Nitish Kumar Political Alliances : बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री तथा जनता दल युनायटेड पक्षाचे प्रमुख नितीश कुमार यांना बिहारच्या राजकारणात ‘पलटू राम’ म्हणून हिणवले जाते. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीची साथ सोडून सत्ताधारी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या १० वर्षांत नितीश कुमार यांनी तब्बल चारवेळा आपली राजकीय भूमिका बदललेली आहे. तरीदेखील भाजपाने प्रत्येक वेळी त्यांचे स्वागतच केले आहे. दरम्यान, भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर जनता दल युनायटेड पक्षाला कसे यश मिळत गेले? त्या संदर्भात जाणून घेऊ…
२००५ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री
बिहारमध्ये १९९० ते २००५ या कार्यकाळात लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल पक्षाचे सरकार होते. त्यानंतर २००५ मध्ये राज्यात पहिल्यांदा भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्तास्थापन केली. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी नितीश कुमार यांच्याकडे सोपवण्यात आली. तेव्हापासून भाजपा-जनता दल युनायटेड पक्षाच्या युतीने बिहारमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्याचे दिसून येते. २४३ सदस्यसंख्या असलेल्या बिहारच्या विधानसभेत १२२ ही बहुमताची संख्या आहे. २००५ आणि २०१० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जेडीयू-भाजपा युतीने १२२ जागांचा बहुमताचा आकडा सहजपणे पार केला होता.
मोदी लाटेत स्वबळावर लढले
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट आली. या लाटेत जनता दल युनायटेड पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. नितीश कुमार यांच्या या निर्णयाचा त्यावेळी पक्षाला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. जनता दल पक्षाला या निवडणुकीत ४० पैकी केवळ दोनच जागांवर विजय मिळवता आला. दुसरीकडे भाजपाने तब्बल ३१ जागा जिंकून बिहारमध्ये आपली मजबूत पकड निर्माण केली. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी भाजपाशी फारकत घेतली आणि ते लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाबरोबर महाआघाडीत सामील झाले. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर महाआघाडीने राज्यात सत्तास्थापन केली आणि नितीश कुमार तिसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले.
आणखी वाचा : बिहारमध्ये मोदी-शाहांकडून ‘जंगलराज’चा उल्लेख; मुळात हा शब्द नेमका आला तरी कुठून?
२०१७ मध्ये महाआघाडीतून बाहेर
दोन वर्षांच्या राजकीय सलोख्यानंतर राजद आणि जेडीयूमधील युती तुटली आणि २०१७ मध्ये नितीश कुमार महाआघाडीतून बाहेर पडले. यानंतर भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होऊन त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाबरोबर युती केल्याचा जेडीयूला मोठा फायदा झाला. २०१४ मध्ये स्वबळावर केवळ दोनच जागा जिंकणाऱ्या जेडीयूला या निवडणुकीत १७ जागांपैकी तब्बल १६ जागांवर विजय मिळाला. या युतीच्या बळावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राज्यातील ४० पैकी ३९ जागा आपल्या पारड्यात टाकल्या. विशेष बाब म्हणजे महाआघाडीला (ज्यात काँग्रेसच्याही सहभाग होता) केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
भाजपाबरोबर मिळाले मोठे यश
२०२० मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि नितीश कुमार यांच्या आघाडीने १२५ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा गाठला. या निवडणुकीत भाजपाने तब्बल ७४ तर जनता दल युनायडेट पक्षाने ४३ जागा जिंकल्या. कमी जागा मिळूनही एनडीएने राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापन केली आणि नितीश कुमार यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष बाब म्हणजे विरोधकांच्या महाआघाडीनेही या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कडवी झुंज दिली. युवा नेते तेजस्वी यादव यांच्या बळावर महाआघाडीने ११० जागा जिंकल्या होत्या, ज्यात राजदच्या सर्वाधिक ७५ जागांचा समावेश होता.
२०२४ मध्ये पुन्हा भाजपाशी हातमिळवणी
अवघ्या दोन वर्षांनंतर म्हणजेच २०२२ मध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडून महाआघाडीत प्रवेश केला. राजद व काँग्रेसशी हातमिळवणी करून त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, महाआघाडीबरोबरचा त्यांचा हा प्रवासही फार काळ टिकला नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश यांनी पुन्हा एकदा पलटी घेत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची कास धरली. नितीश कुमार यांनी एनडीएमध्ये परतल्यानंतर लगेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-जेडीयू युतीने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली. बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांपैकी एनडीएने तब्बल ३० जागा जिंकल्या. या निवडणुकीत दोन्ही पक्षांना प्रत्येकी १२ जागांवर यश मिळाले.
आणखी वाचा : भाजपाने १४ वर्षांनी काढला ‘त्या’ पराभवाचा वचपा; ओमर अब्दुल्ला यांना मोठा धक्का, काश्मीरमध्ये काय घडलं?
बिहारमध्ये एनडीएला किती यश मिळणार?
नितीश कुमारांच्या पलटीमुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. या निवडणुकीत त्यांना केवळ नऊ जागांवरच समाधान मानावे लागले, तर इतर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली. सततच्या राजकीय कोलांट्या आणि निवडणुकीतील यशस्वी कामगिरीमुळे नितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणावर आपली छाप सोडली आहे. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत कोणताही पक्ष मोठा ठरला तरीही राज्याच्या राजकारणावर आपलीच पकड मजबूत राहील याची काळजी ते घेताना दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत नितीश कुमार आणि भाजपाच्या सत्ताधारी आघाडीला नेमके किती यश मिळणार हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
