Bihar Assembly Elections 2025 : बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या निकालाचा राष्ट्रीय राजकारणाच्या समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून धुसफूस होत असल्याचे समोर आले आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यासह केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावरून सूचक पोस्ट केल्या आहेत, त्यामुळे बिहारच्या निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

जीतन राम मांझी यांची सूचक पोस्ट

जीतन राम मांझी यांनी बुधवारी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी कवितेच्या माध्यमातून सूचक इशारा दिला. “हो न्याय अगर तो आधा दो, यदि उसमें भी कोई बाधा हो, तो दे दो केवल १५ ग्राम, रखो अपनी धरती तमाम, HAM वही खुशी से खाएंगें, परिजन पे असी ना उठाएंगे।” असे मांझी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. इतकेच नव्हे तर पीटीआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना मांझी यांनी जागावाटपावरून उघडपणे नाराजी व्यक्त केली. हिंदुस्थानी अवाम पक्षाला १५ पेक्षा कमी जागा मिळाल्यास आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

नेमके काय म्हणाले जीतन राम मांझी?

“बिहारच्या राजकारणात पदार्पण करून आमच्या पक्षाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. असे असले तरीही पक्षाला अद्यापही अधिकृत मान्यता मिळाली नाही, त्यामुळे पक्षाला मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक तेवढ्या जागांची आमची मागणी आहे. कुणाला किती आणि कोणत्या जागा मिळतील याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. १० ऑक्टोबरच्या आत त्या संदर्भातील निर्णय होईल”, असे जितनराम मांझी म्हणाले. “राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आमच्या पक्षाला अपमानित वाटत आहे. आम्हाला कोणत्याही बैठकांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. आणखी किती काळ आम्ही हा अपमान सहन करणार, मी नेहमीच एनडीएला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे त्यांनीही आमच्या पक्षाचा सन्मान ठेवायला हवा,” असेही जीतन राम म्हणाले.

आणखी वाचा : RSS ने मुस्लिमांचं संरक्षण करावं, उर्दू वृत्तपत्राची भूमिका; मोहन भागवतांना काय दिला सल्ला?

जितनराम मांझी स्वबळावर निवडणूक लढणार?

दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना जीतन राम मांझी यांनी सूचक विधान केले. “विधानभा निवडणुकीत पक्षाला १५ जागा मिळाव्यात अशी आमची इच्छा आहे. जर आम्हाला १५ जागा मिळाल्या तर त्यातील आठ ते नऊ जागांवर आम्ही सहज विजय मिळवू शकतो, पण तसे न झाल्यास आम्हाला ६० ते ७० मतदारसंघांमध्ये आमचा पाठिंबा वापरून पक्षाला ओळख मिळवून देण्याचा अंतिम पर्याय वापरावा लागेल,” असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दिला. यावेळी त्यांनी लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांचाही उल्लेख केला. “मला चिरागबद्दल कोणतीही अडचण नाही, पण कृपया आम्हाला अपमानापासून वाचवा,” अशी कळकळीची विनंती मांझी यांनी केली.

चिराग पासवान यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?

बिहारमधील जागावाटपावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील तणाव वाढत असताना केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक सूचक पोस्ट शेअर केली. पापा हमेशा कहा करते थे — “जुर्म करो मत, जुर्म सहो मत। जीना है तो मरना सीखो, कदम-कदम पर लड़ना सीखो,” असे चिराग यांनी या पोस्टमध्ये म्हटले. सूत्रांच्या माहितीनुसार, चिराग पासवान यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून ३५ जागांची मागणी केली आहे. मात्र, भाजपाने त्यांना केवळ २५ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे, त्यामुळे चिराग नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

बिहारमध्ये नितीश कुमारच मोठा भाऊ?

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. भाजपा आणि जनता दल (युनायटेड) यांच्यात जागावाटपाची सहमती झाली असून लवकरच त्या संदर्भातील औपचारिक घोषणा केली जाणार आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडने ११५ आणि भाजपाने ११० जागांवर उमेदवार उभे केले होते. उर्वरित जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर मित्रपक्षांना देण्यात आल्या होत्या. आगामी निवडणुकीतही नितीश कुमार यांच्या पक्षाला भाजपापेक्षा एक जागा जास्त सोडली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : Top Political News : ‘मोदी हात लावतात तिथे सोनं होतं’, शिंदेंचं कौतुक ते फडणवीसांकडून चौथ्या मुंबईची घोषणा; दिवसभरातील ५ घडामोडी

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून आता फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. जनता दल युनायटेड १०२ आणि भाजपा १०१ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा भाजपापेक्षा किमान एक जागा जास्त या मागणीचा विचार करूनच हे सूत्र ठरवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला (रामविलास) २० जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दशकांपासून बिहारचे राजकारण हे नितीश कुमार यांच्या पक्षाभोवती फिरते आहे. त्यांच्याबरोबर युती केल्याशिवाय राज्यात सत्तास्थापन केली जाऊ शकत नाही, असे भाजपाच्या काही नेत्यांचे मत आहे.