Modi Bhagwat meeting भाजपाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. ही निवडणूक आता आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस भाजपा आणि मोदी सरकारसाठी खूप व्यग्रतेचे असू शकतात. कारण- अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या संघटनात्मक बदलांसह नियुक्त्यांवर निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत या महिन्यात सलग दुसऱ्यांदा दिल्लीत आले आहेत. त्यांचा तीन दिवसीय दौरा २६ ते २८ ऑगस्टपर्यंत असणार आहे. २९ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघप्रमुख मोहन भागवत यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी यांची संघप्रमुख मोहन भागवतांबरोबर बैठक?
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघप्रमुख मोहन भागवत दोघेही दिल्लीत असताना नियुक्त्यांबाबत चर्चा करू शकतात.
- भाजपातील एका अंतर्गत सूत्राने सांगितले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख आणि पंतप्रधानांमध्ये बैठक होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.”
- रविवारी दिल्लीत आल्यापासून भागवत यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठका घेतल्या आहेत.
बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होणार?
सूत्राने पुढे सांगितले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपाचे शीर्षस्थ नेते केंद्रीय मंत्रिमंडळातील बदलांवरही चर्चा करतील. या चर्चेत नवीन भाजपा राष्ट्रीय अध्यक्षाची निवड आणि राजभवनांमध्ये होणारे बदल या विषयांचा समावेश असेल.” नेहमीप्रमाणे संघ विशिष्ट नावे सुचवणार नाही;परंतु भाजपानं विचारणा केल्यास पदांसाठी निवडीचे निकष निश्चित करील,” असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी १ व २ सप्टेंबरला त्यांच्या दौऱ्यावरून परत येतील, त्यानंतर पितृ पक्षाचा काळ सुरू होईल. सहसा या काळात पक्ष नवीन नियुक्त्या करीत नाही. त्यामुळे आता उशीर झाल्यास पक्ष आणि सरकारमधील नियुक्त्या आणखी पुढे ढकलल्या जातील.
भाजपाच्या घटनेनुसार, किमान १९ राज्यांच्या अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होऊ शकते. हरियाणा, उत्तर प्रदेश व गुजरातसारखी राज्ये यात मागे आहेत, जिथे अंतर्गत कलहामुळे निवड करणे अडचणीचे झाले आहे. ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असेही अनेकांचे म्हणणे आहे.
शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची चर्चा
रविवारी मोहन भागवत यांची भेट घेणाऱ्यांमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचाही समावेश होता. पीटीआयच्या वृत्तानुसार, मंगळवारी ग्वाल्हेरमध्ये पत्रकारांनी त्यांना या भेटीबद्दल विचारले आणि ते भाजपाचे नवे अध्यक्ष होतील का, असा प्रश्न केला. मात्र, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. ते म्हणाले की, ते त्यांच्या मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यग्र आहेत.
ते म्हणाले, “मला एक गोष्ट सांगायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. सध्या कृषी माझ्या शरीराच्या प्रत्येक कणात आहे आणि शेतकरी माझा श्वास आहेत.” पुढील भाजपा अध्यक्ष कोण असतील, असे विचारले असता, चौहान म्हणाले, “मी कधीच याचा विचार केला नाही आणि मला कोणी सांगितलेलेही नाही.”
चौहान हे भारत मंडपम येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात होते. त्या कार्यक्रमात त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी गजेंद्र शेखावतदेखील उपस्थित होते. कार्यक्रमानंतर लगेचच ते संघ कार्यालयात गेले. मोहन भागवत यांच्याबरोबर त्यांची बंद दाराआड बैठक झाली. त्यानंतर ते मध्य प्रदेशला रवाना झाले. भागवत यांच्याशी झालेल्या भेटीपासून, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शिवराज सिंह चौहान यांचे नाव पुन्हा एकदा आघाडीवर आले आहे.
शिवराज सिंह चौहान हे तीन दशकांहून अधिक काळ भाजपाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी मध्य प्रदेशमध्ये पक्षाचे भविष्य घडवले आणि राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे स्थान बळकट करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळेही त्यांचे नाव या पदासाठी घेतले जात आहे. मात्र, अद्याप नावाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघप्रमुख मोहन भागवत यांच्यात बैठक झाल्यास काय चर्चा होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.