उमाकांत देशपांडे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या विविध जनसुविधा प्रकल्पांच्या भूमीपूजन आणि लोकार्पण समारंभात राजशिष्टाचाराचे नियम पायदळी तुडविण्यात आले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. शासकीय समारंभाचा वापर पक्षप्रचारासाठी करण्यात आल्याने त्याचा खर्च भाजपकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

मुंबई महापालिका, एमएमआरडीए आणि रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे भूमीपूजन व लोकार्पण पंतप्रधान मोदी यांनी वांद्रे कुर्ला संकुलात गुरूवारी केले. या शासकीय समारंभाच्या आमंत्रण पत्रिकेत भाजपच्या मुंबईतील तीन आणि शिंदे गटातील दोन खासदारांची नावे होती, पण ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचे नाव नव्हते. त्यास सावंत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी धावाधाव करून समारंभाचे आमंत्रण दिले असता ते स्वीकारण्यास सावंत यांनी नकार दिला होता. या समारंभात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. शासकीय समारंभांसाठीच्या राजशिष्टाचार नियमांनुसार योजना किंवा प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक आमदार-खासदार यांची नावे निमंत्रण पत्रिकेत छापून त्यांना आमंत्रित केले जाते.

हेही वाचा >>> चर्चेतील चेहरा, के. चंद्रशेखर राव यांची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार का?

महापालिका, रेल्वे व एमएमआरडीए या तीनही शासकीय व निमशासकीय यंत्रणांच्या या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते, ठाकरे गटातील खासदार सावंत, संजय राऊत, अनिल देसाई आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळण्यात आले. त्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत नव्हती आणि समारंभासही बोलाविले गेले नाही. बावनकुळे हे विधानपरिषदेतील आमदार आहेत. अन्य विधानपरिषद आमदार किंवा अन्य पदाधिकाऱ्यांना मात्र आमंत्रित केले गेले नाही किंवा निमंत्रण पत्रिकेत त्यांची नावे नव्हती. समारंभात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन आले होते.

हेही वाचा >>> गुजरातमध्ये काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या ३८ नेत्यांची हकालपट्टी!

त्यामुळे या शासकीय समारंभाचा वापर उघडपणे पक्षप्रचारासाठी करण्यात आल्याने त्याचा खर्च भाजपकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी खासदार सावंत यांनी केली आहे. त्याबाबत ते संबंधित शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांना शनिवारी पत्र पाठविणार असून राजशिष्टाचार भंगाबाबत लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा उपसभापतींकडे तक्रार करणार आहेत, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुंबईत एवढा मोठा कार्यक्रम होत असताना आणि सर्वसामान्यांची कामे होत असताना त्याचा आनंद मानून आणि मानापमान बाजूला ठेवून सावंत यांनी समारंभास यायला हवे होते. शासकीय यंत्रणांचा कार्यक्रम असल्याने कोणाला बोलवावे किंवा नाही, व्यासपीठावर बसवावे, हे ठरविण्याचा अधिकार त्यांना आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, असे भातखळकर यांनी सांगितले.