सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : शिवसेनेत बंडाळी करून गुवाहटी येथे एकनाथ शिंदे यांच्या समवेत जाणाऱ्या आमदारांना ‘बंडखोर म्हणावे की गद्दार’ हा शिवसेना नेत्यांसमोर पेच असला तरी शिवसैनिकांनी मात्र आता या सर्वांना ‘गद्दारच’ म्हणा, असा आग्रह सुरू केला आहे. विधिमंडळाच्या पटलावर काही आमदार परतले तर सरकारला त्याची गरज आहे, ही बाब लक्षात घेऊन नेत्यांनी बंडखोर आमदारांवर टीका करायला सुरू केली आहे. बंडात पुढाकार घेणाऱ्यांच्या कार्यशैलीवर आता उघड भाष्य केले जात आहे तर परत येतील असे वाटणाऱ्यांना गद्दार ऐवजी बंडखोर असा शब्दप्रयोग वापरला जात आहे. पण हे सारे गद्दारच आणि त्यांना तसेच म्हणा, असा आग्रह शिवसेनेच्या विभागीय मेळाव्यातून केला जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे प्रदीप जैस्वाल या शहरातील दोन आमदारांसह मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी केली. त्यांच्या कृतीच्या विरोधात औरंगाबाद शहरातील शिवसैनिकांमध्ये रोष आहे. एरवी नगरसेवकांनी पक्ष बदलला तरी सेनेचे कार्यकर्ते चवताळून जातात. मग आता एवढी शांत प्रतिक्रिया कशी, असा प्रश्न शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनाही पत्रकार बैठकीत विचारण्यात आला. त्यावर आता त्यांच्या कार्यालयावरही मी जाऊन हल्ला करू का, असे उत्तर त्यांनी दिले. पण विधिमंडळाच्या पटलावर आमदार परतले तर बरे होईल या भावनेने शिवसेना नेते बंडखोर आमदारांना गद्दार म्हणण्यास तयार नाहीत. मात्र, औरंगाबाद शहरातील विभागीय मेळाव्यात या प्रश्नाला वाचा फोडत माजी महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले,‘ त्यांना बंडखोर नाही तर गद्दारच म्हणावे लागेल.’ बंडखोर आमदारांविषयी वाटणारा रोष आता हळूहळू आक्रमक होताना दिसत आहे. नेत्यांमधील दोष जाहीरपणे मांडणेही विभागीय मेळाव्यातून सुरू झाले आहे.

बंडखोरीच्या कृतीला प्रोत्साहन देण्यास पुढाकार घेणारे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या वर्तनावर जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी भाष्य केले. ‘ज्यांनी शिवसेना पक्षप्रमुख भेटत नाहीत अशी टीका केली ते मतदारसंघात किती दिवस थांबतात असा प्रश्न विचारला. त्यावर शिवसैनिकांचे उत्तर आले दोन दिवस. बाकी दिवस ते काय करतात असा पुढचा प्रश्न आला आणि मेळाव्यातील आलेल्या उत्तरावर दानवे यांनी उजव्या हाताची बोटे डाव्या हातावर ठेवत पत्ते पिसण्याची कृती करून दाखवली.’ दानवे यांची टीका अधिक टोकदार करत शिवसैनिक बंडखोर आमदारांबरोबर नाहीत, असे सांगितले. शहरातील दुसरे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यशैलीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी टीका केली. आक्रमक सूर किती ठेवावा याविषयी नेत्यांच्या मनात शंका असल्या तरी शिवसैनिकांच्या मनात टीकेचा रोख आक्रमक असल्याचे विभागीय मेळाव्यातून दिसून येत आहे.