागा दिल्यानंतर तुम्ही जे निरीक्षण केले, त्यातून महिला आरक्षण विधेयक मांडण्याची कल्पना तुम्हाला सुचली का?

देवेगौडा : माझ्याकडे दूरदृष्टी होती, हे आता मी सांगू शकत नाही. पण, हा अतिशय साधा विचार होता. तुम्ही जवळपास अर्ध्या लोकसंख्येला वगळू शकत नाहीत. या विधेयकाची संकल्पना जेव्हा मी मांडली, तेव्हा माझ्या डोक्यात फक्त शहरी भागातील महिला नव्हत्या. ग्रामीण भागातही या निर्णयाचे चांगले परिणाम दिसतील, हे मला माहीत होते. १९७० साली देवराज उर्स यांच्या सरकारच्या काळात कर्नाटक विधानसभेत मी विरोधी पक्षनेता होतो, तेव्हापासून महिलांचे शिक्षण आणि आरोग्य याला मी प्राथमिकता दिली आहे. मलाही दोन मुली आहेत, त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी मी स्वतः लक्ष घातले होते. १९९६ साली मांडलेल्या विधेयकामागे युनायटेड फ्रंट सरकारचा हा प्रगतिशील विचार होता.

प्रश्न : बाबरी मशिदीच्या पतनानंतर तुम्ही धर्मनिरपेक्ष प्रतिमा आग्रहाने जोपासली, मात्र भाजपाशी युती करण्याचा निर्णय हा अचानक मोठा बदल घडण्याचे कारण काय?

देवेगौडा : ‘काहीही बदलले नाही’ हे अनेकदा सांगत आलो आहे. माझे धर्मनिरपेक्ष विचार आणि तत्व तेच आहेत. अल्पसंख्याकांसहित सर्व समाजाशी माझी बांधिलकी तशीच आहे. काँग्रेसला स्वतःला सोडून इतर कसे वाईट आहेत, हे दाखिवण्याची सवयच आहे. माझ्या इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर मी सांगू शकतो की त्यांचा खरा रंग कोणता आहे. सत्तेत टिकून राहण्यासाठी त्यांनी किती तडजोडी केल्या आहेत मला माहिती नाहीत का? तसेच काँग्रेसचे किती नेते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सध्याच्या सरकारच्या संपर्कात आहेत, हेदेखील मला माहीत आहे.

प्रश्न : तुम्ही सांगितले की, नितीश कुमार यांना जेडी(एस) पक्ष इंडिया आघाडीमध्ये हवा होता, पण कर्नाटकमधील काँग्रेस नेत्यांनी त्यास विरोध केला. भाजपाशी युती करण्यामागे इंडिया आघाडीतून वगळले जाणे, हे कारण होते का?

देवेगौडा : हो, हे खरे आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ पासून नितीश माझ्या संपर्कात होते. आम्ही जनता फेडरल फ्रंट तयार करण्याच्या विचारात होतो. मी हेदेखील म्हणालो होतो की, नितीश कुमार यांना पंतप्रधान पदासाठी मी पाठिंबा देईन. माझ्या पक्षाचे त्यांच्या पक्षात विलिनीकरण करावे, अशी नितीश कुमारांची मागणी होती. पण, एप्रिल-मे २०२३ मध्ये कर्नाटकच्या निवडणुका असल्यामुळे विलिनीकरण शक्य नाही, हे मी कळविले होते. परंतु, पुढे आपण एकमेकांना सहकार्य करू शकतो, असे मी सांगितले होते.

पण, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होताच काँग्रेसच्या काही नेत्यांनी दबाव टाकल्यामुळे विरोधकांच्या संभाव्य आघाडीतून आम्हाला एकतर्फीपणे वगळण्यात आले. पाटणा येथे झालेल्या बैठकीला मला निमंत्रित केले गेले नाही. या वयात अशा प्रकारची मानहानी मी सहन करावी, हे तुम्हाला योग्य वाटते का? नितीश हे आताही माझे चांगले मित्र आहेत. अगदी सुरुवातीपासून काँग्रेसने स्वतःचे हित साधण्यासाठी या देशातील धर्मनिरपेक्ष आघाडी उद्ध्वस्त करून टाकली. ते फक्त पुरोगामी असल्याचा आव आणतात, पण ते तसे नाहीत. त्यांनी आमच्या धर्मनिरपेक्ष आघाडीला अस्थिर करून आमचे सरकारही खिळखिळे केले होते.

अल्पसंख्याकांच्या काँग्रेस पक्षाने काय केले, हे तुम्ही मला सांगाल का? भूतकाळाचे जाऊ द्या, पण काही काळापूर्वीच कर्नाटकमध्ये हिजाब आणि हलालचा वाद पेटला होता, तेव्हा अल्पसंख्याकांच्या बाजूने कोण उभे राहिले? काँग्रेस नेत्यांनी तेव्हा तोंडातून शब्द तरी काढला का? काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये काय सुरू आहे? आम्ही हिंदू राष्ट्रात राहतो, हे मध्य प्रदेशमध्ये कोण म्हणाले? बाबरी मशिदीच्या प्रकरणात कुणी काय केले, या विषयात आज मला जायचे नाही. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढल्यानंतर मी एकटा नेता होतो, ज्यांनी त्याचे कौतुक केले. पण, त्यांनी मला उत्तर दिले का? ते खूप मोठे नेते आहेत आणि मी सामान्य माणूस…

हे वाचा >> जनता दलाच्या पिछेहाटीबरोबरच देवेगौडा कुटुंबातच पराभवांची मालिका सुरू

माझ्या पक्षाची खरी किंमत अल्पसंख्याकांना लवकरच कळेल. मला इतर कुणाचेही प्रमाणपत्र नको…

प्रश्न : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जेडी(एस)ला दीर्घ काळ तग धरून राहण्यासाठी भाजपाची युती महत्त्वाची वाटते का?

देवेगौडा : तग धरण्याचा विषयच नाही. आम्ही एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहोत आणि युती करण्यामागे धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकात जे आज राज्य करत आहेत, त्यांना मी तयार केले आहे. त्यांचा अहंकार आज हे मान्य करायला तयार होऊ देणार नाही, तरीही हेच सत्य आहे. माझ्या पक्षातून जे नेते त्यांच्या पक्षात गेले, त्यांनी काँग्रेसच्या मूळ नेत्यांना संपवून टाकले. सिद्धरामया यांच्यामुळे मल्लिकार्जून खरगे यांना त्रास झाला नाही का? बी. के. हरीप्रसाद यांच्याशी कसा व्यवहार झाला? (हरीप्रसाद ओबीसी नेते असून त्यांना सरकारपासून लांब ठेवण्यात आले)

मी नेहमीच संघर्ष करत आलो, म्हणूनच तग धरून राहिलो. पुढेही मी हेच करत राहीन.

प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह असलेली तुमची वैयक्तिक मैत्री भाजपाशी युती करताना कामी आली?

देवेगौडा : हो, पंतप्रधान मोदींसह माझे संबंध सौहार्दपूर्ण राहिले आहेत. मी ज्या पार्श्वभूमीतून आलो, त्यातूनच ते आले आहेत आणि स्वतःच्या मेहनतीवर ते इतके मोठे झाले. त्यांनी मला आजवर खूप आदर दिला. जेव्हा लोक मला विसरले होते, तेव्हाही ते माझ्याशी तेवढ्याच आदराने बोलत होते.

प्रश्न : राजकीय युतीबाबत बोलत असताना भाजपा-जेडी(एस) युती कसे काम करणार?

देवेगौडा : या विषयावर आताच बोलणे हे खूप घाईचे होईल. यावर वेळेनुसार प्रतिक्रिया देईन.

प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेडी(यू) हे इंडिया आघाडीतील पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचे घटक पक्ष होतील असे तुम्ही म्हणालात?

देवेगौडा : इंडिया आघाडी अस्थिर आहे. आघाडीतील पक्षांमध्ये असलेले निवडणूक हितसंबंध आणि अजेंडे मेळ खात नाहीत. जर या आघाडीने चांगले यश मिळवले, तर त्याची भारी किंमत काँग्रेसलाच मोजावी लागेल. काँग्रेस त्यासाठी तयार आहे का? काँग्रेसने आता अचानक ओबीसी आरक्षणाचा विषय हाती घेतला आहे. ते भारतातील मंडल पक्ष संपविण्याचा प्रयत्न करत आहेत का? (मंडल आंदोलनानंतर तयार झालेले पक्ष) इंडिया आघाडीतील माझ्या मित्रांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे.

प्रश्न : भाजपाशी युती करण्याआधी काही अटी ठेवल्या आहेत. जसे की, जेडी(एस) पक्षाला कोणत्या जागा मिळणार किंवा देवेगौडा स्वतः निवडणूक लढविणार की नाही?

देवेगौडा : युती करण्याआधी काही अटीशर्ती ठेवल्याबाबत मला कोणतीही माहिती नाही, एवढेच सांगेन.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp and jdu party join nda after lok sabha elections says former prime minister deve gowda kvg

First published on: 02-10-2023 at 12:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×