मुंबई : कथित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणारे रवींद्र वायकर व अशा चौकशीनंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणारे अमोल किर्तीकर अशा ‘ईडी’ची चौकशी सुरू असलेल्या दोन शिवसैनिकांत यंदा वायव्य मुंबईत चुरशीची लढत होत आहे. गेल्या दोन निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा खासदार लोकसभेत पाठविणाऱ्या या मतदारसंघात यंदाची परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेत पडलेली फूट हा कळीचा मुद्दा आहे. वायकर यांनी उद्धव ठाकरेंना ज्या कारणासाठी सोडचिठ्ठी दिली, ती अनेक निष्ठावंत शिवसैनिकांच्या पचनी पडलेली नसल्याचे जाणवते. त्याचेच पडसाद या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
विद्या ठाकूर (गोरेगाव), डॅा. भारती लव्हेकर (वर्सोवा), अमित साटम (अंधेरी पश्चिम) तसेच रवींद्र वायकर (जोगेश्वरी पूर्व) हे चार मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत तर ठाकरे गटाकडे सुनील प्रभू (दिंडोशी) आणि ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व) असे दोनच मतदारसंघ आहेत. कागदावर महायुतीच्या वायकर यांचे पारडे जड वाटत आहे. परंतु प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. या वेळी मिळालेल्या मतांचा विचार केला तर शिवसेनेतील फूट व उद्धव ठाकरे यांना असलेला मोठा प्रतिसाद किर्तीकर यांची जमेची बाजू आहे. या सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे स्थान फारसे नसले तरी बऱ्या प्रमाणात निश्चित मते असून ती या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. वर्सोवा मतदारसंघात भाजपच्या डॉ. लव्हेकर यांना ठाकरे गटात असलेल्या राजुल पटेल यांनी अपक्ष म्हणून चांगली लढत दिली होती. पटेल या आता किर्तीकर यांच्यासोबत आहेत. दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव या मतदारसंघात ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा निश्चितच किर्तीकर यांना मिळण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा-मतदारसंघाचा आढावा : ईशान्य मुंबई- भाषिक आणि धार्मिक वळणार गेलेली लढत
वडील दहा वर्षे खासदार असल्याच्या माध्यमातून अमोल किर्तीकर लोकांच्या संपर्कात आहेत तर गेली ३५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेत घालविलेले वायकर हे चार वेळा पालिका व तीन वेळा विधानसभा निवडणूक चांगल्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. परंतु आता निष्ठावान आणि गद्दार असा रंग चढलेल्या लढाईत मूळ शिवसैनिक कुठल्या बाजुने आहेत, हे स्पष्ट करणारी ही निवडणूक ठरणार आहे. महायुतीच्या उमेदवारासोबत भाजप हा प्रमुख पक्ष आहे तर फारसा प्रभाव नसलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), वंचित आघाडी सोबत आहेत तर महाविकास आघाडीसाठी काँग्रेस, समाजवादी पार्टी तसेच आम आदमी पार्टीची साथ आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल, यात शंका नाही.
जोगेश्वरीतील पंचतारांकित हॉटेलची उभारणी आणि क्लबच्या बांधकामात झालेल्या गैरव्यवहारातून वायकर यांच्यावर आरोप झाले. त्यांची ईडीकडून चौकशी झाली. पत्नीही आरोपी असल्याने वायकर अक्षरक्ष: घायकुतीला आले होते. शेवटी शिंदे यांना शरण जात उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले संबंध तोडले. वास्तविक ठाकरे आणि वायकर यांच्यात चांगलेच सख्य होते. अलिबागमधील बंगले उभारण्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. अमोल कीर्तीकर यांच्यावर करोना काळातील खिडची घोटाळ्याचा आरोप आहे. उमेदवारी जाहीर होताच त्यांचीही ‘ईडी’ कडून चौकशी झाली. ‘ईडी’च्या रडारवर असलेल्या दोन शिवसैनिकांमध्येच ही लढत होत आहे. ‘गजाआड होण्यापासून वाचण्याकरिताच शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा वायकर यांनी अलीकडेच केला होता. पण बरीच टीका झाल्यावर त्यांनी सारवासारव केली. पण त्यातून वायकर हे अटकेला घाबरून शिंदे गटात गेले हे स्पष्ट झाले. वायकर यांची लोकसभा लढण्याची इच्छा नव्हती. पण शिंदे यांच्यापुढे त्यांचा नाईलाज झाला.
आणखी वाचा-मतदारसंघाचा आढावा : पालघर- हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचा फायदा भाजप की ठाकरे गटाला?
उत्तर भारतीय मते निर्णायक…
या मतदारसंघात एकूण १७ लाख ३५ हजार ८८ मतदार असून गेल्या पाच महिन्यांत २८ हजारांच्या संख्येने वाढ झाली आहे. यापैकी ६० टक्के उत्तर भारतीय, २० ते २२ टक्के मराठी व मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार अशी विभागणी आहे. सर्वाधिक मतदारसंख्या आधी शिवसेनेच्या व सलग दोन निवडणुकांत भाजपच्या ताब्यात असलेल्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघात आहे. वायकर यांच्या उमेदवारीमुळे भाजप आणि मनसेने उघड नाराजी व्यक्त केली होती. परंतु आमच्यात आता आलबेल आहे, असे वायकर स्वत:च सांगत आहेत. भाजपचे आमदार वायकरांसमवेत दिसत आहेत. शिवाय वायकरांना मत म्हणजे मोदींना मत, असा भाजपाकडून प्रचार सुरू आहे. याचा फायदा वायकर यांना होण्याची शक्यता आहे. मुळात वायकर हे लोकसभेसाठी इच्छुक नव्हते. परंतु त्यांना निवडणूक लढविण्यास भाग पाडले गेले. त्यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला आहे. पण त्याचवेळी किर्तीकर यांची उमेदवारी आधीच जाहीर झाल्यामुळे त्यांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळाल्याने त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्याचा फायदा त्यांना निश्चितच मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही शिवसेनेच्या फुटीमुळे झालेले मतांच्या ध्रुवीकरणात उत्तर भारतीय मते निर्णायक ठरणार आहे हे निश्चित!