चंद्रपूर : महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटप बघता शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (ठाकरे) या तीन पक्षांच्या वाट्याला चंद्रपूर जिल्ह्यातील एकही जागा येणार नाही, अशी सध्याची राजकीय स्थिती आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील सर्व जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नसले तरी उमेदवारीतील भोपळा या तीनही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणार ठरतो आहे.

चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, वरोरा, राजुरा व ब्रम्हपुरी या जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत काँग्रेस व भाजपचेच वर्चस्व आहे. या दोन पक्षांकडे माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवक, माजी महापौर, माजी नगराध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सभापती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील इतर पदांवर सक्रिय असलेले पदाधिकारी आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेसेना आणि ठाकरे सेना, या तीन पक्षांची राजकीय ताकद नगण्य आहे.

हेही वाचा – महामार्ग रद्द करण्याच्या अधिसूचनेनंतर महायुती – ‘मविआ’त राजकीय शह – काटशह

ठाकरे सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही माजी पदाधिकारी सक्रिय आहेत. त्यामुळे ठाकरे सेना आंदोलन, मोर्चे तसेच लोकांच्या समस्यांवर काम करताना दिसते. या पक्षांचे तीन जिल्हाप्रमुख प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघांत सक्रिय आहेत. मात्र शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी केवळ फलकबाजी आणि नेत्यांच्या आजूबाजूला घुटमळत दिसतात. या दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडवणे, मोर्चे, आंदोलने करताना फार कमी दिसतात. याचाच विचार झाल्याने या तिन्ही पक्षांना जिल्ह्यात विधानसभेची एकही जागा सुटली नाही.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जिल्ह्यातील एकही जागा मागितली नव्हती. मात्र, शिंदे सेनाकडून वरोरा व ब्रम्हपुरी या दोन जागांवर दावा करण्यात आला होता. २०१९ मध्ये या दोन्ही जागा एकसंघ शिवसेनेने युतीतर्फे लढल्या होत्या. आता या जागा शिंदेसेनेला सुटण्याची शक्यता कमीच आहे. तसेच ठाकरेंच्या शिंवसेनेने बल्लारपूर ही एकमेव जागा जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्यासाठी मागितली होती. मात्र, काँग्रेसच्या नकारामुळे त्यांनाही आपला दावा सोडावा लागला.

हेही वाचा – ६२ टक्के आमदारांवर गुन्हे, बहुतांश करोडपती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे यांच्या मनसे, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून तीन मतदारसंघांतील उमेदवारही जाहीर केले आहेत. राज्याच्या राजकारणात निर्णायक भूमिकेत असलेल्या या तिन्ही पक्षांना जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी एकही जागा न मिळणे, ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.