Bihar election NDA seat sharing बिहारमधील एनडीए आघाडीच्या जागावाटपाचे चित्र जवळजवळ स्पष्ट असल्याचे दिसून येत होते. आठवडाभरापूर्वी भाजपा आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) यांनी बिहारमधील आगामी निवडणुकांमध्ये कोण किती जागांवर निवडणूक लढवणार हे ठरवले होते. मात्र, असे असले तरी अंतिम जागावाटप अजून निश्चित झालेले नाही, अशी माहिती काही पक्षांतर्गत सूत्रांनी दिली आहे. याचे कारण म्हणजे जेडीयूने भाजपापेक्षा किमान एक जागा जास्त मिळवण्यासाठी आग्रह धरला आहे. बिहारमधील एनडीएच्या जागावाटपाचा तिढा कधी सुटणार? एका जागेवरून मित्रपक्षांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात का? जाणून घेऊयात…

एका जागेवरून भाजपा अन् जेडीयूत मतभेद?

एनडीएच्या सूत्रांनुसार, ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार व ज्येष्ठ नेते दिल्लीत प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. त्याच आठवड्यात अंतिम जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते दिल्लीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. “आम्ही आतापर्यंत जो अंदाज लावला आहे, त्यानुसार जेडीयूला जास्त जागा हव्या आहेत. त्यांना भाजपापेक्षा एक जरी जागा जास्त असली तरी चालेल. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची लोकप्रियता आणि त्यांच्या क्षमतेवर भाजपा नेतृत्वाचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दाखवायचे आहे,” असे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. जेडीयूच्या नेत्यांनी सांगितले की, पक्ष राजकीय प्रतीकात्मकतेसाठी भाजपापेक्षा किमान एक जागा जास्त मिळावी असा आग्रह धरत आहे.

भाजपा आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) यांनी बिहारमधील आगामी निवडणुकांमध्ये कोण किती जागांवर निवडणूक लढवणार हे ठरवले होते. मात्र, असे असले तरी अंतिम जागावाटप अजून निश्चित झालेले नाही. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

“लोकसभा निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. तेव्हा भाजपाने १७ जागा लढवल्या होत्या, तर आम्ही १६. आता विधानसभा निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जात आहेत. त्यामुळे आम्हाला एक जागा जास्त मिळणे स्वाभाविक आहे. यातून नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर आणि एनडीएतील समन्वयाबद्दल मतदारांमध्ये योग्य संदेश जाईल,” असे जेडीयूच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

चिराग पासवान यांचा पक्ष किती जागा लढवणार?

केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (राम विलास) ४० जागांसाठी दबाव टाकत आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला किती जागा मिळतात हे निश्चित करण्यात ते एक महत्त्वाचा घटक ठरू शकतात. लोजपा (आरव्ही) पक्ष त्यांच्या पाच खासदारांच्या आधारावर ४० जागांची मागणी करत आहे. परंतु भाजपा आणि जेडीयू त्यांना इतक्या जागा देण्यास तयार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मंच आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तानी अवाम मोर्चा यांसारख्या इतर मित्रपक्षांना युतीतील तीन प्रमुख पक्षांच्या जागा निश्चित केल्यानंतर उर्वरित जागा दिल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूने ११५ आणि भाजपाने ११० जागा लढवल्या होत्या. त्यावेळी, एनडीएचा भाग असलेल्या विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) ने ११ आणि एचएएम (एस) ने सात जागा लढवल्या होत्या, तर लोजपा (तेव्हा एकत्रित) ने स्वतःहून १३५ जागा लढवल्या होत्या.

त्या निवडणुकीत भाजपाने ७४ जागा जिंकल्या, तर जेडीयूने ४३ जागा जिंकल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बिहार निवडणुकांवर झालेल्या बैठकीनंतर, भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने एनडीएची एकत्रित आघाडी दर्शवण्याचे निर्देश दिले होते. पक्षाने सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये संयुक्त कामगार संमेलने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूणच आगामी बैठकांमध्ये जागावाटपाबाबत नक्की काय निर्णय होतो, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.