कर्नाटक विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसचे स्थान खूपच दुय्यम मानले जात असताना इकडे सोलापुरातही या पक्षाची ताकद अतिशय क्षीण असल्याचा लाभ घेत राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी सोलापूर लोकसभा राखीव जागेवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दावा करायला सुरुवात केली होती. तशा हालचाली राष्ट्रवादीमध्ये दिसत असताना काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेल्या काही उत्साही मंडळींना सोलापूरच्या खासदारकीचे स्वप्नही पडत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मजबूत बांधणीसाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच सोलापुरात येऊन स्थानिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. परंतु कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर काँग्रेसचे स्थान काहीसे भक्कम झाल्यामुळे इकडे सोलापुरातही काँग्रेसजनांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे मागील सलग दोन्ही पराभव पचवून आता पुन्हा सोलापूर लोकसभेची जागा लढण्यासाठी सज्ज होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मनसुब्यांवर पाणी फिरले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर बदलू पाहणाऱ्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राष्ट्रवादीत राहून भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गुपचूप संधान बांधू पाहणाऱ्या मंडळींनाही आता फेरविचार करावा लागणार असल्याचे दिसून येते. त्या अर्थाने कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाने सोलापुरात राष्ट्रवादीला आधार मिळाल्याचे मानले जात आहे. शरद पवार मागील आठवड्यात सोलापुरात मुक्कामासाठी थांबले होते. पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणावर घटल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या रुपाने ताकदवान तरुण नेता राष्ट्रवादीला मिळाला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत अभिजित पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. सोलापुरातही पवार यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह प्रमुख नेत्यांशी हितगूज केली होती. विशेषतः एकेकाळी सोलापूर महापालिकेची सूत्रे वर्षानुवर्षे स्वतःच्या ताब्यात ठेवणाऱ्या कोठे कुटुंबीयांतील माजी महापौर महेश कोठे यांच्यासह दुसरे माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया, सुधीर खरटमल या काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या मंडळींनी शरद पवार यांच्याशी बंद खोलीत स्थानिक राजकीय परिस्थितीच्या संदर्भात खलबते केली होती. पवार यांनीही सविस्तर चर्चेसाठी कोठे, बेरिया, खरटामल यांना मुंबईत येण्यास सांगितले होते. त्यानुसार या तिघांनी वेळ घेऊन मुंबईत पवार यांची पुन्हा भेट घेतली होती. विशेषतः आगामी सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादीने सोडवून घेतल्यास ही जागा लढविण्याची सुधीर खरटमल यांची तयारी आहे.

हेही वाचा – Karnataka : मुस्लिमांसाठी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद मागणाऱ्या शफी सादीला भाजपाचा पाठिंबा? भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली!

खरटमल हे यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे विश्वासू सहकारी होते. महेश कोठे यांनी मागील वर्षी राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर असताना बेरिया, खरटमल यांच्यासह माजी महापौर नलिनी चंदेले, वादग्रस्त प्रतिमा असलेले नेते तौफिक शेख आदींना काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आणण्यात पुढाकार घेतला होता. तत्पूर्वी, दस्तुरखुद्द शरद पवार यांनीही महेश कोठे यांचे महत्त्व जाणून आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शहरातील पक्षाची सूत्रे कोठे यांच्याकडे सोपविली होती. त्यामुळे कोठे यांचा स्थानिक स्तरावर पक्षात दबदबा वाढत असतानाच राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि इकडे सोलापुरात महेश कोठे यांची चलबिचलता वाढू लागली. एकनाथ शिंदे यांनी आपणास विधान परिषदेवर स्थान देण्याचा शब्द दिल्याचे कोठे सांगू लागले. जो पक्ष आपणास आमदार करील, त्या पक्षाचे काम करू, अशी भूमिकाही कोठे हे स्पष्टपणे मांडू लागले. यात भर म्हणून गेल्या मार्च महिन्यात सोलापुरात संघ परिवाराच्या प्रभावाखालील हिंदुत्ववादी संघटनांनी लव्ह जिहाद, धर्मांतर यासारख्या मुद्यांवर हिंदू गर्जना महामोर्चा काढला, तेव्हा महेश कोठे हे राष्ट्रवादीची वैचारिक निष्ठा क्षणात बाजूला ठेवून हिंदू गर्जना महामोर्चात स्वतःच्या कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर कोठे यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या मुद्यावर राष्ट्रवादीच्या स्थानिक अध्यक्षासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवून प्रदेश पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखविले होते.

महेश कोठे यांची आपला राजकीय पवित्रा बदलून पुन्हा शरद पवार यांच्यावर निष्ठा वाहण्याचे ठरविल्याचे दिसून येते. परंतु तरीही त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आगामी सोलापूर महापालिका निवडणूक लढविताना पक्षाची संपूर्ण सूत्रे महेश कोठे यांच्या हाती सोपवतील काय, हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होणार आहे. आगामी महापालिका निवडणुका ताकदीने लढवून पक्षाला विस्तार करण्याची संधी असताना त्यापुढे जाऊन सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादीने सोडवून घेण्याच्या मागणीला पक्षातून वारा घातला जात आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सुधीर खरटमल यांनी तयारी सुरू केली आहे.

हेही वाचा – सिद्धरामय्या यांच्याविरोधातील भाजपाच्या उमेदवाराचे काय झाले? दोन जागांवर लढवली होती निवडणूक

सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडण्याच्या मागणीवरून काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादीचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांच्यात वाद झाला होता. त्यावर पडदा पडला असता आता पुन्हा याच मागणीसाठी राष्ट्रवादीत आलेल्या ‘आयारामांनी’ सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना डिवचण्याचा उद्योग सुरू केला आहे. शेजारच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे काँग्रेसचे देशाच्या राजकारणाणील स्थान बळकट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची खरोखर प्रामाणिक इच्छा असली तरीही काँग्रेसकडून लोकसभेची सोलापूरची जागा सोडवून घेणे हे सहज शक्य वाटत नाही. शेवटी जागा वाटपाचा मुद्दा महाविकास आघाडीशी निगडीत आहे. सुशीलकुमार शिंदे यांना दुखावून शरद पवार हे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत, असे स्थानिक राजकीय वर्तुळात सांगितले जाते. महत्त्वाचा पूर्वानुभव असा आहे की, आतापर्यंत सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांची साथ सोडून जी मंडळी बाहेर पडून दुसऱ्या पक्षात गेली, त्यांचा राजकीय उत्कर्ष खुटतच गेला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp eyes on solapur lok sabha seat the role of sushilkumar shinde is important print politics news ssb
First published on: 16-05-2023 at 11:29 IST