BJP alleges abuse of PM Modi and his Mother : बिहारची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी राज्यात व्होटर अधिकार यात्रा काढली होती. त्यादरम्यान दरभंगा येथील एका सभेत काँग्रेसच्या एका कथित कार्यकर्त्यांने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून भाजपाचे नेते चांगलेच आक्रमक झाले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांच्या एका प्रचारसभेत पंतप्रधानांच्या आईबद्दल पुन्हा अपशब्द वापरण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरडीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांत ‘बिहार अधिकार यात्रा’ काढली. त्यांच्या या यात्रेला प्रचंड गर्दी होत असून, राज्यात फक्त तेजस्वी यादव यांच्याच नावाची चर्चा आहे. यादरम्यान तेजस्वी यांनी शनिवारी (२० सप्टेंबर) पाटेपूर विधानसभा मतदारसंघात घेतलेल्या एका सभेत आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केलेल्या एका पोस्टमधून हा आरोप केला आहे. आरजेडीचे कार्यकर्ते पंतप्रधानांच्या आईबद्दल अपशब्द वापरत असताना तेजस्वी यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही, असेही मालवीय यांनी म्हटले आहे.

bihar tejashwi yadav
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (छायाचित्र सोशल मीडिया)

भाजपाचे नेते अमित मालवीय काय म्हणाले?

शनिवारी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये भाजपा नेते अमित मालवीय म्हणाले, “आज पाटेपूर विधानसभा मतदारसंघातील आरजेडीच्या जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीबद्दल अत्यंत अपमानजनक शब्दांचा वापर केला गेला. त्यावेळी तेजस्वी यादव हे मंचावर उपस्थित होते, पण त्यांनी आपल्या समर्थकांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. याआधी बिहार काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक द्वेषपूर्ण व्हिडिओ प्रसारित केला होता. आता राष्ट्रीय जनता दलाच्या सभेत पंतप्रधानांच्या दिवंगत मातोश्रीबद्दल अपशब्द वापरण्यात आले. ना सभ्यता, ना संस्कार… हेच विरोधी पक्षांचे राजकारण आहे.”

bjp amit malviya
भाजपाचे नेते अमित मालवीय (छायाचित्र एएनआय)

रविवारीदेखील या संदर्भात अमित मालवीय यांनी आणखी एक पोस्ट केली. “सीतामातेच्या भूमीत बिहारमध्ये वारंवार पंतप्रधान मोदींच्या दिवंगत मातोश्रींचा अपमान केला जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते पक्षाच्या अधिकृत मंचावरूनच या दुष्कृत्याला प्रोत्साहन देत आहेत. कालही अशीच घटना घडली, जेव्हा तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या मातोश्रींविषयी अत्यंत नीच भाषेचा वापर केला गेला. त्यावेळी लालू प्रसाद यादव यांच्या पुत्राने मात्र मौन बाळगले. पंतप्रधानांच्या आईला शिवीगाळ करून तुम्हाला काय मिळणार आहे? राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जाणे हे लाजिरवाणे आहे. राष्ट्रीय जनता दलाचे घाणेरडे विचार सर्वांसमोर येत आहेत. जोपर्यंत बिहारमध्ये या पक्षाचे अस्तित्व राहील, तोपर्यंत बिहारला वारंवार लाज वाटत राहील,” असा संताप मालवीय यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केला.

आरजेडीकडून भाजपाला प्रत्युत्तर

भाजपा नेत्यांनी केलेल्या या आरोपांना राष्ट्रीय जनता दलाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. या वादग्रस्त घटनेनंतर बिहारमधील महुआ मतदारसंघाचे आरजेडी आमदार डॉ. मुकेश रौशन यांनी पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याने पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरले नसल्याचे स्पष्ट केले. “राष्ट्रीय जनता दलाच्या कोणत्याही कार्यकर्त्याने किंवा अन्य कोणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद शब्द वापरलेले नाहीत. भाजपाने शेअर केलेला व्हिडीओ बनावट आहे. या व्हिडीओद्वारे ते निवडणुकीत सहानुभूती मिळविण्यासाठी आमच्या पक्षाची जाणूनबुजून बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या व्हिडीओत तेजस्वी यादव दिसत असले तरी आरजेडीच्या कोणताही कार्यकर्त्याने अपशब्द वापरलेले नाहीत, असे आमदार मुकेश रौशन यांनी स्पष्ट केले आहे.

rjd mla mukesh raushan
राष्ट्रीय जनता दलाचे आमदार डॉ. मुकेश रौशन (छायाचित्र सोशल मीडिया)

तेजप्रताप यादव यांची तक्रारीची मागणी

या वादग्रस्त घटनेवर तेजप्रताप यादव यांनी प्रतिक्रिया देत शिवीगाळ करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविषयी ज्याने अपशब्द वापरले, त्याच्यावर पोलिसांनी तातडीने एफआयआर करावा आणि त्याची रवानगी तुरुंगात करावी,” अशी मागणी तेजप्रताप यांनी केली. त्याचबरोबर “स्थानिक आमदाराने ज्या पद्धतीचे विधान केले आहे, त्याबद्दल त्याच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा. मी बिहार सरकार आणि केंद्र सरकारकडे मागणी करतो की, त्यांनी या आमदाराची तुरुंगात रवानगी करावी. जर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू”, असा इशाराही तेजप्रताप यांनी दिला. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईविषयी कथित शिवीगाळ प्रकरणाने बिहारचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

tej pratap yadav news
आरजेडीचे माजी नेते तेज प्रताप यादव (छायाचित्र सोशल मीडिया)

मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ हटवण्याचे आदेश

काही दिवसांपूर्वी बिहार काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मातोश्रींचा एआयद्वारे (आर्टीफिशियल इंटेलिजन्स) तयार केलेला व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी यांची आई त्यांच्या स्वप्नात येते आणि त्यांच्यावर ओरडते, असे दाखवण्यात आले होते. या व्हिडीओनंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन काँग्रेसवर टीकेचा भडिमार केला होता. तेव्हा सदरील व्हिडीओ कुणाचाही अनादर करण्यासाठी तयार केलेला नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं होतं. याप्रकरणी काँग्रेसविरोधात पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर १७ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं बिहार काँग्रेसला मोदी व त्यांच्या मातोश्रींचा एआयद्वारे बनवलेला व्हिडीओ समाजमाध्यमांवरून हटविण्याचे आदेश दिले होते.

pm modi and heeraben modi
पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी (छायाचित्र सोशल मीडिया)

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला कसं प्रत्युत्तर दिलं?

दरम्यान, बिहारच्या दरभंगा येथे झालेल्या काँग्रेसच्या मतदार अधिकार यात्रेतील घटनेवर पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. “काँग्रेस आणि आरजेडीच्या व्यासपाठीवरून माझ्या आईला शिवीगाळ करण्यात आली. हा अपमान फक्त माझ्या आईचा नाही, तर देशातील प्रत्येक आईचा, बहिणीचा व मुलींचा अपमान आहे. हे पाहून आणि ऐकून बिहारच्या प्रत्येक आईला किती वाईट वाटलं असेल याची मला जाणीव आहे. मला माहीत आहे की, माझ्या हृदयात जे दुःख आहे, तेच दुःख बिहारच्या लोकांनाही झालं आहे. म्हणूनच आज जेव्हा मी इतक्या मोठ्या संख्येनं बिहारच्या लाखो माता आणि भगिनींना पाहत आहे, तेव्हा आज मी माझ्या मनातील दुःख तुमच्यासोबत शेअर करीत आहे;जेणेकरून तुमच्या माता आणि भगिनींच्या आशीर्वादाने मी हे सहन करू शकेन,” अशी भावनिक प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली होती.