अहिल्यानगर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय आणि राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके यांनी नगर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीऐवजी शहर विकास आघाडी स्थापण्याचे जाहीर केले. त्यासाठी ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे परवानगी मागणार आहेत. त्यांचा उद्देश महायुतीला धक्का देण्याचा असला तरी जिल्ह्याने ‘स्थानिक’च्या निवडणुकीत आघाड्यांचा अनुभव यापूर्वी अनेकदा घेतलेला आहे. हे प्रयोग फारसे यशस्वी झालेले नाहीत आणि टिकलेले नाहीत.
तत्कालीन नेते बाळासाहेब विखे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून १९९२ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तत्पूर्वी त्यांनी जिल्हा विकास आघाडीचा प्रयोग करून दक्षिणमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले होते. जिल्हा व तालुकानिहाय आघाड्यांची त्यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणीही केली होती. या आघाडीने जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु दक्षिणेमध्ये विखे यांना हक्काचे कार्यकर्ते मिळाले. हे कार्यकर्ते आजही विखे गटाचे म्हणून ओळखले जातात.
श्रीरामपूरमध्ये तत्कालीन आमदार ज. य. टेकावडे आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी श्रीरामपूर शहर सुधार विकास आघाडी स्थापन करून पालिकेची निवडणूक लढवली होती. त्यांच्या आघाडीला दहा जागा मिळाल्या होत्या. नंतर मुरकुटे यांनी श्रीरामपूरमधील स्थानिक राजकारणासाठी लोकसेवा आघाडीची स्थापना केली. ती अजूनही कार्यरत आहे.
राज्यातील शिवसेना (एकत्रित) राष्ट्रवादी (एकत्रित) व काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी, २० वर्षे आधी नगर तालुक्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली होती, ती प्रामुख्याने आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विरोधासाठी. याच तीन पक्षांतील कर्डिलेविरोधक त्यासाठी एकत्र आले. या आघाडीने पंचायत समितीवर दीर्घकाळ वर्चस्व ठेवले. आता शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या विभाजनाने नगर तालुक्यातील आघाडीवर त्याचा परिणाम केला आहे.
असाच एक आगळावेगळा प्रयोग आमदार कर्डिले, माजी खासदार तुकाराम गडाख व ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे या त्यावेळच्या अपक्षांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी केला होता. त्यांनी शेतकरी विचारदल स्थापन केले होते. नगर-नेवासा- शेवगाव-पाथर्डी या तालुक्यातून या आघाडीने निवडणूक लढवली व सात जागा मिळवल्या होत्या. तिन्ही नेते परत पुन्हा आपापल्या मूळ राजकीय प्रवाहात सहभागी झाल्यामुळे, ही आघाडी नंतर संपुष्टात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी नेवासा तालुक्यात क्रांतिकारी शेतकरी आघाडी स्थापन केली. या आघाडीने नेवासा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच जागा मिळवत पंचायत समितीवरही झेंडा फडकावला. गडाख सध्या ठाकरे गटात असल्याने आगामी निवडणुकीसाठी ही आघाडी कायम ठेवणार का, हा चर्चेचा विषय आहे.
महापालिका निवडणुकीसाठी खासदार लंके शहर विकास आघाडीसाठी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. शिवसेना व काँग्रेसचे पदाधिकारीही वरिष्ठांकडे परवानगी मागणार आहेत. खासदार लंके हा प्रयोग ‘मविआ’ नेत्यांच्या गळी उतरवू शकतील का, याकडे नगरकरांचे लक्ष आहे.