भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया नावाने आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीत एकूण २८ पक्ष आहेत. मात्र सध्या घेतल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील घटकपक्षांतील मतभेद समोर आले आहेत. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि समाजवादी पार्टी (सपा) या पक्षांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. हीच नाराजी बिहारचे मुख्यमंत्री तथा जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी जाहीर सभेत बोलून दाखवली आहे. त्यांनी यावेळी इंडिया आघाडीवरही भाष्य केले.
काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीत व्यग्र
सीपीआय पक्षातर्फे ‘बीजेपी हटाओ, देश बचाओ’ नावाने एक सभा आयोजित करण्यात आली होती. यास सभेत नितीश कुमार देखील सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीकात्मक भाष्य केले. “भाजपाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधक एकत्र आले आहेत. या पक्षांनी आघाडी केली आहे. ही आघाडी झाल्यामुळे आम्हाला स्फूर्ती मिळाली होती. मात्र सध्या काँग्रेस विधानसभा निवडणुकांत व्यग्र आहे. या पक्षाला विधानसभा निवडणुकांतच रस आहे. त्यामुळे आघाडीच्या पुढील वाटचालीवर फार काही झालेले नाही. या आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करेल, असे आम्ही ठरवले होते. मात्र पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच आमच्या आघाडीची पुढची बैठक होईल, असे वाटत आहे,” असे नितीश कुमार म्हणाले.
काँग्रेसने दिली प्रतिक्रिया
नितीश कुमार यांच्या या विधानानंतर बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. इंडिया आघाडीतील पक्षांनी अधिक सक्रिय राहायला पाहिजे, अशी इच्छा नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे. यात काहीही वावगे नाही, असे अखिलेश सिंह म्हणाले. राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य सय्यद नासीर हुसैन यांनीदेखील नितीश कुमार यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली. “सध्या आम्ही विधानसभा निवडणूक गंभीरपणे लढत आहोत. आगामी सहा महिन्यांत लोकसभा निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत, हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे या निवडणुकांना गंभीरपणेच घेतले पाहिजे,” असे हुसैन म्हणाले.
पाच राज्यांच्या निवडणुकीनंतरच जागावाटप, काँग्रेसची भूमिका
काँग्रेस पक्षाने सध्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष दिलेले आहे. या राज्यांतील निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. यातील काही राज्यांत काँग्रेसची सत्ता आल्यास इंडिया आघाडीत जागावाटपासाठी शक्ती वाढेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. याच कारणामुळे इंडिया आघाडीत जागावाटपावरील चर्चा ही या राज्यांची निवडणूक झाल्यावरच व्हावी, अशी इच्छा काँग्रेसची आहे.
अखिलेश यादव आणि काँग्रेस यांच्यात वाद
इंडिया आघाडीच्या घटकपक्षांनी राजस्थान, मध्य प्रदेश यासारख्या राज्यांत निवडणुकीसाठी युती करावी, अशी इच्छा आघाडीतील काही घटकपक्षांनी व्यक्त केली होती. मात्र काँग्रेसे त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. काँग्रेस पक्ष फक्त तेलंगणामध्ये डाव्या पक्षांशी युती करण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी काँग्रेसशी जागावाटपासाठी बातचित केली होती. मात्र काँग्रेसने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. याच कारणामुळे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात वाद निर्माण झाला होता. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी काँग्रेसवर उघड टीका केली होती. इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकीसाठी आहे, हे मला आधी माहीत असते तर चर्चेसाठी मी माझे नेते पाठवलेच नसते. काँग्रेस आपल्या मित्रपक्षांचा विश्वासघात करत आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली होती.
आप आणि सपाने दिले ९२ उमेदवार
त्यानंतर नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षानेदेखील काँग्रेसशी जागावाटपावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे या पक्षानेही काँग्रेसच्या या भूमिकावर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता इंडिया आघाडीतील आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टी हे दोन्ही पक्ष मध्य प्रदेशमध्ये एकूण ९२ जागा लढवत आहेत. जेडीयू पक्षानेदेखील १० जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.