BJP Bihar election strategy बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. भाजपाने निलंबित केलेल्या अभिनेत्याची पुन्हा घरवापसी झाली आहे. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क केले जात आहेत. विशेषतः, भाजपा आणि भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांच्यातील राजकीय ‘डील’ची जोरदार चर्चा सुरू आहे. २०२० च्या लोकसभा निवडणुकीत पवन सिंह यांनी एनडीएचे उमेदवार उपेंद्र कुशवाहा यांच्याविरोधात काराकाटमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यामुळे त्यांना भाजपाने पक्षातून निलंबित केले होते.
पक्षप्रवेशासाठी अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट
‘पॉवर स्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि तरुणांमध्ये प्रचंड मोठा चाहता वर्ग असलेल्या पवन सिंह यांना मे २०२४ मध्ये पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या उमेदवाराविरुद्ध काराकाट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्या या अपक्ष उमेदवारीमुळे एनडीएच्या मतांमध्ये फूट पडली, ज्यामुळे कुशवाहा यांचा पराभव झाला आणि विरोधी पक्षाचे (सीपीआय-एमएल) उमेदवार विजयी झाले. सध्या दिल्लीत असलेले पवन सिंह हे भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांसारख्या भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना भेटत आहेत. तावडे आणि रितुराज सिन्हा यांच्याबरोबर ते राष्ट्रीय लोक समता पार्टी (RLSP)चे प्रमुख कुशवाहा यांना भेटायलाही गेले होते.
भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशवाहा हे सिंह यांच्यावर कमालीचे नाराज होते. कारण- त्यांच्यामुळेच लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे सिंह यांना पुन्हा एनडीएत घेण्यास त्यांची तयारी नव्हती. परंतु, भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवण्यास सहमती दर्शवली आणि ‘आम्ही एकत्र आहोत’ हा संदेश बिहारमधील राजपूत आणि कुशवाहा समुदायापर्यंत पोहोचवण्यासाठी ते सिंह यांना दिल्लीतील निवासस्थानी भेटले.

भाजपासाठी पवन सिंह महत्त्वाचे का आहेत?
भोजपुरी स्टार पवन सिंह शाहाबाद प्रांतातून येतात, जो बिहारचा ऐतिहासिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. याला ‘भोजपूर प्रदेश’ असेही म्हणतात, त्यात भोजपूर, आर्रा, रोहतास, सासाराम, कैमूर-भभुआ व बक्सर या जिल्ह्यांचा समावेश आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत या भागात भाजपाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. येथील एकूण २२ जागांपैकी एनडीएला फक्त आठ जागा जिंकता आल्या होत्या. उर्वरित १४ जागांवर विरोधी पक्षाच्या ‘महागठबंधन’ने विजय मिळवला होता, ज्यामुळे या प्रदेशाची जागा सत्ताधारी आघाडीसाठी खूपच कमकुवत ठरली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही, या प्रदेशातील पाचपैकी चार लोकसभा जागा (आर्रा, काराकाट, औरंगाबाद व सासाराम) एनडीएने गमावल्या. या पराभवासाठी सिंह यांचे निलंबन आणि राजपूत व कुशवाहा यांच्यातील उघड संघर्ष कारणीभूत ठरला. सिंह यांचे या प्रदेशातील राजपूतबहुल आर्रा आणि बरहरा या दोन जागांवर लक्ष आहे. भाजपासाठी सिंह यांना परत आणणे ही एक राजकीय गरज आहे, कारण- त्यांच्या स्टार-पॉवर आणि जातीय समीकरणांच्या माध्यमातून मते एकत्रित करणे पक्षासाठी महत्त्वाचे आहे.

भोजपुरी भाषिक पट्ट्यात मोठ्या मतदार गटाला एकत्र आणण्याची त्यांची क्षमता भाजपासाठी महत्त्वाची आहे. त्याव्यतिरिक्त प्रभावशाली राजपूत समाजातील एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख, भाजपाला भोजपूर प्रदेशात पाठिंबा मिळवण्यासाठीदेखील महत्त्वाचे ठरते. सिंह यांची घरवापसी झाल्याने पक्षाचे मोठे उद्दिष्ट साधले जाईल. पुन्हा एकदा एनडीएच्या मतांमध्ये फूट पाडून विरोधकांना अप्रत्यक्ष मदत करणार नाही, याची खात्री करणे आणि संपूर्ण राज्यात एक उच्चप्रतिष्ठित प्रचारक म्हणून त्यांच्या ‘स्टार-पॉवर’चा वापर करणे हे भाजपाचे उद्दिष्ट आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना जिंकण्याची खात्री असलेल्या मतदारसंघातून एनडीएचे निश्चित तिकीट देणे (ज्यावर त्यांचा भर आहे) किंवा राज्य/राष्ट्रीय भाजपा संघटनेत पद देणे, यावर चर्चा झाल्याचे त्यांचे सांगणे आहे. पवन सिंह यांना भाजपा राज्यसभेवर पाठवू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
