परभणी : सुरुवातीला ‘स्थानिक’ विरुद्ध ‘बाहेरचा’ असा झालेला प्रचार, त्यानंतर मराठा व ओबीसी मतदारांची फाळणी करून होणारे ध्रुवीकरण आणि आता शेवटच्या टप्प्यात परस्परांची मतपेढी फोडण्याचे होत असलेले जोरदार प्रयत्न… अशा पद्धतीने परभणी लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार राजकीय अस्तित्वासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसत आहेत. मतदान आठवड्यावर आलेले असताना जातीय समीकरणांची आकडेमोड आणि फेरमांडणी सुरूच आहे.

परभणी मतदारसंघात शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि रासपचे महादेव जानकर यांच्यात लढत होत आहे. या लोकसभा मतदारसंघावर असलेले शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी महायुतीचे सर्व स्थानिक नेते झाडून पुसून कामाला लागले आहेत. वरिष्ठ पातळीवरूनही महायुतीतल्या प्रमुख तीन राजकीय पक्षांची ताकद परभणीसाठी एकवटली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला परभणीत हातपाय पसरता आले नाहीत आणि फुटही पाडता आली नाही म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरचा राग या सेनेला काढायचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी जानकर यांचे सहकार्य हवे आहे परिणामी अजित पवारांची राष्ट्रवादी ही जानकर यांच्यासाठी झटताना दिसत आहे. विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या विरोधात भाजपने आक्रमक प्रचार चालवला आहे. दहा वर्षाच्या खासदारकीच्या काळात जाधव यांनी नेमके केले काय असा प्रश्न महायुतीच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा – गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?

महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी याच मुद्द्यावर खासदार जाधव यांच्यावर टीका सुरू केली आहे. परभणीत रस्ते धड नाहीत, उद्योगधंदे नाहीत, पिण्यासाठी पाणी नाही, आरोग्य सुविधा नाहीत, खासदारांचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित आहे असे आरोप जानकर यांनी केले आहेत. दुसऱ्या बाजूने खासदार जाधव यांच्याकडून भाजप विरोधी प्रचाराची धार तीव्र करण्यात आली आहे. राजकीय आकसापोटी जिल्ह्यातल्या विकास कामांमध्ये खीळ घालण्याचा प्रयत्न भाजपने केला, निधी अडवला, स्वार्थासाठी राजकीय पक्ष फोडले असे आरोप खासदार जाधव यांनी केले आहेत. सुरुवातीला परस्परांविषयी अंतर राखून टीका करणारे हे दोन्ही उमेदवार शेवटच्या टप्प्यात एकेरीवर आल्याचे दिसून आले.

मत विभागणीवर महायुतीने लक्ष केंद्रित केले आहे. मराठा मतांचे विभाजन करण्यासाठी अगदी वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या. रिंगणात चर्चेतले मराठा उमेदवार उतरविण्यासाठी पडद्याआड बऱ्याच घडामोडी घडल्या. दोन्ही बाजूंनी मत विभागणी टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रतिस्पर्ध्याच्या प्रभावक्षेत्रातील मतदान फोडण्यावर सध्या दोघांनीही लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचा परंपरागत मतदार व ओबीसी यावर जानकर यांची मदार आहे तर मराठा व मुस्लिम या मतांवर जाधव यांचे गणित अवलंबून आहे. दलित मतदारांना दोघांनीही गृहीत धरले आहे. मतदारसंघातील एकूण मतदार संख्या २१ लाख एवढी आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला पराभूत करण्यासाठी भाजपची नेतेमंडळी परभणीत तळ ठोकून आहेत. यावरून ही झुंज किती निकराची आहे याची कल्पना येईल. रिंगणात ३४ उमेदवार असले तरी मुख्य लढत ही खासदार जाधव विरुद्ध महादेव जानकर अशीच आहे आणि शेवटच्या टप्प्यात ती अटीतटीची झाली आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी आदी मतदारसंघांमध्ये नेहमी ‘खान हवा की बाण हवा’ असा प्रचार शिवसेनेकडून केला जातो. यंदा शिवसेनेची भिस्त मुस्लीम मतांवरही आहे. साहजिकच बाण की खान हा मुद्दा मागे पडला आहे.

हेही वाचा – “मी अयोध्येत गेलो तर त्यांना सहन झाले असते का?” काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांचा सवाल

मराठा मतांचे विभाजन किती ?

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डक, मराठा आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष जावळे, माजी मंत्री गणेश दुधगावकर यांचे चिरंजीव समीर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे हे मराठा उमेदवार परभणी लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत. हे उमेदवार जे मतदान घेतील ती महाविकास आघाडीच्याच मतातली घट असणार आहे.

स्थलांतरित मतदारांवरही भिस्त

रोजगार व कामधंद्यासाठी अन्य भागात गेलेल्या मतदारांची संख्याही मोठी आहे. परभणी ग्रामीण, गंगाखेड, जिंतूर, मंठा या भागातून स्थलांतर मोठ्या प्रमाणात आहे. आळंदी, नाशिक, भाईंदर, पिंपरी चिंचवड या भागात हे स्थलांतरित मतदार आहेत. या मतदारांना मतदानासाठी घेऊन येण्याचाही प्रयत्न दोन्ही प्रमुख उमेदवारांकडून होत आहे. हे स्थलांतरित मतदान जवळपास दीड लाख असण्याची शक्यता आहे.