संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी भाजपाशी काडीमोड करून राष्ट्रीय जनता दलाशी हातमीळवणी करत काही महिन्यांपूर्वी बिहारमध्ये सत्ता स्थापन केली. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आता नितीशकुमार यांनी भाजपाविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. त्यांनी १ जानेवारी रोजी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपावर कठोर शब्दांत टीका केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या विधानाचा आधार घेत देशाच्या नव्या राष्ट्रपित्यांनी देशासाठी काय केले? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : नोटबंदीचा निर्णय वैधच! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; मात्र आक्षेप काय होता? कोर्टाचा नेमका निर्णय काय?

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अमृता फडणवीस यांनी आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपीता आहेत, असे विधान केले होते. या विधानानंतर विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले होते. याच विधानाचा आधार घेत नितीशकुमार यांनी भारताच्या नव्या राष्ट्रपित्यांनी देशासाठी काय केले? असे खोचकपणे विचारले आहे. “त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी कसलाही संबंध नाही. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान नाही. काही दिवसांपूर्वी मी देशाच्या नव्या राष्ट्रपित्यांबाबत काही ऐकले होते. याच नव्या राष्ट्रपित्यांनी (नरेंद्र मोदी) देशासाठी काय केले आहे?” असे नितीशकुमार म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Amruta Fadnavis on Narendra Modi : गांधी जुन्या तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझे वडील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. माझा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला. मात्र, नंतर स्वातंत्र्यलढ्याची प्रत्येक गोष्ट समजून घेतली. भारताच्या स्वातंत्र्यातील महात्मा गांधींचं योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. मात्र, आता काही लोक राष्ट्रपित्यांविषयी काय बोलत आहेत हे सर्वजण पाहत आहेत. आता हे म्हणत आहेत की जुने राष्ट्रपिता विसरूम जा, नवे राष्ट्रपीता आले आहेत,” असे म्हणत नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला.