संतोष प्रधान

मुंबई महानगरपालिका जिंकण्याबरोबरच पुण्याची सत्ता कायम राखण्यावर भाजपने सध्या भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन महिन्यातील लागोपाठ दुसरा दौरा, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, स्मृती इराणी या केंद्रीय नेत्यांनी अलीकडेच पुण्याला दिलेली भेट यातून भाजपने पुण्याला दिलेले महत्त्व अधोरेखित होते.

पंतप्रधान मोदी हे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी १४ जूनला देहूला येणार असल्याचे भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आले. याआधी मार्चच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान हे मेट्रो प्रकल्पाच्या उदघाटनाकरिता पुण्यात आले होते. पंतप्रधान पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्यास पुणे जिल्ह्यात तीन महिन्यांत मोदी यांची ही दुसरी भेट असेल. अमित शहा यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाला गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमाच्या वेळी महागाईच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच पुण्याला भेट दिली. संरक्षण विभागाशी संबंधित एका कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच पुण्याला भेट दिली. केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे भेटी कायम सुरू असतात. अलीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही पुणे दौरे वाढले आहेत.

पुणे शहरावर वर्चस्व प्रस्थापित केल्यास आसपासच्या परिसरात त्याचा राजकीय फायदा होतो हे भाजपचे गणित आहे. पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडची सत्ता कायम राखणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे. याशिवाय २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात विजय प्राप्त केला होता. पुढील विधानसभा निवडणुकीतही पुणे आणि भाजप हे समीकरण कायम राखण्याचा भाजपचा प्रयत्न राहील.

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला. पुणे शहरात शरद पवारांना एकहाती वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही. २०१२ ते २०१७ या काळात विविध आघाड्यांच्या माध्यमातून पुण्याची सत्ता राष्ट्रवादीकडे होती. पुन्हा पुणे महानगरपालिकेची सत्ता मिळविणे हे राष्ट्रवादीचे लक्ष्य आहे. याशिवाय अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी सारा जोर लावला आहे. राष्ट्रवादीला पुण्यातच रोखायचे ही देवेंद्र फडण‌वीस आणि चंद्रकांत पाटील यांची राजकीय व्यूहरचना आहे. भाजपने पुणे कायम राखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. भाजपच्या या तयारीमुळे राष्ट्रवादीपुढे आव्हान असेल.