NDA Seat Sharing in Bihar Election 2025 : गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपले लक्ष बिहारकडे वळवले आहे. यावर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या चर्चांना वेग आला असून राजकीय पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीसाठी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. भाजपा आणि जनता दल (युनायटेड) यांच्यात जागावाटपाची सहमती झाली असून लवकरच त्या संदर्भातील औपचारिक घोषणा केली जाणार आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत.

२०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडने ११५ आणि भाजपाने ११० जागांवर उमेदवार उभे केले होते. उर्वरित जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर मित्रपक्षांना देण्यात आल्या होत्या. आगामी निवडणुकीतही नितीश कुमार यांच्या पक्षाला भाजपापेक्षा एक जागा जास्त सोडली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. एनडीएमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून आता फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. जनता दल युनायटेड १०२ आणि भाजपा १०१ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा भाजपापेक्षा किमान एक जागा जास्त या मागणीचा विचार करूनच हे सूत्र ठरवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला (रामविलास) २० जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.

भाजपापेक्षा एक जागा जास्त हवी, जेडीयूचा तगादा

जनता दल युनायटेड पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, गेल्या वर्षीची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. या निवडणुकीत आमच्या पक्षाने १६ जागांवर, तर भाजपाने १७ जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना मान देऊन आम्ही त्यावेळी जागावाटपात तडजोड करून एक जागा कमी घेतली. आता विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे, त्यामुळे या निवडणुकीत भाजपापेक्षा आम्हाला एक जागा जास्त हवी आहे, जेणेकरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील समन्वयाबद्दल मतदारांमध्ये योग्य संदेश जाईल. दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी जेडीयूचे म्हणणे मान्य केले असले तरी काही मतदारसंघामधील उमेदवारीवरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत.

आणखी वाचा : Voter Verification Portal : राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ऑनलाइन प्रक्रियेत केले बदल, कारण काय?

चिराग पासवान यांची भूमिका काय?

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी मात्र जागावाटपाबाबत ठाम भूमिका घेतल्याचे दिसून येते. लोक जनशक्ती पार्टीला आगामी निवडणुकीत ४० जागा सोडण्यात याव्यात अशी आग्रही मागणी त्यांनी सोमवारी (तारीख २२ सप्टेंबर) केली. “आम्ही आमच्या पक्षाला मिळालेल्या सन्मानजनक जागांच्या संख्येवर कोणतीही तडजोड करणार नाही,” असे ते म्हणाले. भाजपातील सूत्रांनुसार, चिराग पासवान यांना ४० जागा हव्या आहेत. मात्र, त्यांना २० हून अधिक जागा देऊ नये अशी भाजपा आणि जेडीयूच्या नेत्यांची भूमिका आहे. गेल्या अनेक दशकांपासून बिहारचे राजकारण हे नितीश कुमार यांच्या पक्षाभोवती फिरते आहे. त्यांच्याबरोबर युती केल्याशिवाय राज्यात सत्तास्थापन केली जाऊ शकत नाही, असे भाजपाच्या काही नेत्यांचे मत आहे.

एनडीएतील जागावाटपाची अधिकृत घोषणा कधी?

राजकीय विश्लेषकांच्या मते, बिहारच्या निवडणूक समीकरणात जेडीयू आणि भाजपा एकमेकांसाठी अविभाज्य आहेत. दरम्यान, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी बिहारमधील सर्व जिल्ह्यांतील प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत चर्चा होणार आहे. बिहारचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल हे या बैठकीचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागा वाटपाची अधिकृत चर्चा ३ ऑक्टोबरनंतरच होईल. एकदा मोठ्या पक्षांचे जागावाटप निश्चित झाले की त्यानंतर लहान मित्रपक्षांना जागांचे वाटप केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

२०२० च्या निवडणुकीत बिहारमध्ये भाजपाला यश

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूला ११५ पैकी ४३ जागांवरच विजय मिळवता आला होता. दुसरीकडे भाजपाने ११० जागा लढवल्या आणि ७४ उमेदवार निवडून आणले होते. मात्र, गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूची कामगिरी भाजपापेक्षा चांगली होती, जिथे पक्षाने तब्बल १२ जागांवर विजय मिळवला आणि केंद्रात सत्तास्थापनेत मोलाची भूमिका बजावली. सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. काँग्रेस, आरजेडी व डाव्या विचारसणीचे पक्ष विरोधी गटात आहेत. महाराष्ट्र, हरियाणा व दिल्लीमध्ये भाजपाच्या विजयामुळे निर्माण झालेल्या गतीवर स्वार होऊन, एनडीएने बिहारमधील २४३ पैकी २२५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

महाआघाडीतही जागावाटपाबाबत खलबतं

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महाआघाडीतील राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमध्ये दरी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. जागावाटपावरून सध्या दोन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. काँग्रेसने जागावाटपाबाबत ठाम भूमिका घेतली आहे. तसेच आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबाबत स्पष्टता देण्यास महाआघाडीने नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी काँग्रेसवर दबाव वाढवला आहे. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या तेजस्वी यांनी निवडणुकीत सर्वच २४३ जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. “आगामी निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल सर्वच २४३ जागांवर निवडणूक लढवणार… मुजफ्फरपूर असो… कांटी असो किंवा बोरचहा असो… सर्वच जागांवर पक्षाचे उमेदवार उभे केले जातील,” असे विधान तेजस्वी यांनी मुजफ्फरपूर येथील सभेतून केले होते.

हेही वाचा : Visual Storytelling : आझम खान समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देणार? तुरुंगातून सुटका होताच ‘या’ पक्षात करणार प्रवेश?

आरजेडीने जिंकल्या होत्या सर्वाधिक जागा

दुसरीकडे राहुल गांधी यांनी काढलेल्या मतदार अधिकार यात्रेच्या कथित यशानंतर काँग्रेसनेही जागावाटपाबाबत ठाम भूमिका घेतली असून ७० जागांचा आग्रह धरला आहे. विशेष बाब म्हणजे- गेल्या निवडणुकीतही काँग्रेसने ७० जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी केवळ १९ जागांवरच पक्षाला विजय मिळवता आला. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडीने या निवडणुकीत १४४ जागा लढवल्या आणि तब्बल ८० जागांवर दणदणीत विजय मिळवला होता, तरीही काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे महाआघाडीला सत्तास्थापन करण्यात अपयश आले होते. एकीकडे आरजेडीने मुख्यमंत्रिपदाबाबत दावा केला असताना दुसरीकडे बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हे राज्यातील जनताच ठरवेल, असे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (AICC) बिहार प्रभारी कृष्णा अल्लावरू म्हटले आहे. त्यामुळे महाआघाडीत जागावाटपाचा काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.